14 December 2018

News Flash

शब्दांच्या पलिकडले : बेकरार कर के हमे यूँ ना जाईए

गाण्याचा भावार्थ व सादरीकरण आकर्षक आहे.

सौजन्य - यूट्युब

बेकरार कर के हमे यूँ ना जाईए…
गाण्याचा मुखडा ऐकताच तुम्ही सहज पुढे गुणगुणला असाल,
आपको हमारी कसम लौट आईये…

असे असले तरी हे गाणे नेमके कोणत्या चित्रपटातील? कोणी बरे अभिनित केले असेही काहीना प्रश्न पडले असतील. याची उत्तरे देण्यापूर्वी हिंदी चित्रपट संगीताचे एक वैशिष्ट्य सांगतो. विशेषत: साठ सत्तरच्या दशकात अभिनयात कच्चा लिंबू म्हणून ओळखले गेलेल्या अनेक नायकांच्या नशिबी अभिनय, नृत्य व सौंदर्य यांचा छान मिलाफ असणार्‍या अभिनेत्री आल्या.

येथेही तेच. बीरेन नाग दिग्दर्शित ‘बीस साल बाद’ (१९६२) या चित्रपटातील हे सुमधूर गाणे आहे. पण पडद्यावर गातो कोण? तर विश्वजीत. आजच्या पिढीतील अनेकांना कदाचित तो माहित नसावा. वहिदा रेहमानला उद्देशून तो हे गाणे गातो.
देखिये वो काली काली बदलियाँ
जुल्फ की घटा चुरा न ले कहीं
एका छान माळरानावर प्रियकर आपल्या प्रेयसीला साद घालत म्हणतोय की अशी निघून जाऊन मला बेचैन करु नकोस. परत ये. त्याची विनवणी ती सहजी मान्य करत नाही. म्हणूनच तो निसर्ग सौंदर्य व छान वातावरण याचे संदर्भ देत देत तिला थांबवायचा प्रयत्न करतोय. ती मात्र हलकसं हसत हसत त्याला हुलकावणी देतेय.

देखिए गुलाब की वो डालियाँ
बढ़ के चूम ले न आपके कदम
कृष्ण धवल अर्थात ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ चित्रपटाचा तो काळ असला तरी गाण्याचा भावार्थ व सादरीकरण रंगीत म्हणजेच आकर्षक असे. या गाण्यात प्रियकर प्रेयसीला एकदा पडता पडता वाचवून थांबण्याची विनंती करतो. संगीतकार हेमंतकुमार यानीच हे गाणे अगदी मुलायमपणे गायलयं. या चित्रपटाचे निर्मातेही तेच. तर शकील बदायुनी यांचे हे गीतलेखन आहे. पण आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हा थरारक भूतपट आहे. पण त्या काळात अशा व रहस्यरंजक चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गीत-संगीत देखील श्रवणीय असे.

जिंदगी के रास्ते अजीब हैं
इन में इस तरह चला न किजीए
प्रियकर आता आणखीन काही संदर्भ देत प्रेयसीची स्तुती करतोय. वहिदा रेहमानला संपूर्ण गाण्यात विविध प्रकारच्या भावछटा व्यक्त करायच्यात. त्या ती खुबीने करते. विश्वजीतच्या गीत सादरीकरणापेक्षाही आपण तिचा या गाण्यातील सहभागाला अधिकच दाद देतो यात काहीही गैर नाहीच.
दिलीप ठाकूर

 

First Published on November 15, 2017 1:05 am

Web Title: bollywood music hindi movie bees saal baad song bekarar karke hume yun na jaiye