सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘राबता’ चित्रपट सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत आणि क्रिती यांची वाढती जवळीकही ‘राबता’ला प्रकाशझोतात आणते आहे. पण, या सर्व वातावरणामध्ये संगीतकार प्रितमने मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. प्रितमने फेसबुक पोस्ट करत आपण या चित्रपटातून काढता पाय घेतला असल्याचं जाहीर केलं आहे.

‘काही दिवसांपूर्वी मी या चित्रपटासाठी ‘सोलो अल्बम’ला संगीत द्यायचा निर्णय घेतला होता. पण चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांनी हे (राबता) गाणं या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी आता या चित्रपटातून काढता पाय घेत आहे. मी चित्रपटाच्या क्रेडिट्समधूनही माझं नाव वगळण्यात यावं, अशी विनंती निर्मात्यांना केली आहे. चित्रपटाचा अल्बम माझी कंपनी पूर्ण करेल.’ असं प्रितमने त्याच्या एफबी पोस्टमध्ये म्हटलंय.

‘एजंट विनोद’ या चित्रपटातील प्रितमनेच संगीतबद्ध केलेल्या ‘कुछ तो है तुझसे राबता’ या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन ‘राबता’ या चित्रपटामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आलं आहे. त्यामुळेच प्रितमने अल्बमचे निर्माते भूषण कुमार आणि चित्रपट दिग्दर्शक दिनेश व्हिजन यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. प्रितमच्या आतापर्यंतच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार तो कधीही जुन्या गाण्यांचं रिक्रिएटेड व्हर्जन त्याच्या अल्बममध्ये वापरत नाही. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

याविषयीच चित्रपट निर्माते भूषण कुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, ‘या सर्व अफवा असून प्रितमने ती पोस्ट आम्हाला कल्पना देऊनच केली आहे. त्याने कोणत्याच बाबतीत नाराजी व्यक्त केली नाहीये. पण, हो …पण, अल्बममध्ये सहभागी न होणं आणि चित्रपटाला रामराम ठोकणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो.’ असं ते म्हणाले.

स्वत: किंवा इतर कोणीही संगीतबद्द्ध केलेल्या गाण्यांना रिक्रिएट करुन पुन्हा चित्रपटात वापरण्याला प्रितम प्राधान्य देत नाही. पण, तरीही हल्लीचा ट्रेंड आणि रिक्रिएटेड गाण्यांचं वाढतं प्रस्थ पाहता ‘राबता’मध्ये त्याच्या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, ९ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘राबता’ या चित्रपटातून हटके कथानकाला साद घातली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.