मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो-करोडो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वयंघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने ‘नॉलेज’च्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

प्रश्न : जॅकी श्रॉफला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक कोणी दिला?

पर्याय-
१. राज सिप्पी
२. सुभाष घई
३. देव आनंद

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दादा, भिडू, जग्गा, जग्गू दादा अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्याने १ फेब्रुवारीला वयाची ६० वर्षे पूर्ण केली. जवळपास गेल्या तीन दशकांपासून अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांचे योगदान दिले आहे. बी टाऊनमध्ये जॅकी श्रॉफ यांचे एक खास स्थान आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. १९८२ साली आलेल्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी आजवर १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या ‘जग्गू दादा’ या नावाविषयीचे गुपित उघड केले होते. याविषयी सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाले होते की, ‘खरंतर माझा भाऊच जग्गू दादा होता. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची, गरजूंची तो नेहमीच मदत करायचा. एकदा तर माझ्या भावाने कोणाचा तरी जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्यावेळी त्याला पोहताही येत नव्हते. त्यामुळे कोणालातरी मदत करण्यासाठीची त्याची वृत्ती पाहून मीसुद्धा इतरांची मदत करण्याचा निर्धार केला आणि तेव्हापासूनच मी जग्गू दादा म्हणूनही ओळखलो जाऊ लागलो’.

चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी जॅकी श्रॉफ मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होते. ‘हिरो’ या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ यांनी साकारलेली भूमिका सर्वात जास्त गाजली. १९८९ मध्ये आलेल्या ‘परिंदा’ या चित्रपटाद्वारे जॅकी श्रॉफ यांच्या करिअरला कलाटणी मिळाली होती. याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.