दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपट संगीतातील मुरब्बी जाणकारांनी पटकन ओळखले असणार हे जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘गुलामी’ (१९८५) मधील गाणे आहे. अगदी वेगळ्याच मुखड्याने सुरु होणारे गाणे जेव्हा सर्वप्रथम रेडिओ अथवा कॅसेटवर ऐकायला मिळाले तेव्हा गाण्याचे बोल, रचना यामुळे कुतूहल वाढले होते. त्या काळात नवीन गाणे सर्वप्रथम रेडिओ वा कॅसेटवर ऐकायला मिळे आणि मग चित्रपट प्रदर्शित व्हायची वा व्हिडिओवर यायची वाट पहावी लागे. तो एक वेगळाच अनुभव असे.

जिहाल-ए-मस्ती मकुन-ब-रन्जिश,
बहाल-ए-हिज्र बेचारा दिल है

सुनाई देती है जिसकी धड़कन
तुम्हारा दिल या हमारा दिल है

सुफी गीत व पारसी शब्द हे तर समजले पण गुलजार यांचे गीत व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत हे एकत्र येणे कुतूहल निर्माण करणारे होते. कारण गुलजार यांची गीतरचना म्हटल्यावर आर. डी. बर्मन अथवा खय्याम यांचे संगीत असेच समीकरण पक्के असे. लता मंगेशकर व शब्बीरकुमार यानी हे राजस्थानच्या वाळवंटात साकारलेले गीत कितीदाही पहावे त्याच्या वेगळेपणाने सुखावते.

आता या गाण्याच्या मुखड्याचा अर्थ काय? अमिर खुसरु याच्या गाण्याचा हा मुखडा घेत पुढचे गाणे रचलयं. त्याचा अर्थ माझ्या या नाजूक ह्रदयावर प्रेम कर, त्याकडे निराशेने पाहू नकोस.

 

वो आके पहलू में ऐसे बैठे
के शाम रंगीन हो गई है (३)
ज़रा ज़रा सी खिली तबीयत
ज़रा सी ग़मगीन हो गई है

वाळवंटात हे गाणे साकारलयं. दिग्दर्शक जे. पी. दत्ताचे बरेचसे चित्रपट राजस्थान, पंजाब व उत्तर प्रदेश येथेच घडलेत. ते करतानाच त्याने स्थानिक लोकसंस्कृती व लोकसंगीत देखील चित्रपटात आणले. हे गाणे त्याच वैशिष्ट्याचे सर्वात मोठेच उदाहरण. अगदी तेथील ग्रामीण वस्त्रे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत टपावरुन प्रवास करणे वगैरे अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून तो दर्शन घडवतो.

(कभी कभी शाम ऐसे ढलती है
के जैसे घूँघट उतर रहा है ) – २
तुम्हारे सीने से उठ था धुआँ
हमारे दिल से गुज़ार रहा है

हुमा खान गाऊ, नाचू लागते. (तिच्या कारकिर्दीत इतका मोठा योग हाच) मिथुन चक्रवर्ती त्यात सूर मिसळून गाऊ, नाचू लागतो. त्याची प्रेयसी मात्र दुःखी आहे.

ये शर्म है या हया है क्या है
नजर उठाते ही झुक गयी है
तुम्हारी पलकों से गिरके शबनम
हमारी आँखों में रुक गयी है

बस गाडीच्या टपावरून प्रवास करताना अनिता राज भावनिकदृष्ट्या सावरते, सुखावते व आता तीदेखील मिथुनसोबत गाऊ लागते. एव्हाना गाण्याने छान वातावरण निर्माण केलेले असते. अशी अवघड गाणी आपल्याला आवडतात पण आपण ती सहजी गुणगुणू शकत नाही इतकेच.