बॉलिवूडमध्ये गाजलेल्या लोकप्रिय संगीतकार जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे जतिन-ललित. जो जीता वहीं सिकंदर, जब प्यार किसी से होता हैं, कुछ कुछ होता हैं, डीडीएलजे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना या दोघांनी संगीत दिलं. त्यामुळे या जोडीला विसरणं प्रेक्षकांना शक्य नाही. विशेष म्हणजे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जतिन यांच्या मुलानेदेखील संगीत विश्वात पदार्पण केलं असून त्याचं तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

अलिकडेच राहुल जतिन यांच्या मुलाचं ‘यादें आने लगी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला राहुलचा स्वरसाज चढला असून त्याचे वडील व प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जतिन पंडित यांनी शब्दबद्ध केलं आहे.

“बदलत्या काळाप्रमाणे तरुणांची संगीताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. रोहितच्या काळातील मुलांचा संगीताच्या बाबतीत असलेले विचार वेगळे आहेत. जेव्हा रोहितने मला हे गाणं ऐकवलं त्यावेळी मी थक्क झालो होतो. कारण हे ऐकल्यानंतर मला पहला नशा हे गाणं पटकन आठवलं. त्यामुळे मी त्याला मदत करण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं”, असं जतिन पंडित म्हणाले.


“आजच्या तरुण पिढीला आवडेल असंच हे रोमॅण्टिक गाणं आहे. मला कायम गाण्यातून खरे भाव सादर करायला आवडतात. सध्या सगळीकडे जी परिस्थिती आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी मी हे गाणं तया केलं आणि ते माझ्या आई-वडिलांना ऐकवलं. हे गाणं ऐकल्यानंतर माझ्या वडिलांनी गाण्यांचे बोल थोडेसे त्यांच्या पद्धतीने बदलले आणि हे गाणं रेकॉर्ड करा असं सांगितलं. या लॉकडाउनच्या काळात योग्य ती खबरदारी घेत आम्ही मुंबईत या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर मी अनलॉकच्या काळात अमेरिकेत गेलो आणि तिकडे डॉ. संधू यांना ऐकवलं व त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्रीकरणाला सुरुवात झाली”, असं राहुल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “भारताबाहेर चित्रीत झालेला हा माझा पहिला म्युझिक व्हिडीओ आहे. करोना संकटात हे शूट करणं खरं तर आव्हानात्मक होतं. मात्र, योग्य ती खबरदारी घेत आम्ही काम केलं. सॅन फ्रान्सिस्को, जेम्स टाउन, कॉपरोपोलिस, बे एरिया आणि सोनोरा येथे या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे”.

‘यादें आने लगी’ हे गाणं अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल मॅडिसन ट्रनलपर हिच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. तसंच या संपूर्ण गाण्याचं चित्रीकरणदेखील अमेरिकेत पार पडलं आहे.