प्रेयसीच्या अथवा आवडू लागलेल्या स्त्रीचे आकर्षक व्यक्तिमत्व, लाघवी सौंदर्याची स्तुती करणारी हिंदी चित्रपट गीते तशी केवढी तरी. त्यातील काही गाणी ऐकताना जास्त गोड वाटतात की ती पाहताना जास्तच तरल वाटतात याचे उत्तर सहजी न मिळणारे अथवा मिळवू देखील नये. असेच हे एक उत्कट प्रेम काव्य…..

चौदहवीं का चाँद हो या आफ़ताब हो
जो भी हो तुम ख़ुदा की क़सम लाजवाब हो

रसिकांच्या किमान दोन पिढ्यांच्या डोळ्यासमोर एव्हाना ‘गुरुदत्त फिल्म्स’च्या ‘चौदहवी का चाँद’ (१९६०) मधील एका प्रशस्त घरात आरामदायक पलंगावर पहुडलेल्या वहिदा रेहमानच्या सोज्वळ सौंदर्याची विविध विशेषणे लावत गाणारा गुरुदत्त नक्कीच आला असणार. अर्थात या चित्रपटाच्या कथानकानुसार ही गाण्याची जागा आहे व तसेच त्याचे सादरीकरण आहे. पण  काही जुनी चित्रपट गीते ध्वनिफित व त्याचे चित्रीकरण याच्याशी इतकी व अशी एकरूप झालीत की तब्बल पन्नास-साठ वर्षांनंतरही प्रेक्षकांवर त्यांचा ठसा कायम आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. सादिक यांचे असले तरी कॅमेर्‍याच्या अगदी लयीपासून गुरुदत्त टच जाणवतो.

ज़ुल्फ़ें हैं जैसे कांधो पे बादल झुके हुए
आँखे हैं जैसे मय के पयाले भरे हुए
मस्ती है जिस में प्यार की तुम वो शराब हो

अंगावर  मोरपीस फिरवल्यागत होत असलेल्या स्तुतीने जाग येणे आणि मग अतिशय लाडिक मुद्रेने तर कधी हलकेच हसून तर कधी मधाळपणे प्रियकराकडे पाहणे आलेच. वहिदा रेहमान या सर्वच छटा, मुद्रा अत्यंत निरागसपणे व्यक्त करते म्हणूनच त्या जास्तच भावतात. असे म्हणतात की, गुरुदत्त प्रेमाचा अभिनय करता करता खरोखरच वहिदा रेहमानकडे आकर्षित झाला हे या गाण्यात प्रकर्षाने दिसतेय.

चेहरा है जैसे झील में हंसता हुआ कंवलया ज़िन्दगी के साज़ पे छेडी हुई ग़ज़ल
जान-ए-बहार तुम किसी शायर का ख़्वाब हो

स्तुती जसजशी वाढत जाते तस तसा गुरुदत्त वहिदाच्या आणखीन जवळ येतो. कॅमेरामन नरीमन इराणी यानी हे अख्खे गाणे मूळ लयीत छान चित्रीत केल्याने त्याची आकर्षकता वाढलीय. शकील बदायुनी यांच्या या प्रमळ गीत-काव्याला रवि यांचे संगीत आहे तर मोहम्मद रफीनी गाण्याचे एक्स्प्रेशन उत्कटपणे साकारलयं. सर्वच बाबतीत हे जमून आलेले क्लासिक गाणे आहे.

होंठों पे खेलती हैं तबस्सुम की बिजलियाँ
सजदे तुम्हारी राह में करती हैं कहकशा
दुनिया-ए-हुस्न-ओ-इश्क का तुम ही शबाब हो

उर्दू भाषेच्या वापराने या गाण्याचे सौंदर्य आणखीनच खुललेय आणि वहिदाच्या रुपाला हे सगळेच वर्णन साजेसे झालेय. अतिशय शांतपणे प्रियकर आपल्या भावना व्यक्त करीत असल्यानेच आपणही या गाण्यात केव्हा बरे गुंतत/ गुरफटत जातो हेच आपल्या लक्षात येत नाही हेच या गाण्याचे यश आहे.

वहिदा रेहमानच्या सौंदर्याची स्तुती करणारा एक किस्सा सांगायलाच हवा.

ऐंशीच्या दशकात पाकिस्तानचा देखणा क्रिकेटपटू इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना एका मुलाखतीत स्त्री सौंदर्याची व्याख्या तू कशी करशील असा प्रश्न विचारला असता त्याने तितक्याच शांतपणे उत्तर दिले, हिन्दुस्तानमध्ये एक अभिनेत्री आहे. स्त्री सौंदर्याचे मूर्तिमंत प्रतिक…. वहिदा रेहमान.