28 October 2020

News Flash

दास्तान-ए-मधुबाला भाग ८

मुघल-ए-आझम भाग २

मधुबाला

कालच्या मुघल-ए-आझमवरील लेखामध्ये मधुबालाचा प्रवेश होईपर्यंतचा सिनेमाचा प्रवास कसा होता ते आपण पाहिलं. आज हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ते विक्रमापर्यंतचा प्रवास. आयुष्यात एकच स्वप्न पाहावं आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तत्वांशी तडजोड न करता आयुष्य पणाला लावावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ध्येयवेडा परफेक्शनिस्ट के. असीफ. असीफला एक तप म्हणजेच १९४८ मध्ये डोक्यात मुघल-ए-आझम पक्का केल्यापासून तो १९६० ला प्रदर्शित होईपर्यंत कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावं लागलं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

मुघल-ए-आझम सिनेमाच्या निर्मितीवर साधारणपणे १०- १५ लाख रुपये खर्च आला होतै. हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर ध्यानीमनी नसताना काही वर्षांनंतर सिराज अली एक दिवस अचानक पाकिस्तानला कायमचे निघून गेले. अली अचानक निघून गेल्यामुळे असीफला भर दिवसा तारे दिसू लागले होते. सुदैवाने जाण्यापूर्वी सिराज अलीने पैशांची कोणतीही मागणी केली नाही. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. मुंबईच्या एका बड्या भांडवलदाराने असीफच्या असामान्य महत्वाकांक्षी चित्रपटाबद्दल असलेल्या माहितीच्या आाधारावर आणि आसिफच्या क्षमतेवर प्रचंड भरवसा दाखवत असीफसाठी निर्माता म्हणून मदतीचा हात पुढे केला. या भांडवलदाराचं नाव शापूरजी पालनजी मिस्त्री. मुघल-ए-आझमचं थांबलेलं काम पुन्हा एकदा जोमात सुरू झालं.

एम.एन.टी सिनेप्रोडक्शनचे मालक पिता- पुत्र माखनलाल जैन आणि राजेंद्र जैन यांनी अनारकलीवर चित्रपट काढण्याची घोषणा केली. कारण त्या अनारकलीचं कथालेखन व दिग्दर्शन करणार होता कमाल अमरोही. म्हणजे असीफच्या कथेत फेरफार करुन चक्क त्याने स्वत:च्या नावाला साजेशी कमाल केली होती.

असिफने या पिता- पुत्रांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. मग असीफने त्यांना पंधरा लाख देऊ केले. पण करोडपती जैनांना त्या पैशांत स्वारस्य नव्हते. जैनांच्या म्हणण्यानुसार असिफला चित्रपट पुर्ण करायला अजून आठ ते १० वर्ष लागणार होती. पण मग असिफ एवढा अस्वस्थ का होता? याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, अनारकलीच्या भूमिकेसाठी जेव्हा असिफ चाचण्या घेत होता आणि त्यात मधुबालाच्या अनारकलीच्या भूमिकेसाठी उल्लेख  केला नव्हता. त्या काळात अताउल्लाने जैनांकडून मानधनाची रक्कम स्वीकारून मधुबाला त्यांच्या चित्रपटात काम करील असे आश्वासन दिले होते.

फिल्म इंडिया आणि मूव्हीटोन्स या दोन प्रसिध्द मासिकांतून बाबूराव पटेल आणि बी.के. करंजिया यांनी असिफची बाजू मांडली होती.दिलीप कुमारन यांनी तर जाहिररित्या कमाल अमरोहीची वागणूक नितीमूल्यांना धाब्यावर बसवणारी असल्याचे सांगत निषेध नोंदवला होता. पण या सगळ्याचा जैनांवर काहीही परिणाम झाला नाही. जैनांवर खरा परिणाम झाला तो मधुबालाच्या बोलण्याचा. असीफच्या प्रयत्नांवर पाणी पडू नये म्हणून मी जैनांच्या चित्रपटात अनारकलीची भूमिका करणार नाही असे तिने ठामपणे सांगितले. मधुबालाने वडिलांनी स्वीकारलेली मानधनाची रक्कम व्याजासकट परत केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून जैन यांचा अनारकली कधी प्रदर्शित झालाच नाही. असे झाले नसते तर कमालने मुघल-ए-आझमचा पाऊणपेक्षाही अधिक ट्रेलर कदाचित अनारकली सिनेमात दाखवला असता.

असिफच्या मागे लागलेलं हे काही शेवटचं संकट नव्हतं. याच सुमारास फिल्मीस्तानचे संचालक शशिधर मुखर्जींनी अनारकलीची घोषणा केली होती.  दिग्दर्शन नंदलाल जसवंतलाल यांच्याकडे सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली होती. यात सलीम होता प्रदीपकुमार आणि अनारकली होती बीना रॉय. १९५३ मध्ये हा अनारकली प्रदर्शितही झाला. सी. रामचंद्रांनी आणि लता, हेमंत कुमार यांनी दिलेल्या योगदानामुळे अनारकली वारेमाप यशस्वी झाला होता. तेव्हाही असिफचा मुघल-ए-आझम बाल्यावस्थेतच होता. पण या अनारकलीमुळे समीक्षकांनी असीफला सावधगिरीचा इशारा दिला होता.

समिक्षकांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे असिफने कानाडोळा केला आणि चिकाटीने आपलं काम करत राहिला. याउलट असिफनेच सार्‍यांना सुनावलं. ‘माझी अनारकली कोटींमध्ये एक होती. जी सर्वांवर भारी पडेल.’ असिफच्या परफेक्शनीस्टची लक्षणं पाहा… त्याच्या चित्रपटात लढाईवरुन विजयी होऊन परतणार्‍या सलीमला एक संगमरवरी पुतळा भेट देण्याचं अकबर ठरवतो. पण शिल्पकाराकडून मुदतीत पुतळा पूर्ण न झाल्यानं शिल्पकार एका अनुपम लावण्यवतीला पुतळा म्हणून उभं करतो. ती लावण्यवती म्हणजेच ही अनारकली.

हा प्रसंग वास्तववादी दिसण्यासाठी मधुबालाच्या अंगाला संगमरवरी लेप देण्यात आला होता. तिला पापण्याही हलवता येत नव्हत्या. मुंबईची दमट हवा आणि आर्कलाईटचा प्रखर झोत हे कमी की काय पुतळ्यावर म्हणजेच मधुबालावर पारदर्शक कापडाचं आवरण होते. मधुबाला हुबेहुब संगमरवराची मूर्ती भासावी म्हणून मधुबालाला रबर शीट यार्डपासून बनवलेला ड्रेस घालण्यात आला. पण त्याला अजिबात हवा आत जाण्याची सोय नसल्याने प्रचंड उष्णतेने ती गुदमरू लागली. तेव्हा तो ड्रेस उतरवून त्याला मागच्या बाजूने, हवा खेळती राहण्यासाठी लहान लहान भोकं पाडण्यात आली. हा ड्रेस घालून आणि त्यावर पारदर्शक कापडाचं आवरण घालून चित्रीकरण करण्यात आलं. सिनेमात हा पुतळा पाहून मुर्तीकाराची तारीफ करणार्‍या अकबराला सलाम करायला मधुबाला पुढे येते तेव्हा अक्षरश: संगमरवराचा पुतळाच सजीव होतोय असं वाटतं. एक रम्य कवी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तीन तास मेकअप करायला आणि दीड तास तो उतरवायला एवढा वेळ लागत होता. मधुबालाने गे सारं कसं सहन केलं असेल याची कल्पनाही करवत नाही. लोकांनी मधुबाला असताना फक्त तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. पण तिने सिनेमांसाठी घेतलेले कष्ट कोणालाही दिसले नाहीत.

एका गाण्याच्या चित्रिकरणात मधुबालाच्या हातापायात खरे लोखंडी साखळदंड अडकवून अनेक रिटेकसह चित्रिकरण करण्यात आले होते. यामुळं नितळ आणि मुलायम कांतीवर काळेनिळे डाग पडले होते. आपल्या मुलीच्या शरीरावरचे ते डाग पाहून अताउल्ला चांगलाच भडकला होता. कलादिग्दर्शक कचकड्याचे रंगवलेले साखळदंड लोखंडी साखळदंड असल्याचा आभास सहज निर्माण कररु शकतील असा पर्यायही त्याने सुचवला होता. पण वास्तववादाचं वेड रक्तात भिनलेला आसिफ आपल्या कार्यपध्दतीवर ठाम राहिला आणि कहर म्हणजे खुद्द मधुबालानेही आसिफला याबाबत पाठिंबा दिला. आसिफ कितीही दुराग्रही असला तरी बेफिकीर किंवा निष्काळजी नव्हता. सगळ्या कलाकारांसाठी त्याने सेटवर तो एक डॉक्टर, नर्स आणि एक अॅम्ब्यूलन्सची सोय करुन ठेवली होती.

अनारकलीला ज्या भिंतीत मारण्याची शिक्षा अकबर देतो, त्या शॉटसाठी असिफनं शापूरजींकडे ५० हजार रुपये मागितले. स्वत: मोठे बिल्डर असल्याने १९५५- ५६ च्या काळात अशा भिंतीला ५ हजार खर्च येतो याची खात्री असल्याने शापूरजींनी यावर स्पष्टीकरण मागितलं. तेव्हा असिफ म्हणालाकी या भिंतीसाठी जबलपूर येथील संगमरवराचा दगड असेल आणि त्याचा कारागीरही तिकडचाच असेल. तेव्हाच हे दृश्य वास्तवदर्शी वाटेल. असिफचे हे स्पष्टिकरण ऐकून शापूरजींनी त्याला ५० हजार रुपये दिले.

आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जावेत म्हणून असिफनं एका शीशमहलचा सेट उभारायचं ठरवलं. यासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये शेकडो कारागीर दोन वर्ष अहोरात्र राबवले. कलादिग्दर्शक एम.के. सईद यांनी मुंबईतल्या नावाजलेल्या आर्किटेक्ट व इंटिरिअर डिझायनरची मदत घेतली. इटालिअन टाईल्सचं फ्लोअरींग, इराणी गालीचे, संस्थानिकांकडून उधारीवर घेतलेले हंड्या- झुंबर, काळानुरूप नक्षीदार खिडक्या व भिंतींच्या कमानी, संगमरवरी भासणार्‍या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती. १ लाख रुपये मानधन देऊन काचेचं नक्षीकाम करणारे तज्ज्ञ आगा सिराझीला शीशमहल सजवण्याचं काम देण्यात आलं. विशिष्ट रंगाच्या काचा आणि आरसे बेल्जियमवरुन मागवण्यात आले. अशा तर्‍हेने ३५ लाख रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या शीशमहलचा सेट पाहण्यासाठी मुंबई, कलकत्ता, मद्रासहून अनेक दिग्गज तंत्रज्ञ, ङलिवूडचे तंत्रज्ञ, चीन, जपान, हाँगकाँग इथून जाणकार मंडळी सेट पाहायला आली होती.

या सेटवर अनारकलीचं सप्तरंगांतलं नृत्य चित्रीत करायचं ठरलं होतं. कृष्णधवल छायाचित्रणातला कसबी सिनेमॅटोग्राफरआर.डी. माथूरने ट्रायलसाठी मोठमोठे दिवे प्रकाशित केले. पण असंख्य आरशांमुळे परावर्तीत झालेल्या प्रकाशामुळे एक्सपोझ झालेली फिल्म जळून पांढरीफटक पडली. तमाम कसबी तंत्रज्ञांनी इतक्या प्रखर प्रकाशात कॅमेर्‍याच्या लेन्सेस काम करूच शकणार नाहीत, असं छातीठोकपणे सांगितलं. असिफच्या वास्तववादाच्या वेडाने धास्तावलेल्या शापूरजींना असिफच्या हितशत्रूंनी अधिकच बिथरवलं व पैसा पाण्यात जाईलच आणि चित्रपटही पूर्ण होणार नाही अशा कानपिचक्या दिल्या. प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले शापूरजी तडक त्याकाळच्या ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदींकडे गेले. मोदींनी प्रत्यक्ष सेट पाहिल्यावर प्रेक्षकांचे डोळे दिपवण्याच्या नादात असीफ स्वत:सकट सगळ्यांसाठी खड्डा खणतोय असा निर्वाळा दिला.

यामुळेच शापूरजींनी झालं तेवढं बास झालं आता इथून पुढे सोहराब मोदी दिग्दर्शनाचं काम पाहतील, असे असिफला सुनावले. तुमच्या जीवतोड मेहनतीनं हातातोंडाशी आलेली स्वप्नपूर्ती व त्याचं सगळं श्रेय तुमच्या डोळ्यांदेखत जर दुसर्‍याच कुणालातरी मिळणार असं कळलं तर तुमची काय अवस्था होईल? असिफचंही तसंच झालं. रागावलेला असीफ म्हणाला की, ‘तुमचे पैसेच खर्च झालेत, पण माझ्यासकट शेकडो लोकांनी या चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलंय. या सेटवर अकबर, जोधाबाई, सलीमसमोर अनारकली नाचणार आहे. माझ्या स्वप्नपूर्तीच्या या परमोच्चक्षणी मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाही. तुम्ही माझे कुबेर आहात आणि मोदीं विषयीही मला आदर आहे. पण आता माझ्या आडवं येणार्‍यांची तंगडी तोडून हातात दिल्याशिवाय मी राहणार नाही.’ असीफचा हा आवेश पाहता शापूरजींनी थोडं नमतं घेतलं. पण या दृश्यानंतरच काम मोदी पाहतील असे त्यांनी स्पष्ट केले. हे सगळं ऐकत इतका वेळ उभी असलेली मधुबाला आल्या शांत पण दृढनिश्चयी स्वरात म्हणाली की, माझा करार असिफसोबत झाला आहे. त्यामुळे असिफने दिग्दर्शन केले नाही तर मी या चित्रपटातच काम करणार नाही.

पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या चित्रपटातून मधुबाला बाहेर पडली तर आपण कुठे जाऊन पोहचू हे ओळखता येण्याइतपत चाणाक्ष व व्यावसायीक असलेले शापूरजी पालनजी हे सोहराब मोदींसोबत एकही शब्द न बोलता सेटवरून निघून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी मधुबालाकडं पाहात असीफने तिचे उपकार तो आयुष्यभर विसरणार नसल्याचे सांगितले. मधुबालाच्या या खंबीर पाठिंब्यासाठीच करारात नसतानाही मधुबालाला मानधनाचा शेवटचा हप्ता देताना २५ हजारांची भर घालून असीफनं चेक तिला सुपूर्द केला होता.

शीशमहलच्या शेकडो आरशांवरून प्रकाश किरण परावर्तीत होऊन फिल्म कोरीच राहू लागली. शेवटी आर.डी. माथूरनं डायरेक्ट लाईटऐवजी सर्व दिव्यांवर उलटे रिफ्लेक्टर्स बसवले व इनडायरेक्ट लाईटमधे शूटिंग करून पाहिलं. ज्यामुळे आरशांत हजारो प्रतिमा स्पष्ट दिसल्या आणि ही कल्पना यशस्वी झाली . आजकाल जे स्टिल व लाईव्ह फोटोग्राफीचं तंत्र वापरतात, त्याचा उगम इथून झाला. हा होता क्लायमॅक्स. आता वाचूया शकील- नौशादची कमाल.

अजरामर संगीताचा खजाना: मुघल-ए-आझम

शकील बदायुनी व नौशाद अली या जोड गोळीनं या चित्रपटासाठी वीस गाणी ध्वनीमुद्रित केली. परंतू चित्रपटाची लांबी व कालावधी पाहता फक्त १२ गाणीच चित्रपटात ठेवण्यात आली.

१२ वर्षं खपून निर्माण केलेल्या चित्रपटाचा एकूण अवधी १९७ मिनिटांचा आाणि यापैकी फक्त गाणी ४९.०२ मिनिटांची.

मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगे. राणी जोधाबाईच्या सांगण्यानुसार तो मोठ्या जल्लोशात साजरा व्हायला हवाय. राजवाड्यात सुंदर झर्‍यांच्या दोहो बाजूंना सतार- वीणा वाजवत ललना बसल्या आहेत. कृष्णाची खर्‍या सोन्याची मूर्ती मधोमध ठेवली आाहे आणि नाजूक पदन्यास करत लचकत मुरडत राधा बनून ती येते आणि मोहे पनघट पे हे गाणे म्हणते.

दिग्दर्शक असीफ, कलादिग्दर्शक एम.के. सईद, गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद अली, ठुमकती राधा म्हणजेच मधुबाला हे सारे कलाकार मुस्लिम पण पडद्यावर साकारतंय गारा या दुर्मीळ रागातली लाडीक तक्रार वजा हिंदूंचं आद्यदैवत श्रीकृष्णाचं गाणं. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या बहुतेक सगळ्या रागांवर आधारित गाणी देणारा नौशाद हा एकमेव संगीतकार असावा. ज्या एका गाण्यासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमधे पस्तीस लाख रुपये खर्च करून दोन वर्ष अथक मेहनत करून ३५ फूट उंच,८० फूट रुंद आणि १५० फूट लांब शीशमहल बनवण्यात आला. तो फक्त

प्यार किया तो डरना क्या या गाण्यासाठी. वास्तववादाचा भुकेला दिग्दर्शक के. असीफ, या एका गाण्यासाठी बनवलेला शीशमहल , असीफसाठी चित्रपट सोडण्याची तयारी दाखवणारी मधुबाला, अत्यंत कल्पकतेने शीशमहालातदेखील शूटिंग करणं शक्य करून दाखवलेला आर.डी. माथूरसारखा कॅमेरामन, सितारादेवी लच्छू महाराज, या सगळ्याचच दडपण मनावर असणार्‍या शकील बदायुनीनं आपली सारी प्रतिभा पणाला लावून या शीशमहलमधील गाण्याचे पंचवीस एक मुखडे तयार केले. पण नौशादच्या पसंतीस ते उतरेनात. बरंच विचारमंथन झालं आणि मध्यरात्रीच्या सुमारास नौशादला ओळी सुचल्या. लोकगीतांच्या संग्रहातील एका जुन्या रेकॉर्डवर एक राजस्थानी गीत नौशादला सापडलं प्रेम किया का चोरी करी? प्रतिभावान शकीलनं गीत लिहून काढलं. गीत सुरु होण्यापूर्वीची दोन ओळीतील आर्त तत्वज्ञान ज्या धाडसाने दरबारातील अनारकली अकबर बादशहाला ऐकवते, त्याच तोलामोलाचे बोल शकीलनं लिहिले, नौशादने साजात मढवले आणि लताने अमर केले. ‘इन्सान किसीसे दुनियामें इकबार मुहोब्बत करता है इस दर्दको लेकर जीता है , इस दर्द को लेकर मरता है…’ या दोन वाक्यांच्या फेकीनंतरचा मधुबालाचा आवेश आणि निरुत्तर अकबराच्या मनातील खळबळ दाखवणारा पृथ्वीराज कपूरचा सारं काही सर्वोत्तम होतं.

मोहे पनघट पे नंदलाल आणि प्यार किया तो डरना क्या ही गाणी रंगीत शूट झाली आणि नंतर चित्रपटाची ट्रायल बघताना ८५% कृष्णधवल व १५% रंगीत असं पाहून असीफला अख्खा चित्रपट रंगीत असावा असं वाटू लागलं. परंतू १२ वर्षांनी तयार झालेला चित्रपट री-शूट करणं म्हणजे परत पैशांचा व वेळेचा अपव्यय. कारण जिथे १० लाखांत संपूर्ण हिंदी सिनेमा तयार व्हायचा तिथे असीफनं जवळ जवळ दोन कोटी रुपये खर्च केले होते. चित्रपटाच्या प्रीमीअरला मात्र तो बघताना शापूरजीला असीफचं म्हणणं पटलं व त्यांनी असीफला सिनेमा रंगीत करण्याचं आश्वासन दिलं.

दिल्या शब्दांना शापूरजी जागले ,१९ जुलै २००४ ला स्टर्लिंग इनव्हेस्टमेंटच्या बॅनरखाली शापूरजींच्या वारसदारांनी १० कोटी रुपये खर्च करून रंगीत मुघल-ऐ-आझम प्रदर्शित केला. पण हा रंगीत चित्रपट पाहायला ना शापूरजी होते ना मधुबाला ना असीफ. नाही म्हणायला दिलीप कुमारने मात्र रंगीत प्रीमीअर पाहिला.

आता वळूया चित्रपटातील अतिअत्कृष्ट दर्जाच्या प्रणयदृष्याकडे….

अनारकली महालातून उतरुन बागेत सलिमला भेटायला जाते तेव्हा महालातले दिवे उजळायला लागलेले असतात आणि बादशहाच्या दरबारातून तानसेनने छेडलेल्या रागिण्यांचा स्वर पार्श्वभूमीवर पाझरत असतो. एकीकडे दिलीप कुमार आणि मधुबालाचा तो सुप्रसिद्ध रोमॅन्टिक चेहर्‍यावरुन शहामृगाचं पिस फिरवण्याचा आणि मधुबालाच्या अंगावर फुलांची पखरण झालेली आहे-इतका लांबलचक सीन. पडद्यावर एकही संवाद न घालता साकारणं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे. पण तेही शिवधनुष्य असीफनं लीलया पेललं आणि यावर कळंस म्हणजे शेजारच्या महालात तानसेनचं गाणं पार्श्वभूमीला टाकलं. जे गाणं टाकलंय त्याची संपूर्ण हकीकत ऐकल्यावर तर असीफ कलाकार म्हणून अक्षरश: ह्रदयाच्या उच्चस्थानी जाऊन बसला.

झालं असं की तानसेनच्या आवाजाच्या तोडीची आलापी हवी म्हणून असीफने नौशादला सागितलं. असा आवाज असलेला संगीतरत्न म्हणजे बडे गुलाम अली खाँ साहेब असं नौशादनं असीफला सांगितलं. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड मान्य नसलेला असीफ बडे गुलाम अली खाँ साहेबांकडे पोहोचला. पण चित्रपटासाठी मी गात नाही असं सांगत खाँ साहेबांनी हा प्रस्ताव नाकारला. असीफनं चिकाटी न सोडता आग्रह चालू ठेवला तेंव्हा असीफला टाळण्यासाठी आपल्या तीन तासांच्या महफिलीची मानधनाची रक्कम म्हणजे पंचवीस हजार एका गाण्याचे घेईन. असं खाँसाहैनी असिफला सांगितलं. अबब! मंडळी, ज्या काळात लता-रफी सारख्या कलाकारांना एका गाण्याचे ४००० रूपये मानधन असे, त्या काळात एका गाण्याला पंचवीस हजार ? असीफनं खिशातून दहा हजारांचं बंडल काढून खाँसाहेबापुढे ठेवत म्हटलं, “बस्स एवढेच? खाँसाहेब आपण बेशकीमत आहात आणि आपल्या आवाजासाठी पैसा किती हा मुद्दाच गौण आहे. हि पेशगी आहे, बाकी रक्कम उद्या रेकॉर्डिंगच्या वेळी मिळेल.

असीफच्या वेडाने आणि दानतीने अवाक् झालेले खाँ साहेब दुसर्‍या दिवशी त्यांच्या तबलानवाझ निजामुद्दीन खाँ ना घेऊन स्टुडिओत पोहोचले आणि नौशादनं सोहनी रागात बांधलेली प्रेम जोगन बन जा हि ठुमरी गाऊन ध्वनीमुद्रित केली. पण ती ऐकल्यावर असीफ आपली नाराजी लपवू शकला. पण सलीम- अनारकलीच्या प्रणयप्रसंगाला साजेशी मुलायम आलापीवाली नजाकतभरी ठुमरी हवी….. ही अशी झाली नाहिये, असं ते म्हणाले.

मंडळी, कल्पना करा की हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या मेरुमणी असलेल्या खाँ साहेबांना एक सिनेमावाला सांगतो की ठुमरी कशी हवी? भडकलेल्या  खाँ साहेबांनी असीफला सांगितलं मला प्रसंग पडद्यावर दाखवा, ‘फिर हम तय करेंगे’ झालं, दिवसभर धावपळ करून असीफनं या प्रणय प्रसंगाचे रशेस कसेबसे संध्याकाळपर्यंत स्टूडिओमधे आणवले आणि हा प्रणयप्रसंग पडद्यावर खाँ साहेबांसमोर प्रोजेक्ट केला. त्यातला मधुबालाचा अभिनय बघून खाँसाहेब हरखून गेले व म्हणाले, “अमा निजामुद्दीन मियाँ क्या खूबसूरती है, जैसे आसमानसे परी उतर आयी हो. असीफ सही कह गया, इसकेलिए आलापी वाकई मलमलसी मुलायम होनी चाहिये. नौशादभाई चलो फिरसे गातें हैं हम.” आणि खाँ साहेबांनी परत नव्याने तब्येतीत गायलेली ही ठुमरी पुन्हा ध्वनीमुद्रित करण्यात आली .

मंडळी, तब्बल पाच मिनिटाच्या या प्रणयप्रसंगात मधुबलाच्या चेहेर्‍यावर दिलीपकुमार शहामृगाचं पीस फिरवतो आणि खाँ साहेबांचा मखमली आवाज आपल्या ह्रदयावर पीस फिरवतो. पंचेंद्रियं पडद्यावरच्या प्रणयप्रसंगाला उत्कटतेने दाद देत असताना अंतरात्म्याला खाँ साहेब शांती देवून जातात. आणखीन एक गाणं खाँसाहेबांकडून असीफनं गाऊन घेतलं शुभदिन आयो राजदुलारा. मंडळी, काल तुम्हाला मी म्हटले ना, ते हे दोन विशेष गाण्यांवर सार्थक झालेले पन्नास हजार रुपये.

याखेरीज ‘जब रात है ऐसी मतवाली, फिर सुबहका आलम् क्या होगा? या ध्रुवपदातंच श्रृंगार व्यक्त करणार्‍या गीताला लताने जास्त न्याय दिलाय की ध्रुवपद संपवताना प्रश्नार्थक विधानाऐवजी गोड गुपीत सांगणार्‍या समेवर संपवणार्‍या नौशादनं, हे मला खरंच कळलेलं नाही आणि हे चित्रपटातलं गाणं ऐकण्यापेक्षा पाहणं जास्त आहे.

‘बेकसपे करम कीजीए सरकार—ऐ—मदीना’ ही आर्त आळवणी ऐकून दगडालाही पाझर फुटावा. खुदा निगेहबान हो हि एका लाचार बेबस अनारकलीची दुवा सलीमसारख्या भावी मुघल बादशहाला पण नक्की सुखरूप ठेवेल असे शब्द पेरलेत शकीलनं. चित्रपटातलं एकमेव रफीनं गायलेलं गाणं. कोरसला गायला उभ्या असलेल्या १०० गायकांना भेदून पार जाणारा रफीचा ‘झिंदाबाद, झिंदाबाद, ऐ मुहोब्बत झिंदाबाद’ हा आवाज….. गाण्याच्या शेवटी रफी ज्या पट्टीत गायलाय ना, त्या पट्टीत बोलताना पण आपला आवाज फाटेल. एकंच गाणं पण खणखणीत सादरीकरण. रफी , तुस्सी ग्रेट सी जी.

मंडळी , या सिनेमातल्या ‘मोहे पनघटपे’ आणि ‘प्यार किया तो डरन क्या?’ या दोन गाण्यात मधुबालाचं जे नृत्यकौशल्य आपणाला दिसलं, त्यासाठी हृदय कमकुवत असल्याने कथ्थकसारखं शास्त्रीय नृत्य शिकायला बंदी असूनही मधुबाला या सिनेमाचे नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज यांच्याकडे २ वर्ष नृत्य शिकत होती. याला म्हणतात समर्पण. एका सीनमधे अनारकली जळती मेणबत्ती हाताने विझवते. यात जळत्या मेणबत्तीच्या ज्योतीमुळे झालेली वेदना चेहेर्‍यावर दिसू  नये म्हणून मधुबालाच्या चेहेर्‍यावर २-३ छोट्या बालद्यांनी पाणी ओतण्यात आले आणि मगंच शूटिंग करण्यात आलं.

मुघल-ए-आझम: एका तपानंतर…

मंडळी , हा भाग म्हणजे या लोकविलक्षण चित्रपटावषयींच्या दोन लेखांपैकी शेवटचा भाग . वास्तववादाच्या भुकेल्या आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न स्वीकारणार्‍या असीफनं चित्रपटातील युद्धप्रसंगासाठी भारतीय सैन्यातून लोक मागवले होते. युद्धाच्या शॉट साठी २००० उंट, ४००० घोडे आणि ८००० सैनिक मागविले गेले. त्यापैकी बरेचसे सैनिक भारतीय सेनेतून मागविले गेले. दिल्लीहून वेशभूषेसाठी खास शिंपी बोलावले गेले, सुरतहून जरदोशी करणारे कलाकार आले, कोल्हापूरच्या कारागिरांनी मुकुट व तत्सम दागिने, राजस्थानी कारागिरांनी हत्यारे तर आग्र्याच्या कारागिरांनी खास त्या काळी लागणारी पादत्राणे बनवायला सुरुवात केली.

लवकरच शीश महालची उभारणी सुरु झाली (एकूण २ वर्षे ह्या महालाची उभारणी सुरु होती) जयपूरच्या अंबर किल्ल्यातील एका महालाची प्रेरणा या कामामागे होती. पण त्यासाठी लागणारी त्या दर्जाची रंगीत काच भारतात उपलब्ध नव्हती. ही काच बेल्जियम वरून मागवावी लागणार होती. पण चित्रपटाचा निर्माता शापूरजी पालनजी जो त्यावेळी भारतातला सगळ्यात मोठा बिल्डर होता, त्याला असे वाटू लागले कि पैशाचा अपव्यय होतोय कि काय. त्याने के. असिफच्या बेल्जियम काचेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. लवकरच ईद आली आणि शापूरजी पालनजी के. असिफ च्या घरी ईदी घेऊन पोहोचला. एका ताटात १ लाख रोख आणि काही सोन्याची नाणी लावलेला अंगरखा अशी ईदी त्याने आणली होती. के. असिफ ने मात्र त्या कशालाही हात न लावता अंगरख्यावरचे केवळ एक सोन्याचे नाणे काढून घेतले आणि उरलेल्या सगळ्या ईदीतून बेल्जियमवरून शीशमहल साठी काचा आणा असे फर्मावले. आणखी एका शॉट साठी ज्यामध्ये दुर्गा खोटे दासीच्या ओट्यात मोती टाकते आणि नंतर जमिनीवर मोती पडत राहतात यासाठी के. असिफ ला पुढच्या ईदी ची वाट पहावी लागली कारण ह्या शॉट साठी त्याला खरे मोतीच हवे होते.

के असीफला नवीन रंगीत तंत्रज्ञान आल्यानंतर सर्व चित्रपट रंगीत करायचा होता पण निर्माते परत पैसे घालायला तयार नव्हते आधीच ३ चित्रपट तयार होतील एवढी फिल्म १ चित्रपटासाठी वापरली होती तेव्हा ८५ % चित्रपट कृष्णधवल तर १५% चित्रपट रंगीत बनवला गेला. युद्ध प्रसंग चित्रित करताना मात्र वेगळीच समस्या निर्माण झाली, अधिकतर सैनिक भारतीय सेनेतून चित्रीकरणासाठी वापरले होते पण जोशात येऊन बरेच सैनिक एकमेकांना नकळत इजा करायचे. त्या नंतर अतिशय जपून चित्रीकरण करण्यात आले. पृथ्वीराज कपूर आणि दिलीपकुमार दोघानाही घौडदौड करण्याची भीती वाटायची ह्यासाठी खऱ्यासारखे दिसणारे कागदी लगद्याचे खोटे दोन घोडे केले गेले आणि चित्रीकरणात ट्रिक फोटोग्राफीचा वापर करून असे प्रसंग चित्रित झाले की चुकुनही वाटत नाही की ते घोडे खोटे आहेत. हे घोडे बी. आर. खेडकरानी बनवले होते.या कलाकृतीची संकल्पना आखल्यापासून तब्बल १२ वर्षानंतर अनेक समस्या, संकट पार करीत हा चित्रपट ५ ऑगस्ट १९६० ला रिलीज झाला.

मुघल राजे जसे फर्मान काढायचे तशाप्रकारच्या लांब वाटोळ्या उर्दू आमंत्रण पत्रिका काढल्या गेल्या. अॅडव्हान्स बुकिंग साठी ३ दिवस आधीच रांगा लागल्या होत्या, चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही ह्या रांगा बरेच दिवस अशाच राहिल्या. चित्रपटाची पहिली प्रिंट हत्तीवरून आणली गेली. एकूण जवळ जवळ २ कोटी खर्च आलेल्या (त्याकाळी ए ग्रेड चित्रपट फार फार तर १० लाखात तयार होत) ह्या चित्रपटाने त्या काळी बॉक्स ऑफिसवर ५.५० कोटी चा धंदा करून रेकॉर्ड केले जे पुढे  शोले ने मोडले.१५० थिएटर्समधे लागोपाठ रिलीज झालेल्या या चित्रपटाने वारेमाप नांव, प्रसिद्धी, पैसा कमावला. नोव्हेंबर २००४ मध्ये मूळ निर्माता शाप्पुरजी पालनजी यांच्या नातवाने नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व चित्रपट रंगीत करून पुन्हा रिलीज केला, त्यावेळी रिलीज झालेल्या इतर नव्या चित्रपटांच्या तुलनेत ह्या जुन्या पण नवीन कपडे परिधान केलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर २५ आठवडे चांगला धंदा केला.

के. असीफने असाच आणखी एक भव्य रंगीत चित्रपट तयार करण्याचे ठरविले त्याप्रमाणे गुरु दत्त आणि निम्मी ला घेऊन त्याने चित्रपट सुरु केला पण आकस्मिक गुरु दत्तचा मृत्यू झाला. त्यानंतर संजीव कुमार ला घेऊन हा चित्रपट परत सुरु केला पण १९७१ साली वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी के असीफ चा मृत्यू झाला. हा अर्धवट चित्रपट नतर पूर्ण होऊन १९८६ मध्ये लव्ह अॅड गॉड या नावाने रिलीज झाला.

आता सरतेशेवटी अशी माहिती सांगतो की जी वाचून माझ्या मनात असीफविषयीचा आदर आणि प्रेम द्विगुणीत झालं. वर ईदीच्या प्रसंगात सांगितल्याप्रमाणच कायमंच असीफनं स्वत:च्या ऐशोआरामासाठी वापरता येणं शक्य असूनही फायनान्सर्स सिराज अली व शापूरजी पालनजी यांचा संपूर्ण पैसा चित्रपटाच्या निर्मितीसाठीच वापरला. तो सदैव साध्या कापडाच्या शर्ट पायजम्यातंच वावरला.त्याच्याकडे स्वत:ची मोटार नव्हती—तर टॅक्सीनं ये—जा करायचा. नाही म्हणायला व्यसन म्हणजे ओठात सदैव सिगारेट असायची. ती पण स्वस्तातली.

५ ऑगस्ट १९६० ला मराठा मंदिरला ‘मुघल-ए-आझम’चा प्रिमिअर होता. शीशमहलचा अख्खा सेट थिएटरबाहेर आणवला होता. जत्रा होती जत्रा ती. मुंबई, मद्रास, कलकत्ता, अमेरिका, इंग्लंड, चीन, पाकिस्तान…. सगळीकडचे आघाडीचे दिग्दर्शक, नट नट्या, निर्माते, नामवंत मंडळी आली होती. चित्रपट पाहिल्यानंतर प्रमुख पाहुणे – तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण म्हणाले, “हा ऐतिहासिक चित्रपट स्वत:च एक इतिहास निर्माण करेल व चित्रपट इतिहासात त्याचं नांव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल.” आचार्य अत्र्यांनी म्हटलं, “इतका भव्य दिव्य सुरेख सुंदर तसंच सुमधुर संगीताचा साज चढवलेला चित्रपट पुढील शंभर वर्षांत निर्माण होणार नाही.” हॉलीवुडच्या एका नामवंत निर्मात्यानं असीफच्या कर्तृत्वाची वाखाणणी करंत म्हटलं, “या प्रतिभाशाली माणसानं इतिहासाचं परिवर्तनंच या अलौकिक कलाकृतीनं केलं आहे.” चित्रपटाच्या प्रिमीअरला दुनिया लोटली होती आल्या नव्हत्या फक्त दोन व्यक्ती : नायक सलीम ऊर्फ युसूफ खान ऊर्फ दिलीप कुमार आणि नया दौर सिनेमाप्रकरणी कोर्टाची पायरी चढायला लागल्यानंतर आणि दिलीपकुमार बरोबरचे आपले प्रेम वकिलांकरवी चव्हाट्यावर मांडलं गेल्यानं दुखावली गेलेली चित्रपटाची नायिका अनारकली ऊर्फ मुमताझ जहान देहलवी ऊर्फ मधुबाला.

१९६१ मध्ये मुगल-ए-आझमला फिल्मफेअरचे ३ अवॉड मिळाले. बेस्ट सिनेमॅटोग्राफर- आर.डी. माथूर, बेस्ट डायलॉग आणि बेस्ट पिक्चर ऑफ द इयर. यापैकी डायलॉग साठी एकच ट्रॉफी होती व सिनेमाचे ४ लेखक होते. कमाल अमरोही, वसाहत मिर्झा, एहसान रिझवी व अमानुल्ला खान. ट्रॉफीसाठी सिनेमासाठी सगळ्यात जास्त योगदान असणारा लेखक निवडायचा निर्णय असिफवर सोपवण्यात आला. परंतू असिफने याला विनम्रपणे नकार दिला. कारण एक सच्चा कलाकार दुसर्‍या च्च्या कलाकाराचं मोल जाणतो. असिफच्या मते चौघेही लेखक या बक्षिसाचे मानकरी होते. असिफने नकार दिल्यामुळे हे बक्षिस रद्द झालं. बेस्ट सिनेमाचा अवॉर्ड पण असिफनं नाकारलं. याचं कारण बेस्ट अभिनेत्री म्हणून बीना रॉयला घूँघटसाठी अॅवॉर्ड मिळाले होते. हा सिनेमा अतिसामान्य होता. मुघल-ए-आझमच्या शीशमहलचे खांब व सेट असिफने आपला मित्र गुरुदत्त याला ‘चौदहवी का चाँद’साठी वापरायला दिले होते. तर बेस्ट कलादिग्दर्शनाचं अवॉर्ड मिळालं

चौदहवी का चाँद सिनेमाला. एम. सादिक यांना असंच बेस्ट अॅक्टर, लिरिक्स म्यूझिक अशी सगळी अवॉर्ड इतर सिनेमांना मिळाली. म्हणून असिफचं म्हणणं असं होतं की जर माझा सिनेमा बेस्ट आहे ज्या सगळ्यांच्या बेस्ट परफॉर्मन्समुळे त्यांना अवॉर्ड नसतील तर माझा सिनेमा बेस्ट म्हणून मला हा अवॉर्ड घेण्याचा अधिकारच नाही.

करीमउद्दीन असीफची पहिली बायको सितारादेवी., दुसरी बायको निगार सुलताना या दोघी त्याला सोडून गेल्या. त्यानं तिसरं अन् शेवटचं लग्न केलं दिलीप कुमारच्या अख्तर नावाच्या बहिणीशी. याच कारणामुळे दिलीपकुमारचे असिफशी संबंध दुरावले व तो १९६० ला मुघल-ऐ-आझमच्या प्रीमीअरला पण गेला नाही.

१४ जून १९२२ ला जन्माला आलेला असीफ ९ मार्च १९७१ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४९ व्या वर्षी गेला. न भूतो न भविष्यती अशी दिमाखदार भव्य दिव्य कलाकृती कलाप्रेमी लोकांना नजर करणारा असीफ गेला तेव्हा त्याच्या बँकेत सेवींगमध्ये फक्त ५७ रुपये शिल्लक होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घटस्फोटीत बायकांनी वर्गणी काढून त्याचा अंत्यविधी पार पाडला. असा होता स्वप्नवेडा ध्येयवेडा परफेक्शनीस्ट के. असीफ. असीफ, आज ५८ वर्षांनीही हा चित्रपट त्याची गाणी बघताना पडद्यामागची तुझी एक तपाची मेहनंत जाणवते आणि डोळ्यांत पाणी येतं.

– उदय गंगाधर सप्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 2:20 pm

Web Title: bollywood old movies veteran actress madhubala 85th birth anniversary today story news in marathi part 8
Next Stories
1 दोस्त असावा तर असा! बॉबीचे करिअर सावरण्यासाठी सलमानची धडपड
2 प्रिती झिंटा छेडछाड प्रकरणी नेस वाडियाविरोधात आरोपपत्र दाखल
3 जयपूरच्या रस्त्यांवर पापड विकतोय बॉलिवूडचा हॅण्डसम हंक
Just Now!
X