भारत हा एक असा देश आहे ज्याच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात बऱ्याच घटना घडल्याचं पाहायला मिळालंय. बरेच लढे, अनेकांच्या प्राणांची आहुती गेल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. देशाच्या या स्वातंत्र्य गाथांवर आजवर बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित आणि निर्मित ‘राग देश’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘राग देश’च्या निमित्ताने संसदेत पहिल्यांदाच एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘पान सिंग तोमर’ आणि ‘साहेब बिवी और गँगस्टर’ यांसारखे अफलातून चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या तिग्मांशुने आणखी एका वेगळ्या कथानकाला हात घातला आहे. सिंगापूर आणि बर्मामध्ये युद्धबंदी असणाऱ्या ब्रिटिश- इंडियन आर्मीमध्ये कर्नल प्रेम सेहगल, कर्नल गुरबक्श सिंग ढिल्लों आणि मेजर जनरल शाह नवाझ खान या तिघांभोवती हे कथानक फिरणार आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

या तीन सैन्य अधिकाऱ्यांच्या भूमिकेत अभिनेता कुणाल कपूर, मोहित मारवा आणि अमित सध झळकणार आहेत. ‘राग देश’च्या ट्रेलरमध्ये या तिन्ही कलाकारांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत असून एकंदरीतच प्रेक्षकांना ऐतिहासिक वातावरणात घेऊन जात आहेत. या चित्रपटातून पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेना, भारत- इंग्रज संघर्ष, देशाचा स्वातंत्र्य लढा या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून २८ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.