दिलीप ठाकूर
साठ-सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटातील एक हुकमी गोष्ट म्हणजे, पियानोवरचे गाणे. आणि काही वेळेस त्यातही हुकमी टच म्हणजे, हे प्रेमभावना व्यक्त करणारे गाणे आपल्याचसाठी आहे असे दोन व्यक्तिरेखेना एकाच वेळेस वाटत राहणे आणि त्यांनी तसेच व्यक्त ही होत राहणे. त्यात जर त्या दोन नायिका त्या चित्रपटात सख्ख्या बहिणी असतील तर…

आप के हसीन रुख़ पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है
आप के निगाह ने कहा तो कुछ ज़रूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है

मोहम्मद रफी अतिशय तन्मयतेने गायलाय आणि धर्मेंद्र ते पियानो वाजवत सादर करतोय आणि माला सिन्हा व तनुजा या दोघीनाही वाटतेय, प्रेमाची ही स्तुती फक्त आपल्यासाठी आहे. या दोघी बहिणीँच्या भूमिकेत आहेत.

खुली लटों की छाँव में खिला खिला ये रूप है
घटा से जैसे छन रही, सुबह सुबह की धूप है
जिधर नज़र मुड़ी, उधर सुरूर ही सुरूर हैं

गुरुदत्त फिल्मच्या शहीद लतिफ दिग्दर्शित ‘बहारें फिर भी आयेंगी'(१९६६) या प्रेम त्रिकोणातील हे गाणे. हा चित्रपट निर्मितीत असतानाच गुरुदत्तचे निधन झाल्याने हा चित्रपट पूर्ण होणे थोडेसे लांबलेच. पण अंजान यांची गीते व ओ. पी. नय्यर यांचे संगीत यांचा सूर छान जमला होता.

झूकी झूकी निगाह में भी हैं बला की शौखियाँ
दबी दबी हसी में भी तड़प रही हैं बिजलियाँ
शबाब आप का नशे में खुद ही चूर चूर है

एखाद्या युवतीच्या प्रसन्न आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे एकादा युवक अतिशय मनमोकळेपणे कौतुक करताना ज्या ज्या छान शब्दांचा वापर करेल ते या गाण्यात आहे. माला सिन्हा व तनुजा आपापल्या विश्वात दंग होऊन ही तारीफ ऐकताहेत आणि तेवढ्याच छान लाजताहेतही. त्यात कमालीचा गोडवा असल्याने या गाण्याची गोडी आणि रुची अधिकच खुलते. विशेषतः तनुजा जास्त इम्प्रेस करते.

जहाँ जहाँ पड़े कदम वहाँ फ़िज़ा बदल गई
के जैसे सरबसर बहार आप ही में ढल गई
किसी में ये कशिश कहाँ जो आप में हुजूर है

अगोदर माला सिन्हा शहारते व जागेवरुन उठते. तनुजा याच स्तुतीने तल्लीन झाली आहे. दोघीही हरखून व हरवून गेल्यात. हे गाणे आपल्याचसाठी आहे याची दोघीनाही मनोमन खात्री आहे. धर्मेंद्र मात्र मनोमन गात हाच प्रसन्न मूड आणखीन खुलवतोय. साठच्या दशकात धर्मेंद्र असा फारच प्रेमळ असे.

आता तनुजा पियानोपर्यंत आलीय. तिला पूर्ण विश्वास आहे की हे सर्व आपल्याचसाठी गायले जातेय. माला सिन्हाही त्याच विश्वासात आहे. पण धर्मेंद्रच्या ह्रदयात नेमके कोण आहे? गाणे संपता संपता रेहमान व देवेन वर्माचे आगमन होते व धर्मेंद्रला तेथे पाहून आश्चर्यचकित होतात. संपूर्ण गाणे एकाच जागेवर घडत असूनही ते मस्तच खुललयं. तेच तर महत्त्वाचे असते ना?