बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे कलाविश्व आणि राजकीय वर्तुळात सध्या बऱ्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याच वादांनतर या चित्रपटाच्या नावात काही बदल सुचवत आणि काही दृश्यांवर कात्री लावत सेन्सॉरने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. पण, सेन्सॉरची ही भूमिका करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मुळीच पटली नसून त्यांनी चित्रपटाच्या विरोधातील आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय सेन्सॉरच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रसून जोशी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन केल्याबद्दल भन्साळींना कारावास झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपाला आम्ही चांगलाच धडा शिकवी असे म्हणत करणी सेनेने या चित्रपटावर बंदी घालण्याचीच मागणी केली आहे. याविषयीच माध्यमांशी संवाद साधताना करणी सेनेचे गुजरातमधील कार्यकर्ते राज शेखावत म्हणाले, ‘फक्त पाच बदलांसह पद्मावती चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र मिळणं खरंच दुर्दैवी आहे. आम्हाला हे मुळीच मंजूर नाही. या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. मुख्य म्हणजे गुजरातप्रमाणेच देशातील सर्वच राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये.’

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

‘पद्मावती’तून चुकीच्या पद्धतीने इतिहास प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येण्याच्या मुद्द्यावरुन आता या चित्रपटात करण्यात आलेल्या गुंतवणूकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या काळातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, अशा परिस्थितीत कोट्यवधींची गुंतवणूक भन्साळींना मिळालीच कशी, असा प्रश्न आता समोर येत आहे. करणी सेनेच्या या प्रश्नाचे उत्तर आता नेमके कोण देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ‘पद्मावती’विषयी सुरु असणारा वाद पाहता येत्या काळात ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार का, याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.