‘पद्मावती’ या चित्रपटाला होणारा विरोध पाहता आता यावर कलाकारांनीही आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. सध्या राजकीय आणि कलाक्षेत्रातही ‘पद्मावती’च्याच चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर गोव्यात सुरु असणाऱ्या ४८ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘इफ्फी’तही ‘पद्मावती’चेच वारे वाहत आहेत. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सुरु असणाऱ्या ‘इफ्फी’त अभिनेते नाना पाटेकर यांनीही ‘पद्मावती’वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘या वादाविषयी प्रत्येकाची वेगळी मतं आहेत. चित्रपट सेन्सॉरने प्रमाणित केला नसतानाही त्याचे स्क्रीनिंग करण्यात आले असे प्रसून जोशींचे म्हणणे आहे. तर याच गोष्टीकडे पाहण्याचा भन्साळींचा वेगळा दृष्टाकोन असेल. हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाहीये, मग त्याविषयी निष्कर्ष काढण्यात काय अर्थ? चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह गोष्टी असतील आणि त्यावर विरोध दर्शवला गेला तर ही बाब पटण्याजोगी आहे. पण, अजूनपर्यंत हा चित्रपट कोणी पाहिलाच नाहीये मग त्याला विरोध का’, असे ते म्हणाले.

वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’

दीपिका आणि भन्साळींवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याविषयीही पाटेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘विरोधकांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर करत त्यांना धमकावले होते. त्यांनी विरोधाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मी आशा करतो असे काहीही होणार नाही. कोणत्याही चित्रपटात काही गोष्टी मांडण्यासाठी कलाकार स्वातंत्र्य (क्रिएटिव्ह लिबर्टी) घेतात. अशावेळी एक चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत ही सर्वतोपरी माझी जबाबदारी असेल याचेही संबंधितांनी भान राखले गेले पाहिजे. पण, तरीही चित्रपट न पाहता त्याविषयी गैरसमज पसरवणे ही बाबही तितकीच चूक आहे’, असेही ते म्हणाले. नाना पाटेकर यांनी पद्मावती वादावर अतिशय सविस्तरपणे मत मांडत चित्रपट प्रदर्शित होऊ देण्याचेही आवाहन केले आहे. ‘चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली तर तो यशस्वी ठरेल आणि नाही आवडला तर त्याच्या वाट्याला यश येणार नाही. ही बाब इतकी सोपी आहे. त्यामुळे चित्रपटाचा विरोध करणाऱ्यांनी थोडी प्रतिक्षा करावी आणि चित्रपट पाहूनच आपली भूमिका ठरवावी’, असे म्हणत त्यांनी या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली.