अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या शैलीतील सलमानची झलक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. खुद्द सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ‘अखेर तो क्षण आला… वाघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज आहे’, असे लिहित त्याने हा ट्रेलर सर्वांच्या भेटीला आणला आहे.

या चित्रपटातून एका नव्या कथानकाला सादर करण्यात येणार असून, त्याची झलक ‘टायगर…’च्या ट्रेलरमधून पाहायला मिळते. कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये साहस दृश्यांचीही भर घालण्यात आली आहे. आतापर्यंत कधीही न पाहाण्यात आलेली साहसदृश्ये या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. जिथे ‘एक था टायगर’ या चित्रपटाचे कथानक जिथे थांबले होते तिथूनच ‘टायगर जिंदा है’च्या कथानकाला सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमधील संवाद आणि कलाकारांचे अभिनय जमेची बाजू ठरत असून, पार्श्वसंगीत आणि एकंदर रंगवलेला माहोल पाहता काही क्षणांसाठी आपण एका वेगळ्याच दुनियेत गेल्याची अनुभूत ट्रेलर पाहताना होते.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर कतरिना आणि सलमान रुपेरी पडद्यावर एकत्र झळकत असल्यामुळे त्यांचं समीकरण नेमकं कसं असेल याविषयीसुद्धा प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. अली अब्बास जफरने या चित्रपटाच्या दिग्दर्शनात बरेच बारकावे टिपले असून, त्याचे परिणाम ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडिया आणि युट्यूबवर अनेकांनी हा ट्रेलर पाहिला असून, या चित्रपटाचा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. त्यामुळे आता भाईजान सलमानचा ‘टायगर…’ तिकीटबारीवरदेखील डरकाळी फोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.