काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेची प्रचंड चर्चा असतानाच ‘खलीबली’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांच्यासाठी आणि ज्यांनी अद्यापही ‘पद्मावत’ पाहिला नाही त्यांच्यासाठी हे गाणं पर्वणी ठरत आहे. रणवीरचं नृत्यं, गाण्याची चाल आणि शब्द या सर्व गोष्टींचा सुरेख मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे.
अलाउद्दीन खिल्जीची क्रुरता आणि त्याचा विक्षिप्तपणा नेमका काय होता, याची झलक या गाण्यातून पाहायला मिळतेय. संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यामध्ये खिल्जी आणि त्याच्या सैनिकांचा एक वेगळाच अंदाच पाहायला मिळतोय. खिल्जीच्या भूमिकेला चित्रपटात ज्याप्रमाणे नकारात्मक बाजू आहे त्याचप्रमाणे गाण्यातूनही हलकीशी नकारात्मक झलक जाणवते. गाण्यात काळ्या रंगाचा जास्त प्रमाणात करण्यात आलेल्या वापरावरुनही खलनायकाची बाजू दिसून येते. हे गाणं ऐकताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते. ती म्हणजे रणवीरचा ‘मल्हारी’ गाण्यातील अंदाज. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटामध्ये रणवीरने ‘मल्हारी’ गाण्यात ज्या उत्स्फूर्तपणे आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याची झलक दाखवली होती, त्याचीच आठवण ‘खलीबली’ पाहतानाही होते.
वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले
शिवम पाठक आणि साथीदारांनी गायलेल्या या गाण्यात रणवीरने साकारलेल्या खलनायकी भूमिकेला आणखीनच उठावदार केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारीसुद्धा लिलया पेलली असून, त्याचा प्रत्ययही ‘खलीबली’मधून पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला संपूर्ण बॉलिवूडमध्ये ‘पद्मावत’च्या चर्चा सुरु असून या चित्रपटाच्या कमाईतही लक्षणीय वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीपासून मिळालेली वादांची पार्श्वभूमी, तगडी स्टारकास्ट आणि भन्साळींचं दिग्दर्शन या सर्व गोष्टींचा फायदा ‘पद्मावत’ला होतोय हे नाकारता येणार नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 9:01 am