चित्रपटाची घोषणा झाल्यापासून वादात सापडलेला ‘पद्मावत’ सिनेमा २४ जानेवारी रोजी भारतातील काही चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला करणीसेनेसह देशभरातील अनेक संघटनांनी तीव्र विरोध केला. चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून करणी सेना आक्रमक झाली. अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर जाळपोळ करण्यात आली, गुरगावमध्ये स्कूल बसवर देखील काही कंटकांनी चित्रपटाला विरोध करत दगडफेक केली. देशभरातून तीव्र विरोध होत असतानाही प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला.  जवळपास ५० ते ६० टक्के चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला पण असं असलं तरीही  पहिल्याच दिवशी या चित्रपाटाने ५ कोटींचा गल्ला जमवला.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत पद्मावत चित्रपटानं ५ कोटी कमावल्याचं सांगितलं. त्यामुळे इतक्या विरोधानंतरही ‘पद्मावत’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं म्हटलं तर वावग ठरणार नाही. जर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला नसता तर नक्कीच या चित्रपटानं पहिल्या दिवशी २० कोटींचा आकडा पार केला असता असं मत व्यापार विश्लेषक गिरिष जोहरने ‘द इंडियन एक्स्प्रेसला’ दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये ‘पद्मावत’ देशभरातील ४५०० स्क्रीन्सवर दाखविण्यात येणार आहे. मात्र करणी सेनेच्या विरोधामुळे ‘मल्टिप्लेक्स एसोसिएशन ऑफ इंडिया’ने पद्मावत सिनेमा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था ७५ टक्के मल्टीप्लेक्स मालकांचे प्रतिनिधीत्व करते. तसेच अनेक मल्टिपेक्समध्ये ‘पद्मावत’ चित्रपटाची तिकीट ही एक हजार ते अडीच हजारांच्या आसपास आहे त्यामुळे या चित्रपटाच्या एकूण कलेक्शनवर याचा परिणाम होऊ शकतो असं भाकीत तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि हा चित्रपट पाहण्याचं कुतूहल यामुळे पुढच्या तीन दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो असं चित्रपट व्यापार विश्लेषकांचं मत आहे. विरोधानंतर पहिल्याच दिवशी ५ कोटी कमावल्यानंतर या आठवड्यात हा चित्रपट किती कमावतो हे पाहण्यासारखं ठरेल.