गाण्याचा मुखडा वाचताच तुम्ही पुढे म्हणाला असाल,
क्या गम है जिसको छुपा रहे हो
महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ’ (१९८२) या चित्रपटातील ही जगजीत सिंगची अप्रतिम गझल. ती कैफी आझमी यांनी लिहिली असून जगजित सिंग यांनी गायली व स्वरबद्ध केली आहे. हिंदी चित्रपटातील गझल गीत परंपरेतील ही एक सर्वोत्तम गझल मानली जाते. नुसती ऑडिओवर जरी ती ऐकली तरी त्यातील अस्वस्थता कमालीची जाणवते हे या गीताचे आणखीन एक वैशिष्ट्य.

आँखों में नमी, हँसी लबों पर
क्या हाल है, क्या दिखा रहे हो

चित्रपटात एका अतिशय अवघड प्रसंगी ही गझल आहे. आपला पती इंदर (कुलभूषण खरबंदा) परस्त्रीच्या कविताच्या (स्मिता पाटील) प्रेमात पडून तिच्यासोबत राहू इच्छितोय हे समजताच पूजा (शबाना आझमी) हादरून जाते, नवर्‍याशी भांडूनही उपयोग होत नाही. त्याच्याकडून घटस्फोटाची मागणी होते. कविताशी वाद घालूनही काहीच उपयोग होत नाही. अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या पूजाला तिचा मित्र राज (राज किरण) साथ देतो. मानसिक आधार देतो. तेव्हा हे गाणे आहे,

जिन जख्मों को वक्त भर चला है
तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो

गाण्यात शबाना आझमी कमालीच्या एक्सप्रेशनने आपले दु:ख व्यक्त करतेय. राज किरण तिची जमेल तशी समजून घालतोय. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तिला मात्र या एकूणच परिस्थितीवर काय बरे बोलायचे हा प्रश्न पडलाय. ती नि:शब्द झालीय.

रेखाओं का खेल है मुकद्दर
रेखाओं से मात खा रहे हो

कैफी आझमी आता तात्विक होतात. त्यामुळेच या गझलचा प्रभाव आणखीनच वाढतो. प्रशस्त घरात या गझलचे चित्रीकरण असले तरी गाण्याचा भावूक सूर पाहता ते साधारण एक दोन खोलीतच घडतेय पण त्यापेक्षाही रचना व गायन शैलीने गाणे जास्त प्रभाव दाखवते. राज किरणला रुपेरी पडद्यावर साकारायला मिळालेले हे सर्वोत्तम गीत आहेच. गझल म्हणून ऐकावेसे वाटले तरी आपण मंत्रमुग्ध होतो तर मग आणखीन काय हवे? त्यातला ‘अर्थ’ महत्त्वाचा ठरतोय.
दिलीप ठाकूर