सर्वोच्च न्यायालय आणि सेन्सॉरने वाट मोकळी करुन दिली असतानाही भन्साळींच्या ‘पद्मावत’वर संकटांचे ढग घोंगावतच आहेत. सध्याच्या घडीला देशातील अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध केला जात असला तरीही या अद्वितीय कलाकृतीबद्दल चित्रपटातील कलाकार मात्र आशावादी आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांनी अखेर चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, आता त्यांना चाहत्यांचा पाठिंबा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स’ सोहळ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाने चित्रपटाविषयी आपले मत मांडले. आमचे कामच त्यांना (विरोधकांना) सडेतोड उत्तर देईल, असा निर्धार तिने व्यक्त केला.

‘बॉक्स ऑफिसवर हा एक चित्रपट काय आणि कशी किमया करतो हेच पाहण्याची ही वेळ आहे. आमचे काम, हा चित्रपटच त्यांना चोख उत्तर देईल. यावेळी मी सर्वाधिक उत्सुक आहे कारण, येत्या काळात हा चित्रपट अनेकांनाच हादरा देईल असे म्हणायला हरकत नाही’, असे सांगत दीपिकाने स्पष्ट शब्दांमध्ये करणी सेना आणि चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर शाब्दिक वार केल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाविषयी मिळणाऱ्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मी भारावले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याचा दिवस आमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

मुळात या साऱ्यामध्ये मी अनेकांचे आभार मानू इच्छिते, असे म्हणत तिने माध्यमांचे आणि चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.
दीपिकासोबतच शाहिदनेही अखेर आपल्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया दिली. ‘ज्या पात्राविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही, किंवा कोणाला त्याविषयी जास्त माहिती नाही असे पात्र साकारणे हे माझ्यासाठी एक मोठे आव्हानच होते. पण, ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खरच खूप अभिमान वाटतोय. आम्ही आमचे काम केले आहे, आता प्रेक्षकच या चित्रपटाचे भवितव्य ठरवतील’, असे शाहिद म्हणाला.

चित्रपटातील कलाकारांनी मांडलेल्या त्यांच्या भूमिका पाहता आता प्रेक्षक चित्रपटाचे भवितव्य कसे लिहितात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्या ठिकाणी ‘पद्मावत’ प्रदर्शित केला जात आहे, त्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जात आहे. असे असले तरीही मंगळवार आणि बुधवारी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक, जाळपोळीचे सत्र सुरुच ठेवत चित्रपटाचा विरोध केला.