दिलीप ठाकूर
गुलजार यांचे चित्रपट गीत तद्दन फिल्मी नसणार, त्यामध्ये काही चांगला आशय, त्याची काव्यात मांडणी असे असणार याची खात्री असतेच (एखादे ‘बंटी और बबली’चे गाणे अपवाद). गुलजार यांच्या प्रतिभेवरचाच हा विश्वास आहे. असेच हे देखिल गाणे.

छड़ी रे छड़ी कैसी गले में पड़ी
पैरों की बेड़ी कभी लगे हथकड़ी
छड़ी रे छड़ी कैसी गले में पड़ी

पटकन डोळ्यासमोर संजीवकुमार, शर्मिला टागोर व एक छानशी छडी आली असेलच. ‘मौसम’ (१९७५) या चित्रपटातील हे गाणे. एका प्रसन्न निसर्ग ठिकाणी हे प्रियकर व प्रेयसी एकमेकांची छेडछाड करीत एकमेकांकडून छडी पळवत हे गाणे गातात. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनीच केले होते. म्हणजेच आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात गाणे नेमके कुठे, कसे व का असावे याचे नेमके भान त्यांना होतेच. फ्लॅशबॅक पध्दतीने पटकथा उलगडणे या आपल्या शैलीचा या चित्रपटात त्यानी भरपूर वापर केला. चित्रपटाला मदन मोहन यांचे संगीत होते.

सीधे-सीधे रास्तों को
थोड़ा सा मोड़ दे दो
बेजोड़ रूहों को
हल्का सा जोड़ दे दो
जोड़ दो न टूट जाये सांसों की लड़ी

एक प्रकारचे तत्वज्ञान देखील या गाण्यात गुलजार सांगतात आणि हेच त्यांच्या चित्रपट गीताचे खूपच मोठे वेगळेपण आहे. मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांची युगल गीते अनेक. त्यात हे खूपच वेगळे.

धीरे-धीरे चलना सपने
नींदों में डर जाते हैं
हो
धीरे-धीरे चलना सपने
नींदों में डर जाते हैं
कहते हैं सपने कभी
जागे तो मर जाते हैं
नींद से न जागे कोई ख़ाबों की लड़ी

संजीवकुमार छान हसतखेळत या गाण्याचा मूड पकडतो. पण जास्त खुललीय, शर्मिला टागोर. तिने संजीवकुमारच्या हातून छडी पळवणे मस्त एन्जॉय केलेय. त्यामुळेच या गाण्यातील तत्वज्ञान व मनोरंजन यांचा झक्कास मेळ बसलाय.

लगता है साँसों में
टूटा है काँच कोई
हो
लगता है साँसों में
टूटा है काँच कोई
चुभती है सीने में
भीनी सी आँच कोई
आँचल में बाँध ली है आग की लड़ी
छड़ी रे छड़ी कैसी गले में पड़ी

या चित्रपटात शर्मिला टागोर दुहेरी भूमिकेत आहे. आई व मुलगी अशा त्या व्यक्तिरेखा आहेत. संजीवकुमार या निसर्गरम्य ठिकाणी काही कामानिमित्त आला असता त्याची शर्मिला टागोरशी (आईच्या भूमिकेतील) ओळख होते आणि मग हे कथानक काही भावनिक वळणे घेते. त्यात हे गाणे एका फ्लॅशबॅकमध्येच आहे.