आज २३ फेब्रुवारी. आजपासून बरोबर ४९ वर्षांपूर्वी सिर्फ मेरेही नहीं बल्की करोडों लोगोंके ख़यालोंकी मलिका मधुबाला हे नश्वर जग सोडून गेली. लौकीकार्थाने आज तिचा स्मरणदिन. पण हि फक्त एक औपचारिकता झाली. माझ्यासारख्या अनेकांना मधुबाला आठवली नाही असा एक दिवसही गेला नसेल, मग जिला कधी विसरलोच नाही तिचा स्मरणदिन कसा? असो..

आज आपण पाहूया मधुबालाच्या सारीपाटावर नशिबाने खेळलेला किशोरकुमार नावाचा अखेरचा फासा पण कसं विरुद्ध दान देऊन गेला..
किशोरशी लग्न करुन मधुबाला त्याच्यासह सासरी गेली. सासू—सासर्‍यांच्या पाया पडायला गेल्यावर त्यांनी पायाला तिचा स्पर्शही होऊन दिला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता, एका मुसलमान स्त्रीशी किशोरनं केलेला निकाह त्यांना मान्य नव्हता. अशोककुमारच्या सूचनेनुसार मग किशोरनं मधुबालाशी एका देवळात जाऊन वैदिक पद्धतीने लग्न केलं, तेव्हा कुठे त्याच्या आई—वडिलांनी त्यांना घरात घेतलं. पण मधुबाला पाया पडल्यावर शतायुषी भव, असा फलद्रूप न होणारा आशीर्वाद देत ते किशोरकुमारच्या त्या घरातून निघून जात अशोककुमारच्या घरी रहायला गेले. आपलंच नाणं (खरं तर बेणं, बायकोच्या बाबतीत व एकूणच कसं विक्षिप्त आहे हे माहित असूनही) खोटं असल्याचं पक्कं ठाऊक असूनही त्यांनी किशोरने रुमाला सोडल्याबद्धल व आपल्या लेकाला नादी लावल्याबद्धल मनोमन मधुबालालाच दोषी ठरवून टाकलं होतं. घरातील नोकर—चाकर पण याच समजूतीत होते व त्यामुळे तेही तिच्याशी फटकून वागू लागले.

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

खरं तर मधुबाला ही अत्यंत लाभदायी ( अंधश्रद्धाळूंच्या भाषेत चांगल्या पायगुणांची ) ठरली होती. कशी? तर… गौरी कुंज हा किशोरचा जुहूचा बंगला आयकर विभागाने जप्तीसाठी सीलबंद केला होता. पण मधूशी लग्नानंतर त्याचे चलतीका नाम गाडी, महलोंके ख्वाब, हाफ टिकट बाॉक्स ऑफीसवर हिट झाले. खेरीज मीनाकुमारीबरोबरचा शरारत, वहिदासोबतचा गर्ल फ्रेण्ड, नूतनसोबतचा चंदन, दिल्लीका ठग तसंच माला सिन्हासोबतचे जालसाज, बेवकूफ हे सगळे सिनेमे मस्तपैकी गल्ला जमवून गेले. पार्श्वगायनामधेही बर्‍यापैकी पैसा मिळू लागला होता. वर मधुबालानेही त्याला काही लाख रुपये दिले. त्यामुळे गौरी कुंजचा लिलाव होता होता वाचला. पण हे सारं व्हायच्या दरम्यान किशोरनं मधुबालाला कार्टर रोडवर एक छोटासा बंगला विकत घेऊन दिला होता. मधूच्या लाघवी स्वभावामुळे रूमानं किशोर व तिचा मुलगा अमितकुमार याला तिच्याकडे रहायला पाठवून दिलं होतं. त्याच्यामुळे तिचे काही दिवस चांगले गेले पण ८ वर्षाचं मूल ते. आईची आठवण येऊ लागली म्हटल्यावर रुमा त्याला कलकत्त्याला घेऊन गेली.

लग्नापूर्वीच मधूनं किशोरला कल्पना दिली होती की मुंबईच्या तिच्या डॉक्टर जाल वकील यांच्या म्हणण्यानुसार शरीरसंबंधसुद्धा तिच्या नाजूक तब्येतीला मातृत्व झेपणारं नसल्याने कितपत त्याला फलदायी होतील ही शंकाच आहे. तरीही मधूशी लग्नासाठी किशोरच तिच्यामागे लागला होता. नंतर लंडनला गेल्यावर तिथल्या डॉक्टर्सनी पण तिच्या गंभीर आजाराबाबत स्पष्ट कल्पना किशोरला दिली होती. तिला Congenital Cardiac Defect होता. संभवत: तिच्यात एट्रियल सेप्टल डिफेक्ट होता. म्हणजे हृदयाच्या ४ कप्प्यांपैकी २ वरच्या कर्णिका व २ खालच्या जबनिका असतात, यातील तिच्या कर्णिकांच्या मधोमध असलेल्या पडद्याला ( सेप्टम ) छिद्र असावं. जे मोठं असावं ज्यामुळे डाव्या कर्णिकेतील शुद्ध रक्त त्या छिद्रातून उजव्या कर्णिकेत अतिरिक्त प्रमाणात जात राहिलं आणि परिणामी अशुद्ध रक्ताचा फुफ्फुसांकडे जाणारा प्रवाह वाढून नको इतका रक्तदाब वाढला. हा परिणाम साधारण वयाच्या तिशीच्या आसपास दिसू लागतो व त्यामुळेच लहानपणी खूपदा खोकला, रक्ताच्या उलट्या वगैरे तिला शूटिंगच्या सेटवर झाल्या होत्या. पण वलीखान फकीराचं भविष्य ऐकूनही अताउल्लाखाननी तिचं हे दुखणं फार गंभीररित्या मनावर न घेता थातूर मातूर औषधांवर काम चालवलं. कमावत्या मधूच्या कमाईत खंड पडलेला खानला नको होता, पण एखाद्या तज्ञ डॉक्टरांकडे नेऊन तिच्याच कमाईतील गंगाजळी वापरून तिच्या रोगाचं सखोल निदान करवून घेण्याची सद्बुद्धी त्याला झाली नाही.
पण आता २८ या वयात शस्त्रक्रिया अशक्य होती व शरीरसंबंध, मातृत्व धोकादायक. निव्वळ औषधं हाच उपाय, डॉक्टर्सनी जास्तीत जास्त २—३ वर्षांची तिच्या जगण्याची शक्यता किशोरकडे बोलून दाखवली होती. ( पण जबरदस्त इच्छाशक्तीचं वरदान असलेल्या मधूनं ९ वर्ष काढली. यातील पहिल्या ४ वर्षांत तिनं झुमरू, पासपोर्ट, हाफ टिकट आणि शराबी पूर्ण केले. नंतर मात्र १९५७ साली एम्.व्ही.रामन यांनी सुरु केलेला ज्वाला सिनेमा ज्यात आधी किशोर — वैजयंतीमाला होती , त्यात किशोरच्या आग्रहाखातीर मधूला घेतलं व नंतर मानधनावरुन किशोरशी न पटल्याने सुनील दत्त—मधुबाला हीच स्टारकास्ट कायम ठेवत शूटिंग सुरु केलं. पण पुढे पुढे मधूचा आजार खूप बळावल्याने शेवटी शेवटी मधूची बहिण चंचलजी बरीचशी तिच्यासारखीच दिसायची. तिला घेऊन लाँग शॉट्ससह सिनेमा कसाबसा पूर्ण केला. जो मधुबाला गेल्यानंतर २ वर्षांनी १९७१ ला रिलीझ झाला.)

लग्न झालं तेव्हा २८ वयाची मधू आणि ३२ वयाचा किशोर. मधूने कल्पना देऊनही किशोरनं तिच्याशी लग्न केलं. नव्या नवलाईचे दिवस सरल्यावर मात्र वास्तवातील दाहकता भीषण रूपात समोर आली. किशोर चिडचिड करु लागला, भांडणं होऊ लागली. वैतागून मधुबाला कार्टर रोडच्या किशोरच्या बंगल्यातून तिच्या अरेबियन व्हिला या बंगल्यावर रहायला आली. शारीरीक संबंध नव्हतेच व मानसिक संबंधही दुरावत चालले होते.

१९६६ साली जे.के.नंदा यांनी राज कपूर व मधुबालाला घेऊन चालाक सुरु केला. पण मधुबाला एके दिवशी सेटवरच खाली कोसळली. तिच्या कमकुवत हृदयानं तिच्या इच्छाशक्तीपेक्षाही आपण अधिक चालाक असल्याचा धोक्याचा इशाराच दिला होता. यानंतर मधुबाला जवळजवळ अंथरुणाला खिळल्यासारखीच झाली. मधुबालाची कमाई बंद झालेली, घरासमोरील ४ मोटारगाड्यांपैकी ३ विकून झालेल्या, आई—बहिणींचे सगळे दागदागिने गहाण. वर घर चालवायला सावकाराचं कर्ज. मधुबाला आता जगणार नाही अशी आवई घरातील नोकरा चाकरांनी बाहेर पसरवली. त्यांचेही कित्येक महिन्यांचे पगार थकलेले. मधूला त्रास नको म्हणून घरच्यांनी कितीही लपवलं तरी एक दिवस सावकार घरातील वस्तू जप्त करून कर्जवसूलीसाठी दारात उभा ठाकला म्हटल्यावर मधूला कुणकुण लागलीच. तिनं प्रचंड व्यस्त ( आणि त्रस्त ) असलेल्या किशोरला फोन लावून हकीगत सांगितली व मदतीसाठी बोलावलं पण पुढचं बोलेस्तोवर समोरचा फोन निर्जीव झाल्याची जाणीव तिला झाली. ढळला रे ढळला दिन सख्या, संध्याछाया भिवविती हृदया अशी आपली अवस्था झाल्याचं जाणवून मधुबालाला भरून आलं. एकेकाळी मेकअप गर्ल ते पार अगदी बांगलादेशातून येणार्‍या शरणार्थी आपद्ग्रस्तांना सढळ हस्ते आर्थिक मदत करणार्‍या मधुबालावर घरातील लिलाव थोपवण्यासाठी स्वत:च्या नवर्‍यापुढे हात पसरायची वेळ आली होती. पण अजून अल्लाहला तिची थोडीशी कणव बाकी होती. गौरी कुंजची नीलामी थांबवणार्‍या मधूची पुण्याई कामी आली व किशोर ऐनवेळी १ लाख २० हजार रुपये घेऊन आला व ते त्या सावकाराला दिले व पुढची अब्रूनुकसानी टळली. उरलेले ८० हजार रुपये मधूला देऊन किशोर एकही अवाक्षर न काढता निघून गेला. मधूला मेल्याहून मेल्यासारखं झालं. एक डोळा किशोरबद्धलच्या कृतज्ञतेने हसत होता तर दुसरा स्वत:च्या असहाय्य गलितगात्र स्थितीसाठी रडत होता. पण तरीही किशोरच्या त्या कृत्याने तिला तरतरी आली. बर्‍याच दिवसांनी बाहेर फिरायला म्हणून ती खाली आली. पोर्चमधील ४ पैकी एकच गाडी दिसताच तिला गाड्या दुरुस्तीला गेल्याचं चंचलनं सांगितलं. पण मधूनं शंका घेत खोदून विचारल्यावर गाड्या विकून टाकल्याचं चंचलनं सांगितलं. सुदैवाने १ गाडी होती व ड्रायव्हर मोहमद अजून सोडून गेला नव्हता. तिनं आस्थेनं त्याची चौकशी केल्यावर २ मुलगे टॅक्सी चालवतात व पैसे जमताच स्वत:ची नवी टॅक्सी घेण्याचा विचार त्याने बोलून दाखवला. त्याचाही पगार थकलेलाच असणार हे सावकार प्रकरणावरून मधूनं ताडलं. आपल्या हातातील सोन्याच्या २ बांगड्या मधूनं त्याला काढून दिल्या व म्हणाली, लो मोहमद इन्हें बेचकर अपनी टॅक्सी ले आओ. अब मुझे इनकी कोई ज़रूरत नहीं रही. ईमानी हाडाचा मोहमद गहिवरला व गदगदून म्हणाला, मालकीन आपकी सुहागकी निशानीसे ज्यादा कीमती नहीं है कुछभी. आपकी सलामतीसे ज्यादा और कुछभी बेशकीमत नहीं है मालकीन. अल्लाताला आपको सलामत रखे, असं म्हणून बांगड्या मधूच्या हाती ठेवत ओक्साबोक्षी रडत तो मधूसमोर पाठ करत निघून गेला. कृश झालेल्या मधूच्या हातात बांगड्या सहज परत गेल्या. सौभाग्यच रुसलं होतं तिथं सुहागकी निशानी काय करणार? मधू परत खोलीत परतली.

मधूनं मध्यंतरी चंचलकरवी दिलीपकुमारला येऊन भेटून जा असं सांगितलेलं. दिलीपने जरी सायरा बानोशी १९६४ ला लग्न केलं असलं तरी तो मधुबालाला विसरणं अशक्य होतं. मधुबालाच्या आजाराबद्धल चंचलकडून समजताच मधुबालाला मोठ्या मनानं माफ करुन तो तिला भेटायला आला व नंतर पण वारंवार अधूनमधून भेटायला येत राहिला. मधूनं आवर्जून त्याला भेटायला बोलावून सावकाराची हकीगत सांगितली. बर्‍याच दिवसानंतर म्लान मधूचा हसरा चेहेरा पाहून दिलीपलाही बरं वाटलं. आपण दोघे एखादा छान सिनेमा करुया ना, असं म्हणणार्‍या मधूला तो म्हणाला , ईन्शाल्ला ! ज़रूर , आप पहले तन्दुरुस्त हो जाएँ फिर हम तुरंत इसपर अमल करेंगे. क्षीणसं हसत मधू म्हणाली , क्यूँ , युसूफ अब मैं वो तुम्हारी पहलेवाली मधू नहीं रही, है ना? और ना ही अब कभी ठीक हो पाऊँगी , सच है ना? डोळ्यांतील पाण्यामुळे समोरचं धूसर दिसणार्‍या मधुबालाच्या गालावर अश्रू ओघळेतोवर घशातला आवंढा व डोळ्यांतील अश्रू लपवत अनारकलीचा सलीम गदगदत निघून गेला होता.

मधूला आता धाप लागायची. ऑक्सीजन कमी पडला की शेजारच्या पाण्याच्या बाऊलमधली ऑक्सीजनची नळी चंचल किंवा कुणीतरी हळूच तिच्या नाकपुडीत सोडून देई. पाचेक मिनिटांनी मधू पूर्ववत झाली की परत नळी काढून ठेवली जाई. मधुबाला आजारी असल्याने किशोर, दिलीप व ठरावीक लोक वगळता खान कुणालाच तिच्यापर्यंत पोचू देत नसे. त्यामुळे मधूला खोलीत कोंडल्यासारखं होई. तिला विरंगुळा म्हणून अताउल्लाखाननं एक प्रोजेक्टर व काही सिनेमांची १६ mm ची रिळं आणून ठेवली होती. कंटाळा आला की मधू ते सिनेमे पहात बसे. मुगल—ए—आझम , अमर , महल , चलतीका नाम गाडी , बरसातकी रात , मिस्टर अॅण्ड मिसेस ५५ हे सिनेमे तिला खूप आवडत .त्यातही मुगल—ए—आझम मधील अनारकलीची आपली भूमिका ( आणि अर्थातंच सलीम ) तिला खूप आवडायची. त्यात ती गुंगून जाई आणि अर्थातंच असं नेमकं किशोर तिला भेटायला येई तेव्हा बर्‍याचदा होई. किशोरचा जळफळाट होई व तो संतापून म्हणे, सारखे त्या संथ अभिनयाचे व तोंडातल्या तोंडात बोलणार्‍या गुळमुळीत अभिनयाच्या दिलीपचे सिनेमे बघण्यापेक्षा चलतीका नाम गाडी , झुमरु , हाफ टिकट , ढाके की मलमल बघत जा. मला तू त्याचे सिनेमे पाहिलेले अजिबात आवडणार नाही.

धुमकेतूसारख्या उगवणार्‍या किशोरला का उगीच नाराज करा या विचाराने मधूने यावर पण एक कायमचा उपाय शोधून काढला. अरेबियन व्हिला पाशी येताच किशोर त्याच्या गाडीचा हॉर्न वाजवायचा. दरवनाने गेट उघडून किशोर गाडी पार्क करुन वर येईतोवर मिळणार्‍या त्या दहा एक मिनिटांत चंचल धावत पळत येऊन मुघल—ए—आजम चा चालू असलेल्या इतर सिनेमाचं रीळ काढून किशोरचा सिनेमा लावून जाई. आपला सिनेमा मधू पाहतेय या जाणिवेनं किशोरचा अहं कुरवाळला जाऊन तो खूश व्हायचा. अस्ताला जाणार्‍या एका जिवाच्या सुख शांती समाधानापेक्षा धडधाकट जिवाचा अहंभाव जगात महत्वाचा व वरचढ ठरत होता आणि कायम दुसर्‍यांच्याच मनाचा विचार करणार्‍या मधूच्या मनातील भावनांचा असाच कायम चक्काचूर होत राहिला. यालाच प्राक्तन म्हणत असावेत.

एकदा मधूनं चंचलकरवी केदार शर्माला भेटायला बोलावलं. केदार शर्मानं मधुबालाला अगदी लहान ते नीलकमलच्या वेळी आपल्यावरील प्रेम व्यक्त करणार्‍या पौगंडावस्थेपासून ते पार उमललेल्या कळीसारख्या हरएक अवस्थेत पाहिली होती. तिची ही अवस्था पाहून कवीमनाचा केदार स्फुंदून अश्रू ढाळू लागला. शर्माजी, मी गेल्यावर ढाळण्यासाठी ही आसवं शिल्लक ठेवा. माझी एक शेवटची इच्छा आहे. नीलकमलसाठी लिहिलेलं व नंतर त्यात न घेतलेलं ते गीत तुम्ही मला द्या आणि ते गीत इतर कुठल्याही सिनेमासाठी तुम्ही वापरणार नाही असं वचन द्या.
यावर केदार शर्मानं पेन काढून ते गीत लिहून काढून मधूच्या हाती तो कागद सोपवला. राधाको न तरसा , शाम पछताएगा ; नैन छलक आए तो ब्रिज बह जाएगा, आपल्याच गीतातील शब्दांनी घायाळ केदार शर्माला गलबलून आलं व तो मधूला ते गीत इतर कुठल्याही सिनेमात न वापरण्याचं वचन देण्याइतपतंच कसंबसं बोलून शोकाकूल अवस्थेत निघून गेला.

इतर वेळी मधूला जपणारा खान तिच्या वाढदिवसाला मात्र दरवर्षी तिला भेटण्याची सार्‍यांना मुभा देत असे. पूर्ण घर फुलांच्या बुकेंनी भरून जाई. १४ फेब्रुवारी १९६९, आज मात्र अस्ताला चाललेल्या सूर्याची आठवण ठेवत शमीम नावाची मधुबालाच्या मेकअप रुममधे किरकोळ कामं करणारी गरीब मुलगी सगळ्यात आधी गुलाबाचं एक फूल घेऊन आली होती. तिला मधूनं सढळ हाती मदत केली होती. पण त्यादिवशी मात्र तिच्या दारुड्या बापाने आईला मारताना मधे पडलेल्या शमीमच्या हातातील गुलाब पाहताच तिलाही मारलं व मधूकडं जाऊन त्या एका फुलाचं मधुबालाला काय महत्व असं म्हणत मधूबालालाही बोल लावला होता. मधूनं रडणार्‍या शमीमला जवळ घेतलं व कपाटातून शाहिदाचे कपडे तिला लेववून खाऊपिऊ घातलं व म्हणाली , तेरे आँसू फूलोंके गुलदस्तेसेभी बेशकीमती है शमीम.

मग बी.के.करंजिया साहेबांकडून पुष्पगुच्छ आला. रात्री खूप उशिरा फुलांचा खूप मोठा गुच्छ घेऊन किशोर आला. निराश व हताश मधूचे शायद मेरा अगला जनमदिन मुझे ख़ुदाके साथ बिताना पडेगा, या वाक्यावर मधूची समजूत घालून किशोर चंचलला जरुरत पडे तो मुझे कभीभी बुला लेना, मै आऊँगा, असं म्हणत निघून गेला. ओघळणारे आसू ओसरताना मधुबालाला अहेवपणी मरण देणारं तिचं सौभाग्य मात्र दूर दूर जाताना दिसत होतं.

पुढच्या ८ दिवसात मधूची तब्येत आणखीनंच ढासळत गेली. पक्की नमाज़ी बनलेल्या मधुबालाची आता शेवटची दुवा अल्लाहच्या दरबारात मंजूरीसाठी निघाली होती. आश्चर्यकारकरित्या २२ फेब्रुवारीला छान शांत झोप लागली. ऑक्सीजनची नळी तोंडात सरकवणं, मग तिचं ते ऑक्सीजन आत हृदयात पोहचेपर्यत पाण्याविना माशासारखं तडफडणं…. जीवघेणी धाप …. मग परत शांत होणं — काही काही त्या रात्री त्रास झाला नाही मधुबालाला. चंचलसह सगळेच खूप खूश होते २३ फेब्रुवारी १९६९ च्या त्या सकाळी.

पण दिव्याची ज्योत विझण्याआधी तेजपुंज दिसते , मोठी होते, हा निसर्गनियम आहे आणि त्याला अनुसरूनच अचानक मधूचा ऊर धपापू लागला, तोंडात सरकवलेल्या ऑक्सीजनच्या नळीचाही उपयोग होईना, छाती लोहाराच्या भात्यासारखी वरखाली होऊ लागली.
मधूच्या कानावर तिच्याच शिरीन फरहाद मधील एस्.मोहिंदर यांनी सजवलेले शब्द खूप खूप दुरून आल्यासारखे येत होते. गुज़रा हुवा ज़माना, आता नहीं दोबारा, हाफ़िज़ ख़ुदा तुम्हारा..कुठल्यातरी एका क्षणी ऑक्सीजनची नळी तोंडातून बाहेर पडली, तोंड मिटलं, डोळे फिरले.

मधुबालाची इबादत अल्लाहच्या दरबारात मंजूर झाली होती. एक आरस्पानी लावण्य अनंतात विलीन झालं.

आज या घटनेला ४९ वर्ष झाली. पण आजही हे लिहित असताना हृदयात एक कळ उमटते. मधुबाला गेल्यावर तमाम दुनिया अरेबियन व्हिलावर लोटली होती. पण मेरे ज़नाज़ेके पीछे सारा जहाँ निकला, मगर वो नहिं निकले जिनकेलिए मेरा ज़नाज़ा निकला, या उक्तीप्रमाणे गोपी सिनेमाच्या शूटिंगसाठी मद्रासला गेलेल्या दिलीपकुमारला ही दु:खद वार्ता कळून तो येईपर्यंत सांताक्रूझच्या रहिमतबागेत त्याची गोपी का कबरीत चिरनिद्रेच्या अधीन झाली होती. त्याच्या हाती संध्याकाळी उशिरा मधुबालाच्या कबरीवर एकटाच अश्रू ढाळण्यापलिकडे काहीच उरलं नव्हतं. सिनेमातील अकबराने अनारकलीची जान बक्षून तिला अमर केलं होतं आणि सख्ख्या बापानं मात्र सच्च्या प्रेमी दिलीपकुमारपासून मधुबालाची ताटातूट करून बिजवराच्या पदराला लेकीला बांधून अखेर तिला आयुष्यभर तडपवून जमिनीखाली गाडलं.

आजही मधुबालाचा तो प्रफुल्लित चेहेरा आठवला की तिच्यावर केलेल्या माझ्या तीन चारोळ्या आठवतात.

मंडळी , मधुबालावरील दास्तान—ए—मधुबाला ही १० लेखांची विशेष लेखमाला संपवताना मी तिला माझ्या या ३ चारोळ्यांनी श्रद्धांजली वाहतो आणि आपला निरोप घेतो. या लेखासोबत मधुबालाचं मी काढलेलं एक स्केच डाव्या बाजूला व उजव्या बाजूला या ३ पैकी २ चारोळ्या स्वहस्ताक्षरात व १ खास चारोळी, जी मधुबालाला घडवणार्‍या प्रत्यक्ष जगन्नियंत्या परमेश्वराचंच मनोगत आहे.

प्रिय मधुबाले,
कोण म्हणतं ही कविता आहे?
ही तर तुमचीच सृष्टी आहे
माझ्याकडे फक्त “ती”
“आपली” म्हणून पहाण्याची दृष्टी आहे!

तुझी आठवण म्हणजे
सुखाने दु:खाची पाठवण आहे
मरगळलेल्या आयुष्याच्या वहीत …
जणू मोरपिसाची साठवण आहे!

{ परमेश्वराचं मनोगत : }

घडवल्यावर जाला “त्या” ला वाटलं ,
आपली बाकीची सर्व निर्मिती नगण्य!
अशी ही एकंच “मधुबाला”
म्हणजेच ;
म दिरेशिवाय
धु न्दावणारं
बा वनकशी
ला वण्य !

शब्दांकन- उदय गंगाधर सप्रे