वेब विश्वात प्रसिद्धी मिळवलेली आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आहाना कुमरा हिची एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात प्रियांका गांधींची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी आहानाच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. खुद्द आहानानेच याविषयीच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

प्रियांका गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी आपली निवड झाल्याविषयी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीत आहाना म्हणाली, ‘हो. द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटात प्रियांका गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी मला विचारण्यात आलेलं. सध्या या चित्रपटातील माझ्या लूकवर काम सुरु असून, ते पूर्ण झाल्यावर चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सध्या अशीच माहितीही देण्यात आली आहे. मी स्वत: ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. चित्रपटातील या भूमिकांच्या लूकविषयी बरीच काळजी घेण्यात येत आहे. कारण, ही मंडळी खऱ्या आयुष्यात अस्तित्वात असून, देशाच्या राजकारणातही त्यांचा सहभाग आहे.’

आहाना आणि प्रियांका गांधी यांची चेहरेपट्टी बरीच मिळतीजुळती असल्यामुळे या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार, संजय बारु लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

https://www.instagram.com/p/Bgc2j4ugGRQ/

सुनील बोहरा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची धुरा हंसल मेहता यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर, विजय रत्नाकर गुत्ते या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.