‘अय्यारी’ आणि ‘पॅडमॅन’ हे चित्रपट स्पर्धेत उतरलेले असतानाही ‘पद्मावत’चा प्रभाव काही कमी झालेला नाही. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाने बऱ्याच अडचणींचा सामना केला. काही संस्कृतीरक्षक संघटनांच्या विरोधाचा सामना करत अखेर ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला. प्रदीर्घ काळ सुरु असणारं हे विरोधाचं नाट्यमय प्रकरण भन्साळींच्या स्वप्नवत चित्रपटाला एका अर्थी फायद्याचं ठरलं. ज्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये एक वलय तयार झालं आणि त्याचे परिणाम ‘पद्मावत’च्या कमाईच्या आकड्यांमध्ये परावर्तित झाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दणदणीत कमाई करणाऱ्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर आतापर्यंत ५०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड गाजलेल्या या चित्रपटाच्या कमाईबद्दल प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली. भारतात आतापर्यंत या चित्रपटाने २७६.५० कोटींचा आकडा पार केला असून, त्यात दिवसागणिक वाढ होतेय. त्यामुळे २०१८ च्या सुरुवातीला खऱ्या अर्थाने ‘पद्मावत’ हा यशस्वी चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. शिवाय येत्या काळात बॉक्स ऑफिसवरील आणखी काही विक्रमांना ‘पद्मावत’ गवसणी घालण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आता तो विक्रम कोणता असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘पॅडमॅन’ आणि ‘अय्यारी’ या चित्रपटांचा पद्मावतच्या कमाईवर काहीच परिणाम झाला नसून, उलटपक्षी या चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागल्याचं चित्र आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘पद्मावत’ या चित्रपटाची मांडणी आणि त्यामागे असणारी दिग्दर्शकांची महत्त्वाकांक्षी दृष्टी या साऱ्याची जोड मिळाल्यामुळेच चित्रपटाचं नाण खऱ्या अर्थाने खणखणीत वाजलं हे खरं.