देशभरामध्ये आज ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. तर क्रांतिकारकांनी अखंडपणे लढा दिला.आजही या शुरवीरांच्या यशोगाथा सांगितल्या जातात. बॉलिवूडमध्ये देखील या मुद्द्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटांतून भारतातील समाजजीवनाच्या एका वेगळया रूपाचे दर्शन घडते. चला तर मग पाहुयात बॉलिवूडमधील असे काही चित्रपट-

१. क्रांती –
मनोज कुमार, दिलीप कुमार, शत्रघ्न सिन्हा, परवीन बाबी, शशी कपूर, हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचा काळ दाखविण्यात आला आहे.

२. बॉर्डर –
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये सिमेवर लढणारे जवान, त्यांचा संघर्ष आणि कुटुंबाप्रतीची ओढ उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली असून आजही ही गाणी प्रत्येक भारतीयाच्या ओठी दिसून येतात. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार झळकले आहेत.

३. रंग दे बसंती –
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, सिद्धार्थ आणि सोहा अली खान हे कलाकार झळकले आहेत.

४.मंगल पांडे –
स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित मंगल पांडे हा चित्रपट आहे. या चित्रपटमध्ये आमिर खान प्रमुख भूमिकेत झळकला असून त्याच्या लूकची विशेष चर्चा रंगली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.

५. स्वदेश –
आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेशमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखने नासामधील एका वैज्ञानिकाची भूमिका वठविली असून आपल्या गावाच्या विकासासाठी तो नोकरी सोडून गावी जातो. हा चित्रपट १७ डिसेंबर २०१४ ला प्रदर्शित झाला होता.