दंगल गर्ल म्हणून नावारुपास आलेली बालकलाकार झायरा वसिम लवकरच सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. अशा या बहुचर्चित चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘आय विल मिस यू…. हू तने प्रेम करु छू’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात किशोरवयीन वयात एखाद्याप्रती आकर्षण वाटण्याची जी भावना असते ती अचूकपणे या गाण्यातून मांडण्यात आली आहे.

एकमेकांना चोरुन पाहणं, जत्रेत जाणं, एकमेकांचा खाऊ वाटून घेणं या अगदी लहान गोष्टी त्या वयात आपल्याला किती महत्त्वाच्या असतात यावर गाण्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. कौसर मुनिरच्या शब्दांना अमित त्रिवेदीने संगीतबद्ध करत या गाण्याची रंगत वाढवली आहे. तर कुशल चोकशीच्या आवाजात गाणं एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात आहे.

वाचा : यांनी घेतला होता सलमानशी पंगा 

झायरा वसिमची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. गायिका होण्यासाठीचा एका तरुणीचा संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. दिवाळीत तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानची निर्मिती असलेल्या या ‘सिक्रेट सुपरस्टार’कडून सिनेरसिकांना फार अपेक्षा आहेत. तेव्हा आता प्रेक्षकांची अपेक्षापूर्ती होणार की अपेक्षाभंग हे दिवाळीत कळेलच.