– उदय गंगाधर सप्रे

कालच्या भागात आपण पाहिलं की मधुबालानं वयाच्या १४ व्या वर्षी ज्या ६ सिनेमांत नायिका म्हणून काम केलं त्यापैकी ५ सिनेमे १९४७ ला प्रदर्शित झाले. उरलेला एक ‘दौलत’ लांबला. वयाच्या १५ व्या वर्षी तिचे आणखी ३ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. म्हणजेच वय वर्ष १५ पर्यंत मधुबालाचे १५ सिनेमे प्रदर्शित झाले होते. (७ बालकलाकार म्हणून आणि ८ नायिका म्हणून) क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर १५ वर्षे वयाच्या मधुबालाचा स्ट्राईक रेट होता १००% (प्रदर्शित झालेले सिनेमे / वय वर्ष अंकांमधे X १००) अहो इतका स्ट्राईक रेट तर आपला आवडत्या सचिन तेंडुलकरचा पण नव्हता.

आज आपण पहाणार आहोत १९४९ साली तिचे प्रदर्शित झालेले जवळ जवळ ९ सिनेमे. जवळ जवळ ९ एवढ्यासाठीच म्हटलं की ८ सिनेमे १९४९ला प्रदर्शित झाले आणि हा ९ वा ‘दुलारी’ ज्याचं प्रदर्शन काही कारणांनी लांबलं. तो १७ फेब्रुवारी १९५० ला (म्हणजेच मधुबालाचं १६ वं वरीस पूर्ण झाल्यावर) जवळजवळ प्रदर्शित झाला.

आता त्या ९ चित्रपटांविषयी बोलण्याआधी आपण बोलूया जरा या ‘सोळावं वरीस मोक्याचं’ ठरविणार्‍या मधुबालाच्या कर्तृत्वाविषयी. मंडळी, १६ व्या वर्षी हल्ली अशा सुंदर मुलीमुळे बहुतेक नसले तरी खूपशा पालकांच्या आणि खुद्द त्या सुंदर मुलीच्या नाकीनऊ येतात, इथे मधुबालाच्या हाती (आणि खाती) ९ (चित्रपट) आले.

मंडळी विचार करा, १६ वर्षाची कोवळी सुकुमार लावण्यवती मुलगी — जिचं वय नटण्या मुरडण्याचं, ती आपल्या १६ व्या वर्षात काय करत होती? तर ९ सिनेमात नायिका म्हणून काम करत होती. प्रत्येक सिनेमाचं शूटिंगचं ठिकाण वेगळं, नायक वेगळा, शूट होणारे प्रसंग वेगवेगळ्या भावनांचे. अशा ९ ठिकाणी वेळेवर पोहोचायचं (सकाळी ९ च्या ठोक्याला मधुबाला सेटवर मेक अप सह हजर असायची), प्रत्येक सिनेमातील शूट होणार्‍या दृश्यासाठी आधीचा मेकअप पुसून भूमिकेनुसार कपडे, मेकअप करून दृश्य समजून घ्यायचं, संवाद पाठ करायचे, टेक्स OK होईपर्यंत शूटिंग करायचं, परत पुढच्या सिनेमाच्या सेटवर हजर व्हायचं. बारा- बारा तास काम केलं तिनं या कोवळ्या वयात मंडळी. आपण फक्त तिचं सौंदर्य जाणतो पण या शालीन गुणी मुलीचे पडद्याआडचे कष्ट मात्र कधी प्रकाशझोतात आलेच नाहीत. हे सगळं करणारी मधुबाला स्वत: मात्र अत्यंत साधी होती — एकही दागिना वापरत नसे. नाही म्हणायला आता व्यस्त जीवनशैलीला साजेशी शोफर ड्रीव्हन मोटार दिमतीला आली होती पण तीही सोय म्हणून. हे ऐश्वर्य उपभोगायला बिचार्‍या मधुबालाकडे वेळ आणि उत्साहच नव्हता. वर कर्मठ बापाची बंधनं — घर ते स्टूडिओ व परत घर. आपल्या (वडिलांनी वाढवून ठेवलेल्या) कुटुंबाचं पालनपोषण व वडिलांसाठी ऐषोआरामाचं आयुष्य यासाठी खपणारं एक सजीव यंत्र होती मधुबाला. जन्मत:च ह्रृदयामध्ये दोष घेऊन जन्मलेली मधुबाला (याविषयी सविस्तर नंतर येईलंच) जिच्या ‘मुघल—ए—आझम’ मधील खर्‍या साखळदंडांचा वापर केलेल्या भूमिकेसाठी दिग्दर्शक के. असीफ याला दोषी ठरवलं गेलं, त्या मधुबालावर कोवळ्या वयात हे एवढं अथक काम करवून घेणार्‍या बापाच्या मानसिकतेबद्धल कुणी अवाक्षरही काढू नये याचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटतं.

माझ्या सगळ्यात जास्त प्रिय अशा मधुबाले, तुझ्या सुंदर रूपापेक्षा तुझं आपल्या कुटुंबियांविषयीच्या प्रेमामुळे कर्तव्यभावनेने ओतप्रोत भरलेलं सुंदर मन या निष्ठूर जगाला दिसू नये, यासारखा मोठा दैवदुर्विलास दुसरा कुठला असेल गं? नुसत्या विचारांनी पण मनाची कालवाकालव होते आणि डोळे भरून येतात गं ….

हम्म…. तर आता आपण वळूया १६ व्या वर्षातील मधुबालेच्या ‘नवलाई (इथे ‘९लाई’) माझी लाडाची लाडाची गं”कडे…..
१९४९ मधे (आणि फेब्रुवारी १९५० मधला एक धरुन ) प्रद्रशित झालेले मधुबालाचे ९ सिनेमे होते, प्रभात फिल्म कंपनीचा ‘अपराधी’, दिग्दर्शक यशवंत पेठकर, गीत- अमर वर्मा, संगीत- सुधीर फडके, कलाकार- रामसिंग, मधुबाला, लीला पांडे, गौरी आणि प्राण. गुणी दिग्दर्शक, चांगलं संगीत, बर्‍यापैकी कथा असूनही प्रेक्षकांसाठी सुमार ठरलेला हा सिनेमा…..

वाचा : दास्तान- ए- मधुबाला भाग-१

त्यामागोमाग आला ‘नेकी और बदी’ : कथा, पटकथा, संवाद, गीत आणि नायक- ‘ऑल इन वन’ केदार शर्मा, संगीत- रोशन, कलाकार- केदार शर्मा, मधुबाला, पासी पटेल, उमा दत्त, नाझिरा आणि दुय्यम भूमिकेत गीता बाली. बालकलाकार म्हणून ११ वर्षांच्या मधुबालाला ‘मुमताज महल’ मध्ये दिग्दर्शित करणारा आणि वयाच्या १४ व्या वर्षी मधुबालाला नायिका आणि २२ व्या वर्षी राज कपूरला नायक म्हणून ‘नीलकमल’ प्रेक्षकांसमोर आणणारा करणारा केदार शर्मा आणखी ५ वर्षांनी मधुबालाचा नायक आणि कुशल दिग्दर्शक म्हणून उभा ठाकला. त्याची दिवंगत पत्नी कमला चटर्जी आणि हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांच्या चेहर्‍यात विलक्षण साम्य होतं. अद्वितीय लावण्यवती मधुबाला ही उत्तम अभिमयामुळे, ठसठशीत सहजसुंदर अभिनयामुळे गीता बाली- या दोघीही केदार शर्माच्या अत्यंत आवडत्या नायिका होत्या. त्या दोघींनाही केदारने सिनेमाच्या कामासाठी खूप संधी दिली. (आणि दुर्दैवाने दोघीही वयाच्या अनुक्रमे ३७ व्या व ३६ व्या वर्षी हे जग सोडून गेल्या) ‘नेकी और बदी’मुळे मधुबाला चांगली प्रकाशझोतात आली कारण सिनेमा बरा चालला.

यानंतर आला ‘वीणा पिक्चर्स’चा मोहन सिन्हा दिग्दर्शित ‘इम्तिहान’ कलाकार- सुरेंद्र, मधुबाला, सज्जन, रेखा, गुलाब, जुगनू आणि मदनपुरी. गीत- इंदिवर, यशोदानंदन जोशी, हरिकृष्णप्रेमी, ए.एन्.शर्मा, संगीत- शामबाबू पाठक. हा सिनेमा यथातथाच चालला.

यानंतर आला १९४७ साली सुरु झालेला सोहराब मोदी दिग्दर्शित ‘दौलत’ कलाकार- महिपाल, मधुबाला, जानकीदास, लीला मिश्रा, गीत कँवर जलालाबादी, संगीत- शास्त्रीय संगीताचे व्यासंगी पंडित हनुमान प्रसाद. या सिनेमाने मधुबालाचं नाव झालं पण हा ‘नीलकमल’ सोबतचा सुरुवातीचा सिनेमा असल्याने या सिनेमाने अताउल्ला खानला दौलत मात्र दिली नाही. (हो त्यालाच, कारण मधुबालाचं जगणंच मुळी कुटुंबासाठी होतं – तिला स्वत:ला ना दौलतीच्या उपभोगासाठी वेळ होता ना अभिलाषा)

यानंतर आला ‘सुपर पिक्चर्स’चा अस्पी आझाद दिग्दर्शित ‘सिपाहिया’. कलाकार- आगा, मधुबाला, याकूब, अल्ताफ, हुस्नबानू, कन्हैय्यालाल, अमीरबाई कर्नाटकी आणि जिल्लो (तिच ती जिने ‘मुघल—ए—आझम’ मधील ‘अनारकली’ मधुबालाची आई साकारली होती) गीत- राम एम्. आणि संगीत- सी. रामचंद्र. या दोन रामांनी मधुबालाची ‘सिपाहिया’ नामक नांव पैलतीरी नेली, हा सिनेमा चांगला गल्लाभरू ठरला.

वाचा : दास्तान- ए- मधुबाला भाग-२

त्यापुढे आला ‘नंदा प्रॉडक्शन्स’चा जे.के.नंदा दिग्दर्शित ‘सिंगार’ कलाकार- जयराज, मधुबाला, सुरैय्या, के.एन्.सिंग, दुर्गा खोटे, मदनपुरी, रणधीर कपूर (राजचा मुलगा नव्हे) गीत- डी.एन.मधोक, नक्शब जार्च्वी, शकील बदायुनी, संगीत- खुर्शीद अन्वर (बालनाट्य सादर करणारा आणि मधुबालाला ती बेबी मुमताज असताना दिल्ली नभोवाणीवर दिग्दर्शन करणारा संगीतकार) ‘सिंगार’ प्रेक्षकांना खूप आवडला आणि मधुबालाचा ऐन ज्वानीतला ‘सिंगार’ तिला नाव देऊन गेला.

यानंतर आला अनंत ठाकूर दिग्दर्शित ‘पारस’ कलाकार- रहमान, मधुबाला, कामिनी कौशल, सप्रू, मुराद, के.एन., सुलोचना. गीत- शकील बदायुनी आणि संगीत- गुलाम मोहम्मद. हा सिनेमा पण बऱ्यापैकी चालला.

१७ फेब्रुवारी १९५० ला नॉव्हेल्टी मध्ये प्रदर्शित झालेला ‘दुलारी’ बराच आधी पूर्ण झालेला. पण त्याचं प्रदर्शन मात्र लांबलं. सुरेश, मधुबाला आणि शामकुमार, गीता बाली अशा दोन जोड्या यात होत्या. त्यातच सिनेमाला जोड मिळाली होती ती म्हणजे शकील बदायुनीच्या गीतांची आणि नौशाद अलींच्या संगीताची. हा मधुबालाचा दुसरा रौप्यमहोत्सवी सिनेमा. याने मधुबाला नाव आणि सन्मान मिळवून दिला. ‘दुलारी’च्याही आधी १९४९ मध्ये मधुबालाचा एक असा सिनेमा रिलीझ झाला ज्याने डबघईला आलेल्या ‘बॉम्बे टॉकीज’ या संस्थेला नवसंजीवनी देत सिनेमासृष्टीतील त्या काळातील सर्व उच्चांक मोडले आणि सगळ्याच दृष्टीने अद्वितीय यशस्वी ठरलेल्या या सिनेमाने मधुबालाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. या सिनेमाने मधुबालाला नायिका म्हणून, कमाल अमरोहीला दिग्दर्शक म्हणून खेमचंद प्रकाशला संगीतकार म्हणून आणि लता मंगेशकरला गायिका म्हणून वारेमाप प्रसिद्धी मिळवून दिली. हा सिनेमा होता ‘महल’.

मंडळी, १९४९ सालच्या सिनेमांच एवढं सखोल विवरण करण्याचं कारण इतकंच होतं की ढीगभर सिनेमात काम करून लेकीच्या नावावर निव्वळ धन जमा करणार्‍या अताउल्ला खानने नायका म्हणून मधुबालाच्या सिनेमा निवडीबाबत जरा तारतम्य दाखवलं असतं तर सर्वाधिक सौंदर्यवान यासोबतंच सर्वाधिक हिट सिनेमा देणारी नायिका असाही तिचा लौकीक झाला असता. असो…..

‘महल’ने मधुबालाच्या कारकीर्दीची ‘अथश्री’ केली आणि ‘मुघल—ए—आझम ने लोकप्रियता, सौंदर्य व अभिनय या त्रिसूत्रीनुसार ‘इतिश्री’ केली. १९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुघल—ए—आझम’ नंतर जरी मधुबालाचे ती हयात असताना ‘बॉयफ्रेण्ड’ , ‘झुमरू’, ‘पासपोर्ट’, ‘हाफ टिकट’ आणि ‘शराबी’ असे ५ आणि मृत्यूपश्चात् ‘ज्वाला’ हा १, असे एकूण ६ चित्रपट आले तरी ‘महल’ आणि ‘मुघल—ए—आझम’ एवढी सौंदर्य, अभिनय व लोकप्रियता या त्रिसूत्रीवर उच्चस्तरीय सिनेमे दुसरे झाले नाहीत आणि म्हणून या २ चित्रपटांवर स्वतंत्र लेख लिहिणं हा मधुबालाचा मान आणि हीच तिची उच्चतम अशी योग्यताही आहे.
तर मंडळी, उद्या आपण ‘महल’ सजवूया…..