ज्या काळात प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्याशिवाय गाण्याची नेमकी ‘सिच्युएशन ‘ समजत नसे तेव्हा काय होई याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणे आहे.

क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा
भूलेगा दिल जिस दिन तुम्हें
वो दिन जिन्दगी का आखरी दिन होगा…

रेडिओ विविध भारतीवरील ‘हम किसीसे कम नही’ (१९७७) या चित्रपटाचे रेडिओ प्रोग्राम सुरु झाले आणि हे गाणे कानावर पडताच तात्कालिक युवा पिढीच्या ओठांवर आलेदेखिल. रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामध्येही खूप वेगाने हे गाणे साप्ताहिक सोळा गाण्यात टॉपवर पोहचले. नासिर हुसैन निर्मित व दिग्दर्शित चित्रपटातील गीत-संगीत श्रवणीयच असणार याची ‘बहारो के सपने’, ‘प्यार का मौसम’, ‘काँरवा’ अशा अनेक चित्रपटांनी विश्वास वाढवल्याने ‘हम किसीसे…’मधील गाणीही सुपर हिट होणार याची खात्री होतीच. तसेच हे देखिल…

याद है मुझको, तू ने कहा था
तुम से नहीं रुठेंगे कभी
दिल की तरह से हाथ मिले हैं
कैसे भला छूटेंगे कभी
तेरी बाहों में बीती हर शाम
बेवफ़ा, ये भी क्या याद नहीं

चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत हे गाणे ऋषि कपूर नक्कीच काजल किरणला उद्देशून गात असणार अशीच अनेकांना पक्की खात्री होती. पण चित्रपटाच्या ‘फर्स्ट-डे-फर्स्ट’ शोपासून प्रेक्षकांना धक्काच बसत गेला. कारण हे गाणे पडद्यावर काजल किरणला उद्देशून तारीक गात होता व काजलच्या शेजारी ऋषि कपूर बसलाय. अर्थात त्याला हे लक्षात येते की या दोघांचे नाते बिनसलयं. एका हॉटेलातील स्टेजवरुन तारीक गातोय, इलेक्ट्रॉनिक गिटार वाजवत तारीक आपली व्यथा गातोय व काजल किरण अस्वस्थ होतेय. गाण्यात मध्येच दोनदा म्युझिक पीस आहे. त्यात दोन फ्लॅशबॅक आहेत. एकदा या दोघांचे बालपण आहे. (तेव्हाच यांचे प्रेम जुळलेय?) दुसर्‍यात ते तरूण असून काजल त्याला झिडकारते व रस्त्यावरील लोकं तारिकला बदडतात. एकूणच तारीक या नात्यात दुरावलाय म्हणूनच प्रचंड दुखावलाय व हे दर्दभरे गाणे गातोय.

ओ कहने वाले मुझको फरेबी
कौन फरेबी है ये बता
वो जिस ने ग़म लिया प्यार की खातिर
या जिस ने प्यार को बेच दिया
नशा दौलत का ऐसा भी क्या
के तुझे कुछ भी याद नहीं

मजरुह सुल्तानपुरी यांच्या या ठासून प्रेमभंग व्यक्त करणार्‍या गाण्याचे राहुल देव बर्मनचे संगीत सुरुवातच वरच्या पट्टीत करते ही त्याची स्टाईल होती. आजच्या पिढीतील चित्रपट संगीत शौकिनाना कदाचित आश्चर्य वाटेल पण याच गाण्याने मोहम्मद रफीला पुन्हा पार्श्वगायनात फॉर्मात आणले. (१९६९ च्या ‘आराधना’पासून किशोरकुमार युग संचारले व रफी काहीसा बाजूला पडला होता. त्याला एका जबरदस्त हिट गाण्याची गरज होती. ते हे ठरले.) रफीला या गाण्यासाठी फिल्म फेअर पुरस्कार देण्यात आला. गाण्यातील काजलचा लहानपणीचा आवाज सुष्मा श्रेष्ठाचा आहे. तो अगदीच नगण्य आहे. रफी मात्र ‘दिलसे’ गायलाय. तारीकला या गाण्याच्या सादरीकरणात फार काही करावे लागलेय असे तेव्हाही कोणी मानले नाही. तात्पर्य काही गाणी पार्श्वगायकामुळेच कायम लक्षात राहतात.
दिलीप ठाकूर