हिंदी साहित्यात अनेक प्रेमकहाण्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रेमकथांचे चित्रपट बनताच रसिकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळतो. मराठीत अशा प्रेमकथा तुलनेने खूपच कमी आहेत. रणजीत देसाई यांनी ‘स्वामी’ कादंबरीच्या माध्यमातून प्रेमकहाणीचा पहिला प्रयोग केला. त्यामुळे मराठी चित्रपटांनीही असे प्रयोग सातत्याने करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी येथे केले.
 चतुरंग प्रतिष्ठानच्या मुक्त संध्या कार्यक्रमात डोंबिवलीत सुयोग मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्मिता गवाणकर यांनी मृणाल कुलकर्णी यांची मुलाखत घेतली.
अभिनेते रवींद्र मंकणी या वेळी उपस्थित होते. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात दुपारची वेळ मिळते. या वेळात रसिक प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाहीत.
प्रतिसाद न मिळाल्याने एका आठवडय़ात मराठी चित्रपट चित्रपटगृहातून काढले जातात. मराठी चित्रपटरसिकांच्या सोयीप्रमाणे चित्रपट प्रदर्शित करावेत, यासाठी आपण अनेक वेळा प्रयत्न केले, असे मृणाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आजोळकडून झालेले संस्कार, इतिहासाची आवड यामुळे आपण ‘रमा माधव’ चित्रपटाकडे वळलो. हा चित्रपट तयार करण्यापूर्वी खूप वाचन केले. यापूर्वी ऐतिहासिक भूमिका केल्या असल्याने हा चित्रपट करण्याचे धाडस केले, असे मृणाल यांनी सांगितले.