संजय लीला भन्साळी दिग्दर्शित Padmavati ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांतर्फे मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. अगदी सुरुवातीपासूनच या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. पण, आता मात्र परिस्थितीने जास्तच गंभीर वळण घेतल्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोणने या प्रकरणात थेट वक्तव्य करत चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना सुनावले. ‘आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डालाच उत्तर देण्यास बांधिल आहोत. चित्रपट प्रमाणित करताना त्यात कोणतीही अडचण येणार नाही असा मला विश्वास असून, आता कितीही विरोध झाला तरीही ‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच’, अशी गर्जनाच तिने केली.

राणी पद्मावतीच्या भूमिकेत झळकणाऱ्या दीपिकालाही या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याविषयीच सांगताना ती म्हणाली, ‘एक महिला म्हणून या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असण्याचा आणि एका वेगळ्या पद्धतीने ही कथा साऱ्या जगापर्यंत पोहोचवण्याचा मला अभिमान वाटतो.’ दिवसेंदिवस ‘पद्मावती’ला होणारा विरोध आणि हे चिघळणारे प्रकरण पाहता ही अतिशय भीतीदायक परिस्थिती असल्याचेही तिने स्पष्ट केले.

वाचा : ‘पद्मावती चित्रपटाविरोधात कोर्टात जा, पण प्रदर्शन रोखण्याचा अधिकार नाही’

‘एक प्रगत राष्ट्र म्हणून आपण आज कुठे पोहोचलो आहोत? ही परिस्थिती खूपच भीतीदायक आहे. कोणत्याही बाबतीत पुढे जाण्याऐवजी आपण आणखी मागे जातो आहोत’, असेही ती म्हणाली. दीपिकाने केलेले हे वक्तव्य पाहता आता ‘पद्मावती’ प्रदर्शित होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, हाच इशारा तिने सर्वांना दिला.

वाचा : ‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’

भन्साळींच्या चित्रपटाला होणारा विरोध पाहता आता कलाविश्व आणि राजकारणातून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. नुकताच ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’सह इतरही चार संघटनांनी चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.