चित्रपटात मैत्रीची वा दोस्तीची गाणी केवढी तरी. तसे पाहिल्यास चित्रपट गीतांमध्ये सर्व नाती/ सण/ मूड/ प्रसंग यावर केवढी तरी गाणी आहेत. जणू महासागरच म्हणा ना? मैत्रीच्या गाण्याचे रंगढंग/ स्वभाव/ ओढ /वैशिष्ट्येही बरीच.

दिये जलते है फूल खिलते है
बडी मुश्किल से मगर
दुनिया मे लोग मिलते है…

मैत्रीचे हे गाणे त्यात अधिकच खास. कारण या चित्रपटाची गोष्टच मैत्रीची पण थोडी वेगळी. गाण्याचे बोल ऐकताक्षणीच दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींचा ‘नमक हराम’ (१९७३) नक्कीच आठवला असेल. एका उद्योगपतीच्या (ओम शिवपुरी) चा मुलगा विकी ( अमिताभ बच्चन) व त्याचा गरीब मित्र सोमू ( वा चंदर- राजेश खन्ना) यांच्या अगदी वेगळ्याच मैत्रीची ही गोष्ट. तीच दोस्ती याच गाण्यातून अधिकाधिक अधोरेखित होते.

जब जिस वक्त किसीका
यार जुदा होता है
कुछ ना पूछो यारो दिल का
हाल बुरा होता है…

अतिशय प्रसन्न मूडमधला राजेश आणि तेवढ्याच प्रभावी भावमुद्रेतून व्यक्त होणारा अमिताभ ही तर अभिनयाची छानच जुगलबंदी! याच गाण्यात आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ कॅमेरा दिसला. आठवलं? अमिताभच्या हाती असतो. तोपर्यंत आपणाला जेमतेम दूरदर्शन माहित होते. एकच वर्ष झाले होते. पण अमिताभ राजेशच्या मैत्रीचा त्या कॅमेर्‍यातून स्वीकार करताना छान हसतो तो क्लोजअप विसरता न येणारा…

दौलत और जवानी
एक दिन खो जाती है
सच कहता हू
सारी दुनिया दुश्मन बन जाती है
उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते है

दोस्तीचे किती समर्पक वर्णन. आनंद बक्षीच्या गीताला राहुल देव बर्मनचे संगीत. तर किशोरकुमार जणू राजेश खन्नाच्या आवाजात गायचा. त्याची अभिनय शैली त्याने जणू आवाजातून साध्य केलेली. म्हणूनच तर हे गाणे अधिक प्रभावी ठरते. आनंद देते. प्रत्यक्षातील किती तरी मैत्रीचे हे आदर्श गाणे आहे यातच या गाण्याचे महत्त्व विशद होते. राजेश-अमिताभच्या दिलखुलास अभिनयाने या मैत्रीच्या गाण्याला बरीच

उंची प्राप्त करून दिलीय…
दिये जलते है फूल खिलते है
बडी मुश्किल से मगर
दुनिया मे दोस्त मिलते है

या गाण्याचे सार जेवढे व जसे सर्वोत्तम तसेच त्याचे सादरीकरण देखील. मैत्रीची भाषा व महत्त्व कोणाला हो आवडणार नाही? ते देखिल अशा आशयघन गाण्यात?
दिलीप ठाकूर