बॉलिवूड आणि कपूर कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरु झालेला या कुटुंबाचा प्रवास आजही सुरुच आहे. अभिनेत्री करिना कपूर, करिष्मा कपूर आणि रणबीर कपूर ही या कुटुंबातील चौथी पिढी. ही पिढी चित्रपटसृष्टीत सध्या चांगली कामगिरी करते आहे. या कुटुंबाविषयी बऱ्याच चर्चा हिंदी चित्रपटसृष्टीत सतत रंगत असतात. त्यामुळे सेलिब्रिटी म्हणून वावरण्याची सवय रणबीर, करिना, करिष्माला त्यांच्या कुटुंबातूनच मिळाली आहे. निदान हा व्हिडिओ पाहताना तरी तसंच वाटतं. आजोबा राज कपूर आणि त्यांच्या नातवंडामध्ये असणारं नातं एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अभिनेत्री सिमी गरेवालच्या कार्यक्रमात दाखवण्यात आला होता. सिमी यांच्या कार्यक्रमात करिनाची विशेष उपस्थिती असताना तिला हा व्हिडिओ दाखवण्यात आला. तो व्हिडिओ पाहताना करिनाही भावूक झाली होती. राज कपूर नेहमीच करिष्माला तिच्या निळ्या डोळ्यांमुळे जास्त प्रेम करायचे असं म्हणणाऱ्या करिनाला सिमी गरेवाल यांनी तो जुना व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये आजोबा राज कपूर करिनाला मोठ्या प्रेमाने जवळ घेत आहेत. काही वेळाने रिद्धीमा आणि रणबीर कपूरही येऊन राज कपूर यांच्यासोबत बसतात.

बालपणीचा रणबीर आणि रिद्धीमाचे निरागस बोलही व्हिडिओत ऐकायला मिळत आहेत. ‘करिना का प्रेझेंट कहा है..?’ असं रिद्धीमा राज यांना विचारत असून, रणबीर मात्र स्वत:मध्येच गुंग दिसतो. छोट्या रणबीरला आजोबा राज कपूर जेव्हा नवे कपडे घालून यायला सांगतात, तेव्हा रणबीर मोठ्या चतुराईने उत्तर देतो. ‘मै नहाऊंगा ना तब पेहनूंगा.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रणबीर आणि करिनालाही जुन्या दिवसांची आठवण येईल हे नक्की.