विविध प्रकारचे चित्रपट आणि त्या चित्रपटांच्या कथानकांनी आजवर अनेकांनाच भुरळ घातली आहे. कलाकार त्यांच्या विविध चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी तयार झाले आहेत. फेब्रुवारी महिना हा खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजनाचाच महिना ठरणार आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ‘फुगे’, ‘ध्यानीमनी’, ‘रांजण’, ‘जॉली एलएलबी २’ यांसारखे चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातील काही चित्रपट सध्या प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘बघतोस काय मुजरा कर’ आणि ‘रनिंग शादी डॉट कॉम’.

या चित्रपटामागोमाग प्रेक्षकांच्या भेटीला येणारे चित्रपट म्हणजे ‘ध्यानीमनी’ आणि ‘फुगे’. प्रेक्षकांना कायमच नाविन्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या महेश मांजरेकरांची ही निर्मिती असून महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ‘ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसची ही कलाकृती आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं अत्यंत कल्पक असं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या अत्यंत ताकदीच्या अभिनयानं चित्रपटातील आपल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अश्विनी भावे ह्या कसलेल्या अभिनेत्रीचा अभिनय बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना १० फेब्रुवारीला बघायला मिळणार आहे.

१० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत असलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ‘फुगे’. या चित्रपटाची निर्मिती अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून, स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टींवर भाष्य करणारा आहे. यात सुबोध भावे याची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. स्वप्नील-सुबोधच्या या हटके कॅमिस्ट्रीची बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा नकीच प्रेक्षकांना रॉम-कॉम मेजवानी देणारा ठरणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे अनेक प्रेमकथा आल्या, या सर्वांपेक्षा ‘रांजण’ हा चित्रपट वेगळा ठरणार आहे. ‘रांजण’मध्ये एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमाची कथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते, मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात दोन नवीन चेहरे दिसणार आहेत. दोन नवीन चेहरे असले तरी एक ताकदीचा कलाकारही या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे विद्याधर जोशी. या सिनेमातून ते पुन्हा एकदा खलनायिकाची भूमिका साकारणार आहे. विद्याधर जोशी यांच्यासोबतच विनोदाचे हुकमी एक्के भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. असे हे मराठी सिनेसृष्टीतले तगडे अभिनेते रांजण या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या मराठी चित्रपटांमागोमाग बॉलिवूडमध्येही काही दर्जेदार चित्रपटांची मेजवानी तयार आहे. अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काळा कोट, वकिली रुबाब, कोर्ट, खटला आणि या सर्वाला बनारसची पार्श्वभूमी असलेल्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जवळ आली आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा हा आगामी चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

‘गाझी अटॅक’ या चित्रपटाद्वारे या महिन्यात भारताची पहिली सागरी लढाईचा थरार प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या लढाईबद्दल कोणालाच काही माहित नाही कारण ही एक गुप्त मोहीम होती. ही मोहीम १९७१ मध्ये भारतीय पाणबुडी एस-२१ मधील त्या जवानांची आहे, ज्यांनी पाकिस्तानच्या पीएनएस गाझी पाणबुडीपासून भारताच्या आयएनएस विक्रांतला बुडण्यापासून वाचवले होते. याशिवाय या जवानांनी विशाखापट्टणमला पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासूनही वाचवले होते. ही कथा १८ दिवस पाण्याखाली घालवलेल्या त्या नौदल अधिकाऱ्याच्या टीमची आहे. १७ फेब्रुवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणा एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल तर तापसी निर्वासिताची भूमिका साकारत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे दर्शन होत आहे. प्रेमाचा त्रिकोण दाखविणाऱ्या या चित्रपटात लव्ह (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (धोका) या त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक पाहायला मिळू शकते. धैर्य, ग्लॅम्बर आणि रोमान्सची सांगड घालणारा हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.