बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करतेय. ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी प्रसिद्धीच्या उत्साहापेक्षा त्याला होणाऱ्या विरोधाचीच चिंता तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. विविध राजपूत संघटनांचा या चित्रपटाला होणारा विरोध काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. या चित्रपटाच्या वादामुळे दीपिका आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात येत आहेत.

या सर्व वादळात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. कारण, दीपिकाच्या खासगी आयुष्यावरही या साऱ्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टवरही काही नेटकऱ्यांनी आक्षेपार्ह शब्दांत कमेंट करत तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला. आपल्या खास मित्रासोबतचा फोटो शेअर करत दीपिकाने त्याला ‘फॉरएव्हर फ्रेंड्स’ असे कॅप्शनही दिले. पण, तिच्या या फोटोवरही नेटकऱ्यांनी ‘हिला कपडे घालण्याचीही समज नाही आणि आली मोठी पद्मावती व्हायला…’, अशा कमेंट्स करण्यास सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/Bb3tQtphOSS/

ही एकच कमेंट विविध इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाचाच विरोध करणाऱ्यांपैकी कोणीतरी ही कमेंट करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावरही दीपिकाला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटाला होणाऱ्या विरोधाने आता सर्व मर्यादा ओलांडल्यामुळे ‘पद्मावती’च्या संपूर्ण टीमसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.

https://www.instagram.com/p/Bb4j7rEBa2g/