05 July 2020

News Flash

रंग आमुचा वेगळा..

आयुषमानच्या बरोबरीने गेल्या दोन वर्षांत सगळ्यांच्या मनात धडकी भरवणारा कलाकार आहे तो म्हणजे राजकुमार राव

(संग्रहित छायाचित्र)

बॉलीवूडचे तथाकथित बादशाह, सुपरस्टार आदी आघाडीची मंडळी चौकटीत अडकलेली असताना, मनावर कुठलेही दडपण न घेता येईल ती भूमिका सहजपणे निभावत तिकीटबारीवर तुफान फटकेबाजी करणारे काही चेहरे सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. छोटय़ा शहरांमधून आलेले हे तरुण कलाकार आपल्या अभिनयाच्या बळावर सध्या अष्टपैलू कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत छोटय़ा बजेटचे आणि चांगला आशय असलेले चित्रपट तिकीटबारीवर प्रचंड हिट ठरले. त्यामुळे सुरुवातीला यांना कोण विचारणार? यांना ना हिरोचा चेहरा ना तसे व्यक्तिमत्त्व.. अशी हेटाळणी केली गेलेल्या या मंडळींचा भाव इतका वधारला आहे की सध्या त्यांना हिरो म्हणून चित्रपटात घ्यायचे तर अगदी करण जोहरसारख्या निर्मात्यालाही घाम फुटू लागला आहे..

आघाडीची खान मंडळी आणि देवगण, अक्षय कुमार यांच्यानंतर रणबीर कपूर, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, वरूण धवन ही मंडळीही यशस्वीरीत्या कार्यरत असली तरी सध्या तिकीटबारीवर हिट ठरलेले चेहरे हे यांच्यापेक्षा वेगळे आहेत. गेल्या वर्षभरात अंधाधून, बधाई हो, आर्टिकल १५ आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला ड्रीमगर्ल असे चार हिट चित्रपट देणारा अभिनेता आयुषमान खुराणा हा सध्या अष्टपैलू कलाकार म्हणूनच ओळखला जातो. तो यशस्वी अभिनेता आहे आणि उत्तम गायकही आहे. २०१२ साली त्याचा विकी डोनर हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सात वर्षांत बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख आयुषमानने निर्माण केली आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ चित्रपटाने तर त्याची जुनी ओळखही पुसून टाकली असून व्यावसायिक पण दर्जेदार आशय असलेल्या चित्रपटांचा नायक म्हणून निर्माते-दिग्दर्शक त्याच्यावर चांगले विषय सोपवू पाहतायेत. ‘आर्टिकल १५’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘अंधाधून’ने जगभरातून ४५६ कोटी रुपयांची कमाई केली. पाठोपाठ आलेल्या ‘बधाई हो’ने २२१.४४ कोटी रुपयांची कमाई केली. ‘आर्टिकल १५’चा विषय गुंतागुंतीचा असूनही त्याने जवळपास ९० कोटींचा गल्ला जमवला. तर आता प्रदर्शित झालेला ‘ड्रीमगर्ल’ही प्रेक्षकांची वाहवा मिळवतो आहे. त्यामुळे सध्या तरी आयुषमानचे पारडे जड ठरले आहे.

आयुषमानच्या बरोबरीने गेल्या दोन वर्षांत सगळ्यांच्या मनात धडकी भरवणारा कलाकार आहे तो म्हणजे राजकुमार राव. टिपिकल हिरोचा चेहरा नसतानाही गंभीर, दर्जेदार आशय असणाऱ्या चित्रपटांपासून त्याने सुरुवात केली. २०१० मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या राजकुमारने आत्तापर्यंत अनुराग कश्यप, हंसल मेहता, रिमा कागती, दिबाकर बॅनर्जी, अभिषेक कपूरसारख्या सगळ्या नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. एकीकडे ‘शाहीद’सारख्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या राजकुमारने व्यावसायिक चित्रपट आणि दर्जेदार आशयात्मक चित्रपटांचा समतोल साधला आहे. ऐश्वर्या राय, क्रिती सनन, सोनम कपूर ते श्रद्धा कपूरसारख्या आघाडीच्या नायिकांबरोबर त्याने चांगले चित्रपट केले आणि मुळात त्याला प्रेक्षकांकडून तितकीच पसंतीही मिळते आहे. त्याच्या ‘स्त्री’, ‘अलिगढ’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’ या चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाईही केली आणि एक चांगला अभिनेता म्हणून त्याला समीक्षकांकडूनही कायम पसंती मिळाली असल्याने एक सर्वोत्तम अभिनेता म्हणून त्याच्याकडे आज पाहिले जाते. आताही तो तीन वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या वर्षांच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने विकी कौशलला घराघरांत हिरो म्हणून प्रेम मिळाले आहे. त्याच्याही कारकिर्दीची सुरुवात खरे म्हणजे सात वर्षांपूर्वी झालेली आहे. मात्र अभिनेता म्हणून त्याची दखल ज्या चित्रपटामुळे घेतली गेली तो होता २०१५ साली प्रदर्शित झालेला ‘मसान’. त्यानंतर ‘रामन राघव २.०’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘राझी’, ‘मनमर्जिया’ आणि रणबीर कपूरबरोबरचा ‘संजू’ या सगळ्याच चित्रपटांतून त्याने केलेल्या छोटय़ा-मोठय़ा भूमिका प्रेक्षकांना भलत्याच आवडून गेल्या. या छोटेखानी यशस्वी कारकीर्दीवर कळस बांधण्याचे काम यावर्षी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने केले आहे. सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या विकीकडे चांगल्या चित्रपटांची एकच रांग लागली आहे. शूजित सिरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम सिंग’ हा चरित्रपट आणि ‘भूत पार्ट वन – द हाँटेड शिप’ यात तो दिसणार आहे. शिवाय, जनरल सॅम माणकेशा यांच्यावरच्या चरित्रपटातही तो मुख्य भूमिका साकारतो आहे. या तिघांच्या बरोबरीने काहीसा उशिरा चमकलेला चेहरा म्हणजे कार्तिक आर्यन.

कार्तिक आर्यन हा बऱ्यापैकी व्यावसायिक चित्रपटांमधूनच प्रेक्षकांसमोर आला असला तरी लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने सध्या चर्चेत असलेल्या तरुण फळीतील कलाकारांनाही मागे टाकले आहे. ग्वाल्हेरमधून आलेल्या या तरुणाने मॉडेलिंगपासून कारकीर्दीची सुरुवात केली होती. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ या पहिल्याच चित्रपटाने त्याला यशाची चव चाखून दिली होती. मात्र त्यानंतर सुभाष घईंचा ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘आकाशवाणी’ असे त्याचे चित्रपट आले आणि सपशेल पडले. त्यातल्या त्यात ‘प्यार का पंचनामा २’ने थोडा हात दिला होता. पण कार्तिकच्या नावाची खरी चर्चा सुरू झाली ती गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सोनू के  टिटू की स्वीटी’ या चित्रपटाने.. दोन मित्रांची कथा सांगणाऱ्या ३० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर १५० कोटी रुपयांच्या वर कमाई केली. पाठोपाठ कार्तिकने थेट क्रिती सननबरोबर ‘लुकाछुपी’ हा चित्रपट केला. लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या या चित्रपटानेही तिकीटबारीवर १२८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. त्यामुळे हिरो म्हणून देखणा चेहरा घेऊन आलेला कार्तिक हा तरुणींच्या गळ्यातला ताईत ठरला आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा खान हिलाही कार्तिकप्रेम लपवणे कठीण गेले. सध्या कार्तिक आणि सारा ही जोडी इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याशिवाय, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या दोन नायिकोंबरोबरच्या त्याच्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाबद्दलही प्रेक्षक उत्सुक आहेत.

नवनवीन दिग्दर्शकांचे विचार, त्यांचे प्रयोग आणि त्याला मिळालेल्या या देशभरातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तरुण, हरहुन्नरी कलाकारांची साथ या अफलातून रसायनातून जे चित्रपट आले ते प्रेक्षकांनाही आवडले. किंबहुना, प्रेक्षकांनाही हे छोटय़ा शहरांतील विषय त्याच सहजतेने मांडणाऱ्या या तरुण कलाकारांचा अभिनय जास्त भावत असल्याने बॉलीवूडच्या साच्यात अडकलेल्या कलाकारांपेक्षा या नवीन चेहऱ्यांना सध्या जास्त पसंती मिळते आहे. अर्थात, फार कमी कालावधीत या कलाकारांनी आपले नाणे खणखणीतपणे सिद्ध के ले असल्याने आघाडीच्या कलाकारांना याचा धक्का न बसला तरच नवल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:11 am

Web Title: bollywood new superstar ayushmann khurrana rajkummar rao vicky kaushal abn 97
Next Stories
1 ‘घराणेशाही ही खरं तर जबाबदारीच’
2 कंगनाचा आणखी एक वार..!
3 ‘..म्हणून मोठय़ा कलाकारांची मुलं परदेशात शिकतात’
Just Now!
X