दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालय आणि सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या बाजूने निर्णय दिला असला तरीही दुसरीकडे मात्र करणी सेनेचा या चित्रपटाला असणारा विरोध काही केल्या शमण्याचे नाव घेत नाही आहे. प्रसिद्धीच्या बाबतीतही ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांनी बरेच कार्यक्रमही रद्द केल्याचे म्हटले जात आहे.

‘पद्मावत’ चर्चेत येण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे त्यामध्ये रंगवण्यात आलेल्या व्यक्तीरेखा. राणी पद्मावती साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण असो किंवा महारावल रतन सिंह साकारणारा शाहिद कपूर असो. या कलाकारांनी ज्या ताकदीने या भूमिका रुपेरी पडद्यावर उभ्या केल्या आहेत ते पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शाहिद आणि दीपिकाशिवाय अभिनेता रणवीर सिंगने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेवरही अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

क्रूर शासक, एखादी गोष्ट आपल्याकडे असावी अशी इच्छा व्यक्त करुन ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या विक्षिप्त सुलतानाची भूमिका रणवीरने या चित्रपटात साकारली. ‘पद्मावत’च्या ट्रेलर आणि डायलॉग प्रोमोमध्ये तर त्याने साकारलेला खिल्जी पाहून अनेकांना धडकीच भरली. खुद्द रणवीरचेही त्याच्या या भूमिकेबद्दल असेच मत आहे. कारण, त्याने ‘सैतान’ असे म्हणत सोशल मीडियावर खिल्जीच्या भूमिकेतील काही फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BePFB1hBLrt/

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

भन्साळींच्या ‘पद्मावत’मध्ये खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली होती. किंबहुना चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर रणवीरला मानसोपचार तज्ज्ञांची मदतही घ्यावी लागली होती. विक्षिप्त भूमिका साकारण्यासाठी त्याने स्वत:ला झोकून दिले होते. पण, त्यानंतर मात्र या भूमिकेचा त्याच्यावर इतका प्रभाव पाहायला मिळाला की, त्याच्या खासगी आयुष्यावरही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेवटी त्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली होती.