X

नैराश्यातून अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही- दीपिका पदुकोण

अशा परिस्थितीमध्ये मी त्या भूमिकांना न्याय देऊ शकत नाही असंच त्यांना वाटलं असेल.

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीचं दुसरं नाव म्हणजे अनिश्चितता असं म्हणायला हरकत नाही. इथे कोणा एका अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या वाट्याला यश येतं, तर कधी त्याच यशाच्या आनंदावर विरजणही पडतं. सेलिब्रिटींच्या आयुष्याची गणितं केवळ यश-अपयशाशी संबंधित नसतात. त्यांना खासगी आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांचाही बराच परिणाम पाहायला मिळतो. कधीकधी ही परिस्थिती हाताळण्यास सेलिब्रिटी अपयशी ठरतात आणि याच गोष्टींमुळे त्यांना नैराश्यही येतं. अशाच काही सेलिब्रिटींमध्ये दीपिका पदुकोण, करण जोहर, हृतिक रोशन यांच्या नावांचा समावेश आहे.

दीपिकाने फार आधीच आपण नैराश्याचा सामना केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बरेच दिवस उलटले त्यामुळे आतातरी बॉलिवूडच्या या ‘मस्तानी’ची मानसिक स्थिती सावरली असेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण, तसं नाही. खुद्द दीपिकानेच एका कार्यक्रमात याविषयी वक्तव्य केलं आहे. आपण, पुन्हा त्या परिस्थितीच्या कचाट्यात सापडणार तर नाही ना, अशीच भीती तिच्या मनात घर करुन आहे. याविषयीच सांगताना दीपिका म्हणाली, ‘मला नाही वाटंत की नैराश्यातून मी पूर्णपणे सावरली आहे. कारण, माझ्या मनात नेहमीच एक प्रकारची भीती असते की, पुन्हा मला त्याच अवस्थेचा सामना करावा लागला तर. कारण तो अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता.’

नैराश्यामुळे कधी कोणत्या चांगल्या संधीला मुकावं लागंल का, असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, ‘मी हे ठामपणे म्हणत नाही. पण, असंही असू शकतं की, काही लोकांनी त्या काळात मला चित्रपटांसाठी विचारलंच नसावं. अशा परिस्थितीमध्ये मी त्या भूमिकांना न्याय देऊ शकत नाही असंच त्यांना वाटलं असेल.’

सर्वांसमक्ष आपल्या नैराश्याचा स्वीकार करणाऱ्या दीपिकाने तिच्या या निर्णयामागचा उद्देशही स्पष्ट केला. ‘मी या निर्णयाच्या परिणामांचा विचारच केला नाही. आपल्या देशाचा आणि संपूर्ण जगाचा मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा अशीच माझी इच्छा होती’, असं दीपिका म्हणाली.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

आपल्या सौंदर्याने अनेकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री सध्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातून ती राणी ‘पद्मावती’च्या भूमिकेत झळकणार आहे. ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील अनुभवाविषयी सांगत दीपिकाने सर्वात आव्हानात्मक दृश्याचाही खुलासा केल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटातील ‘जौहर’च्या दृश्यानंतर दीपिकाच्या मानसिक स्थितीवर त्याचा फार परिणाम झाला होता.

Outbrain