महाभारतकथेतील बऱ्याच पात्रांपासून प्रेरणा घेत आजवर अनेक सिनेमे साकारण्यात आले. निर्माता- दिग्दर्शकांचाही या महाकाव्याकडे बराचसा कल असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे फक्त सिनेमांच्याच माध्यमातून नव्हे तर मालिकांच्या माध्यमातूनही महाभारत नेहमीच पुनरुज्जिवीत करण्यात आले. अशा या महाकाव्यातील एका महत्त्वाच्या घटकाचा धागा पकडत ‘फँटम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने एका सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा म्हणजेच अश्वत्थामाच्या जीवनप्रवासावर हा सिनेमा आधारला असल्याचे म्हटले जातेय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधु मेंटेना आणि विकास बहल यांची निर्मिती संस्था ‘फँटम फिल्म्स’ने उदयशंकर यांच्या सर्वाधिक वाचकपसंती मिळालेल्या ‘इम्मोर्टल’ या पुस्तकावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्याची तयारी केली आहे. महाभारत या महाकाव्यातील अश्वत्थामाला केंद्रस्थानी ठेवत हे पुस्तक लिहिण्यात आले होते. भगवान श्रीकृष्णाने शाप दिलेल्या अश्वत्थामाविषयी जाणून घेण्यात अनेकांनाच रस असल्याची बाब या निर्मितीसंस्थेने अचूकपणे हेरली आहे. या सिनेमाची कथा तीन भागांमध्ये दिग्दर्शकांसमोर मांडण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्याचे वातावरण पाहता कथानकात काही बदल करण्यात येणार असून ते आजच्या पिढीशी सुसंगत होऊ शकतील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सध्या प्रसंगानुरुप सिनेमांची निर्मिती करण्याकडे निर्मात्यांचा कल असल्याचे स्पष्ट होतेय. फँटम फिल्म्सच्या मधु मेंटेना यांनी या सिनेमाच्या निर्मितीविषयी उत्सुकतेची भावना व्यक्त केली.

‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘आम्ही या सिनेमासाठी फारच उत्सुक असून, आतापर्यंत अशा प्रकारचा सिनेमा कोणीही प्रेक्षकांच्या भेटीला आणलेला नाही. कल्पना आणि दंतकथा या दोन्ही गोष्टींमध्ये सुयोग्य मेळ साधत या सिनेमाची निर्मिती करण्यात येईल’,असे मधु म्हणाल्या.

महाभारत महाकाव्याचे महत्त्व, अश्वत्थामा, गुरु द्रोण यांच्याविषयीच्या दंतकथा हे सर्व वातावरण पाहता या बिग बजेट सिनेमाच्या वाटेत धार्मिक संघटनांतर्फे काही अडथळे निर्माण केले जाणार नाहीत ना?, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.