संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला विविध संघटनांकडून होणाऱ्या तीव्र विरोधाची धार अजूनही कायम आहे. उलट गेल्या काही दिवसांमध्ये यामध्ये आणखीन भरच पडली आहे. त्यामध्ये आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी जवळ येऊन पोहोचली आहे. यावेळी मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. त्यासाठी पोलिसांनी एक सूचना पत्रक जारी केले आहे. पद्मावतीबाबत निदर्शने करताना उगाचच मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’

गेल्या काही दिवसांत चित्रपटातील कलाकारांना जीवघेण्या धमक्या देण्यात येत असल्यामुळेच या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. ‘पद्मावती’ चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोणला आता राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे. ‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सेनेचे सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी म्हटले होते. ही सर्व परिस्थिती पाहता संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेरही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही चुकीची घटना घडू नये याकरता मुंबई पोलिसांकडूनही सर्वतोपरी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पोलिस आयुक्तांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. ‘मुंबई पोलीस’ या आंदोलनामध्ये हस्तक्षेप करत नाही. कारण, हा निषेध लोकशाही मार्गाने सुरू आहे. परंतु कोणीही या मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. करणी सेनेतर्फे ज्यांना धमकावण्यात आले आहे त्यांना आमच्याकडून योग्य ती सुरक्षा पुरवण्यात येईल. त्यामुळे चित्रपटातील कलाकरांनी निश्चिंतपणे त्यांची कामे करावीत. त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आतातरी हा वाद थंडावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.