25 March 2019

News Flash

BLOG : रुपेरी पडद्यावरील ‘शेतकरी नायक’

चित्रपटातील शेतकरी जीवन आजच्या चकाचक मनोरंजनात बरेच दुर्मिळ झालंय.

आजच्या पिढीला कदाचित बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बिघा जमीन’ (१९५३) हा चित्रपट माहित नसेल. शेतकऱ्याची व्यथा मांडणारा हा चित्रपट आजही पाहताना हेलावून टाकतो. पश्चिम बंगालमधील एका खेड्यातील शंभू महातो  (बलराज साहनी)  हा शेतकरी गावचा जमिनदार ठाकूर हरमन सिंग  (मुराद) याच्या कर्जाखाली अगोदरच दबला गेलाय. त्यात पावसाने दडी मारल्याने दुःखात भर पडलीय. आपले पिता (नाना पळशीकर), आपली पत्नी पार्वती  (निरुपा रॉय) व आपल्या मुलांचे गुजराण कसे करायचे ही त्याच्यापुढील समस्या. तर त्याने आपला शेतजमीनीचा तुकडा आपल्याला दिल्यास त्याचे कर्ज माफ करू अशी जमिनदाराची मागणी. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तो कोलकत्ता  (पूर्वीचे कलकत्ता)  येतो आणि ‘माणूस रिक्षा’ चालवतो. अतिशय कष्टाचे व दमछाक करणारे हे काम असते. चित्रपट येथे आणखीन काही वळणे घेतो.

चित्रपटातील शेतकरी जीवन आजच्या चकाचक मनोरंजनात बरेच दुर्मिळ झालंय. पण पूर्वी हिंदी-मराठीसह जवळपास सर्वच भाषांत मोठ्याच प्रमाणात  ग्रामीण चित्रपट निर्माण होत. खरा भारत खेड्यात राहतो हे पूर्वीच्या अनेक चित्रपटातून दिसे. अशातीलच एक महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणजे, बी. आर. चोप्रा यांचा ‘नया दौर’ ( १९५७). औद्योगिक विकासामुळे यंत्रयुगाचा उगम झाला. त्यामुळेच मानवी हाताची जागा यंत्र घेणार व माणसाच्या हाताला काम राहणार नाही अशा सूत्रावर हा चित्रपट होता. आता हे या चित्रपटात कसे साकारले?  तर एका छोट्या गावातील टिंबर इस्टेट या कंपनीच्या मालकाचा मुलगा गावात मोटरबस आणू इच्छितोय. पण ती आली तर आपल्या सगळ्याच टांगेवाल्याची अडचण होणार, व्यवसाय बुडणार अशी शंकर टांगेवाल्याला (दिलीप कुमार) भीती वाटते आणि एक नवा संघर्ष सुरु होतो. पूर्वी ग्रामीण जीवनावर  (इन्साफ जाग उठा, संघर्ष इत्यादी)  अनेक चित्रपट आले. तसेच बंधन (राजेश खन्ना), धरती कहे पुकार के (जीतेंद्र), खानदान (सुनील दत्त) अशा अनेक चित्रपटाचा नायक शेतकरी असे.

मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ ( १९५८) ची राधा (नर्गिस)  ही देखील शेतकरीच. आपल्या पतीच्या (राजकुमार)  निधनानंतर आपल्या दोन मुलांना (सुनील दत्त व राजेंद्र कुमार) लहानाचे मोठे करताना ती आपल्या शेतात नांगर चालवते. हे काम खूपच कष्टाचे. पण तिचा नाईलाज असतो. शेतकरी नायक याचा अगदी वेगळाच किस्सा. ‘शहीद’ चित्रपटाला सर्वोत्तम कलाकृतीचा मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास मनोजकुमार नवी दिल्लीत गेला असता तात्कालिक पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्याला ‘जय जवान, जय किसान’ या धोरणाचा पाठपुरावा करणारा एक चित्रपट निर्माण करायचे सुचवले. मनोजकुमारने हे खूप गांभिर्याने घेतले आणि ‘उपकार’ या चित्रपटाची पटकथा लिहिलीच पण या चित्रपटापासून तो निर्माता-दिग्दर्शकही झाला. ‘उपकार’ला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातील ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ हे गाणे तेव्हापासून प्रत्येक राष्ट्रीय सणामध्ये सर्वप्रथम स्थान मिळवू लागले.

सत्तरच्या दशकापासून हिंदीतील ग्रामीण नायक कमी होत गेला. (अपवाद ‘सगीना’)  चित्रपटाचा नायक ‘शेतकरी’ असू शकतो हे दुर्मिळ होत गेले. (अपवाद ‘बेटा’) आशुतोष गोवारीकरने ‘लगान’ (२००१) मध्ये कष्टकरी शेतकरी व पाऊस खूपच लांबल्याने त्यांची होत असलेली व्यथा-वेदना याना वेगळ्या प्रकारे साकारले. त्याने दीडशे वर्षापूर्वीचा काळ त्यासाठी निवडला. पाऊस नसल्याने पीक नाही व उत्पन्नही नाही. अशा वेळेस चंपानेरच्या शेतकऱ्यांपुढे प्रश्न पडतो की इंग्रजांचा शेतसारा  (लगान)  कसा भरायचा?  यावर शेतकरी भुवन  (आमिर खान) इंग्रजांना सांगतो की,  तुमचा क्रिकेट खेळ आम्ही शिकतो. आणि आपल्या दोन संघात क्रिकेटचा सामना आयोजित करु. आमचा संघ जिंकल्यास आम्हाला ‘लगान’ माफ. आशुतोषनेच ‘स्वदेस’ (२००३) मध्ये अजूनही आपल्या देशातील अनेक गावांत वीजच पोहचली नसल्याचे व तेथील जीवन श्रध्दा-अंधश्रद्धेत रमल्याचे चरणपूर या गावाला प्रातिनिधिक स्वरूप देत मांडले. शेतकऱ्यांची जीवनशैली  (धरती की गोद मे), एकत्रितपणे गीत संगीत नृत्याचा आनंद (दुश्मन), पावसाच्या प्रतीक्षेत गाणे  (लगान)  अशा अनेक गोष्टींतून कधी शेतकरी तर कधी ग्रामीण जीवनाचे दर्शन घडलयं.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मराठीत ‘ग्राभीचा पाऊस’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे काही चित्रपट आलेत. मराठीत पूर्वी खूपच मोठ्या प्रमाणात ग्रामीण चित्रपट निर्माण होत.  ‘गावाकडच्या गोष्टी’ आपल्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवतात. त्यात कदाचित ग्लॅमर नसेल पण खरेपण नक्कीच आहे. हिंदी चित्रपटाने ती वाट विसरु नये. ‘शेतकरी नायक’च्या सुख-दुःखाची पटकथा साकारावी.
दिलीप ठाकूर

First Published on March 13, 2018 12:10 pm

Web Title: bollywood movies about indian farmers and their problems blog by dilip thakur