संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना आता राजपूत करणी सेनेच्या प्रत्येक कृतीवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉरच्या निर्णायाला करणी सेनेचा विरोध पाहता सध्या सेन्सॉरच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. करणी सेनेने सेन्सॉरच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर निदर्शने केल्यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगळवारी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी सेन्सॉरच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावत’ला प्रमाणित केल्यामुळे नाराजी व्यक्त करत सेन्सॉर बोर्डाला कशा पद्धतीने काम करावे याचे तंत्रच अवगत नाही, असा आरोप त्यांनी केला होता. त्याआधी करणी सेनेने सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

वाचा : ‘पद्मावती’चं ‘पद्मावत’ करताना निर्मात्यांकडून मोठा बदल

‘पद्मावत’ चित्रपटाविषयी गेल्या दीड वर्षापासून आम्ही शांततेची भूमिका घेतली होती. पण, आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे, असा इशाराही गोगामेडा यांनी दिला. करणी सेनेचा या चित्रपटाला होणारा विरोध पाहता येत्या काळात हे प्रकरण आणखी चिघळण्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाला होणारा विरोध आणि कलाकारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या या सर्व गोष्टींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले होते. अखेर सेन्सॉर बोर्डाने एका समितीची मदत घेत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चित्रपटामध्ये काही बदलही करण्यात आले. मुख्य म्हणजे चित्रपटाचे नावही ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ असे करण्यात आले. तरीही करणी सेनेची नाराजी काही केल्या कमी झालेली नाही. देशभरात ‘पद्मावत’ला करणी सेनेचा होणारा विरोध दिवसागणिक वाढतच असून, त्यांनी चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास करणी सेनेने ‘जनता कर्फ्यू’चाही इशारा दिला आहे.