राजकुमार रावची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘न्यूटन’ या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवले होते. यंदाच्या वर्षी न्यूटनच्या निमित्ताने भारताच्या ऑस्कर पुरस्काराविषयीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, आता हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे, असे म्हणावे लागेल. कारण, परदेशी भाषा विभागात निवड झालेला ‘न्यूटन’ हा चित्रपट सर्वोच्च पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. समीक्षक आणि जाणकार प्रेक्षकांची दाद मिळवलेल्या या चित्रपटाच्या वाट्याला आलेले हे अपयश अनेकांच्या मनाला चटका लावणारे ठरले. पण, काही नेटकऱ्यांनी मात्र यातही आपले वेगळेच विचार मांडत या चित्रपटाची तुलना आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटासोबत करण्यास सुरुवात केली.

‘न्यूटन’ ऑस्करच्या शर्यतीसाठी पात्र नव्हता असेच मत अनेकांनी मांडले. राजकुमारच्या ‘न्यूटनपेक्षा आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटालाच ऑस्करमध्ये पाठवायला हवे होते, असे मत अनेकांनी मांडले. आमिरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस विक्रम मोडित काढत प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. असे असतानाही या चित्रपटाची निवड ऑस्कर पुरस्कारांच्या यादीत का करण्यात आली नाही, असाच प्रश्न काहीजणांनी उपस्थित केला. अनेकांनी तर चित्रपटांची निवड करणाऱ्या ज्यूरींवरही पक्षपातीपणाचा आरोप लावला आहे.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या चर्चेत प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही उडी घेतली असून, त्यांनी ‘न्यूटन’ चित्रपटाच्या बाजूने आपले मत मांडले. ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्यांविषयी मी आता वाईट भाषेत प्रतिक्रिया देऊ इच्छितो… असे म्हणत मेहता यांनी एक ट्विट केले. ‘ऑस्कर मिळो अथवा न मिळो, माझ्या दृष्टीने ‘न्यूटन’ हा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे’, असे ते म्हणाले. चित्रपटाला पुरस्कार मिळण्यापेक्षा त्या कलाकृतीमध्ये कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि त्याच ताकदीने एखादा महत्त्वाचा विषय रुपेरी पडद्यावर मांडण्याचा केलेला प्रयत्न या सर्व गोष्टींकडे अनेकांचेच दुर्लक्ष होत असल्याची तगमग मेहता यांच्या या ट्विटमधून व्यक्त झाली.