काही काही हिंदी चित्रपट गीते आपण अनेक वर्षे आवडीने ऐकतो, गुणगुणतो पण ती गाणी पाह्यचा योग क्वचितच येतो. काही श्रवणीय गाणी तर अशी आहेत की ती पाहावीतच असे फारसे वाटतही नाही. पण ऐकल्यावर मन तृप्त होते. हे देखिल अगदी तसेच,

चलते चलते, मेरे ये गीत याद रखना
कभी अलविदा ना कहना

एव्हाना तुम्हीदेखिल मंद स्मित हास्य करीत या गाण्याच्या गोडव्यात हरखून गेला असाल. हे गाणे भीष्म कोहली निर्मित व सुंदर दार दिग्दर्शित ‘चलते चलते’ (१९७६) या चित्रपटातील आहे आणि ते चित्रीत झालेय विशाल आनंद व सिमी गरेवाल या रोमॅन्टिक जोडीवर. या तपशीलापेक्षाही गाण्यातील आशय मोठाच आहे ना? पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायला हवी. निर्माता भीष्म कोहली हाच हीरो विशाल आनंद होय. व्यक्ती एकच पण नावे दोन. आणि हा विशाल आनंद बंधुंचा जवळचा नातेवाईक. म्हणूनच त्याच्या रुपेरी पडद्यावरील वावरात देव आनंदचा प्रभाव.

प्यार करते करते, हम तुम कहीं खो जाएंगे
इन्ही बहारों के, आँचल में थक के सो जाएंगे

एका गार्डनमध्ये विशाल आनंद सिमी गरेवालवर असे छान गात गात प्रेमाचा मनमोकळा वर्षाव करतोय. सगळे गाणे त्या गार्डनमध्येच चित्रीत झाल्याने फार काही कल्पकतेला वाव नाही. गाणे पुढे जात राहते व त्या दोघांचा प्रणय रंगात येत राहतो. त्यात रंगत येण्यासाठी थोडासा धूर सोडलाय, विशाल मध्येच फूले तोडतो असे घडते.

बीच राह में दिलवर, बिछड़ जाएं कहीं हम अगर
और सूनी सी लगे तुम्हें, जीवन की ये डगर

किशोरकुमार खूपच सहज गायलाय. कदाचित नेहमीप्रमाणेच एखाद्या स्टारसाठी गायचे नसून एका नवीन चेहर्‍यासाठी गायचयं याचा फायदा त्याला झाला असेल. अमित खन्नाने गाणे अगदी काव्यात्मक लिहिलयं. भप्पी लाहिरीच्या संगीतामधील काही लोकप्रिय गाण्यातील हे एक आहे.

हम लौट आएंगे, तुम यूँही बुलाते रहना
कभी अलविदा …

एव्हाना तुम्ही नक्कीच हे गाणे गुणगुणु लागले असणार आणि कधी सहज जुन्या गाण्यात रमताना हे गाणे तुमच्या ओठावर येणारच. गायला सोपी असणारी गाणीच जास्त लोकप्रिय ठरतात.
दिलीप ठाकूर