काही दिवसांपूर्वीच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण, या निर्णयानंतरही चित्रपटाला असणारा करणी सेनेचा विरोध काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावत’चे स्क्रीनिंग करण्यात येईल तेथे आम्ही तोडफोड करु असा इशारा करणी सेनेने दिला. या इशाऱ्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही गुजरातमध्ये मल्टीप्लेक्स मालकांनी ‘पद्मावत’चे स्क्रीनिंग करण्यास नकार दिला. पण, तरीही चित्रपटाचा विरोध करणाऱ्यांनी मात्र आपली कृत्य सुरुच ठेवली आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथील राजहंस सिनेमा येथे शनिवारी रात्री काही इसमांनी चित्रपटगृहाची तोडफोड केली. या चित्रपटगृहात करण्यात आलेल्या तोडफोडीची काही छायाचित्रे ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहेत. या साऱ्याप्रकरणी आता स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा काय कारवाई करणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. धमक्या आणि तोडफोडीचे हे सत्र असेच सुरु राहिले तर त्याचा फटका मल्टीप्लेक्स मालकांना बसणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतेय.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ हा चित्रपट सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिल्यानंतरही गुजरातमधील मल्टिप्लेक्सनी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यास नकार दिला. कोणत्याही मल्टिप्लेक्स मालकाला स्वत:चे नुकसान करून घ्यायचे नाही. या सगळ्या वादात आम्ही स्वत:चे नुकसान का करुन घ्यायचे, असा सवाल गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनचे संचालक राकेश पटेल यांनी विचारला. त्यामुळे, आता गुजरातमधील केवळ सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये ‘पद्मावत’ चित्रपट दाखवला जाणार आहे.

२५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्याच दिवशी करणी सेनेने भार बंदची हाकही दिली आहे. इतकेच नव्हे तर करणी सेना प्रमुख लोकेंद्र सिंह कल्वी २५ जानेवारीला मुंबईत येणार असल्याचेही म्हटले जात आहे. तेव्हा आता ‘पद्मावत’चे भविष्य काय असणार हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच.