चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री त्यांच्या अभिनयासाठी, अनोख्या अंदाजासाठी ओळखल्या जातात. तर काही अभिनेत्रींची ओळख ही त्यांच्या नृत्यकौशल्यामुळे निर्माण होते. अशाच अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे कतरिना कैफ. कतरिनाला तिच्या अभिनयापेक्षा नृत्यकौशल्यामुळेच प्रेक्षकांची अधिक पसंती मिळते. ‘चिकनी चमेली’ म्हणू नका किंवा मग ‘शीला की जवानी’, प्रत्येक गाण्यावर थिरकणाऱ्या कतरिनाचे ठुमके पाहून भलेभले थक्क झाले होते. आपला हाच प्रभाव कायम ठेवत ती पुन्हा एकदा आपल्या तालावर सर्वांना नाचवण्यासाठी सज्ज झाली आहे.
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात कतरिनाला नृत्याचे धडे देणार आहे. पहाडी प्रकारात मोडणाऱ्या या नृत्यासाठी सध्या कतरिना बरीच मेहनत घेत असून दिवसातील पाच तास ती या नृत्याचा सराव करत असल्याचे वृत्त ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केले. पुढच्या आठवड्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात येणार असून त्याआधी कतरिना तिचे सर्वस्व पणाला लावून मेहनत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील एका नृत्यप्रकारापासून या गाण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रभुदेवाने या गाण्यासाठी पारंपरिक पहाडी आणि जिम्नॅस्टीक्स अशा प्रकारच्या डान्स स्टेप्सचा मेळ साधत नृत्यदिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिम्नॅस्टिक्ससाठी सहाजिकच शरीर लवचिक असण्याची गरज आहे. त्यामुळेच कतरिनाने योग्य ती काळजी घेत व्यायाम आणि आहाराच्या सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जास्तीत जास्त प्रथिने असणाऱ्या डाएटच्या मदतीने ती सध्या स्नायूंच्या व्यायामावर भर देतेय.

‘बंदीच्या कचाट्यातून ‘पद्मावत’ सुटला, मला आनंद झाला’

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील या गाण्यासाठी कतरिना घेत असलेली मेहनत पाहता आता ते गाणे पाहण्यासाठीच प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. गाण्याच्या सरावासाठी पाच तास खर्ची घालणाऱ्या या अभिनेत्रीच्या कारकिर्दीमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ एक महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.