22 September 2020

News Flash

शब्दांच्या पलिकडले : दो दीवाने शहर में…

अमोल पालेकर यांनी हिंदी चित्रपटातून साकारलेल्या काही श्रवणीय गाण्यातील हे एक आहे.

अमोल पालेकर आणि झरिना वहाब

दिलीप ठाकूर
लग्न झाल्यावर मुंबईत आपले स्वतःचे घर असावे अथवा मुंबईत आपले एक घर घेऊ आणि मग लग्न करून त्यात आपला नवीन संसार थाटावा असे स्वप्न पाहणारे प्रेमी प्रत्येक दशकात होते अथवा आहेत. सत्तरच्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रेमीही असे स्वप्न पाहत, याचे प्रतिबिंब भीमसेन दिग्दर्शित ‘घरोंदा’ (१९७७) या चित्रपटातही पडले आणि हे गाणे जन्माला आले,

दो दीवाने शहर में
रात में या दोपहर में
आबोदाना ढूँढते हैं
एक आशियाना ढूँढते हैं

छोटीसी बॅग हाती घेतलेला अमोल पालेकर आणि मध्यमवर्गीय रुपातील झरिना वहाब हे असेच प्रेमात आकंठ बुडालेले असतानाच जबाबदारीचे भानही कायम ठेवत अगोदर आपले घर घेऊ आणि मग लग्न करू असा विचार करून बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत येतात आणि गाऊ लागतात. सभ्यतेचे सर्व संकेत पाळत ते गाताहेत आणि त्या इमारतीच्या बांधकामाचे कामगार त्यांच्याकडे कुतुहल आणि कौतुकाने पाहताहेत.

इन भूलभूलैय्या गलियों में अपना भी कोई एक घर होगा
अंबर पे खुलेगी खिड़की या खिड़की पे खुला अंबर होगा
अस्मानी रंग की आँखों में, बसने का बहाना ढूँढते हैं

गुलजार यांच्या या गीतात नवतरुणांचे स्वप्न व्यक्त होतेय. संगीतकार जयदेव यांनी या गाण्यात अमोल पालेकरना भूपेंद्रचा आणि झरिना वहाबला रुना लैलाचा आवाज देत खरं तर आश्चर्याचा धक्काच दिला. पण पडद्यावर गाणे अगदी झकास खुललयं. अमोल पालेकर त्या दिवसात मध्यमवर्गीय सरळमार्गी नायक अशी प्रतिमा होती. ती या गाण्यासह चित्रपटात फिट बसली.

जब तारें जमीन पर जलते हैं, आकाश जमीन हो जाता है
उस रात नहीं फिर घर जाता, वो चाँद यहीं सो जाता है
पलभर के लिए इन आँखों में, हम एक ज़माना ढूँढते हैं

लहान मुले व इतर बांधकाम कामगार आपल्याकडे पाहताहेत याची जाणीव होताच हे प्रेमिक वांद्रे बॅन्ड स्टँडला मोकळ्या हवेत जातात आणि त्यांच्या स्वप्नाला गाण्यातून अधिकच मोकळी वाट मिळते. अमोल पालेकर यांनी हिंदी चित्रपटातून साकारलेल्या काही श्रवणीय गाण्यातील हे एक आहे. ‘दो दीवाने शहर में…’ मुंबईतील जीवनावर बरीच चित्रपट गीते आहेत. त्यात हे वेगळे आणि सहज गुणगुणावे असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2018 1:05 am

Web Title: bollywood music hindi movie gharaonda song do deewane shahar mein
Next Stories
1 ‘सविता दामोदर परांजपे’ तुमच्या भेटीला लवकरच
2 ‘प्रेमात पडण्याची मला अजिबात घाई नाही’
3 ‘लैला मजनू’वरून इम्तियाज- एकतामध्ये मतभेद?
Just Now!
X