अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामुळे भाईजान चर्चेत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. याच सर्व उत्साही वातावरणात आता आणखी एका आनंददायी बातमीची भर पडली आहे. सलमानची मुख्य भूमिका असणारा ‘सुलतान’ हा चित्रपट शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनच याबाबतची माहिती दिली आहे.

‘सुलतान २० व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. पुढील माहितीसाठी कृपया २० व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं कॅलेंडर बघावं’, असं ट्विट करत त्याने ही आनंदाची बातमी दिली. १७ ते २६ जून दरम्यान पार पडणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रिंगणात ‘सुलतान’ उतरणार असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये सलमानने कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’या चित्रपटामध्ये सलमानसोबतच अभिनेत्री अनुष्का शर्माही महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. तिने साकारलेल्या आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमध्ये ‘सुलतान’मधील भूमिकेची फार प्रशंसाही झाली.

वाचा : दहावीच्या निकालानंतर रिंकू या क्षेत्राची करणार निवड?

दरम्यान, येत्या काळात हा दबंग अभिनेता ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटासोबतच तो पुन्हा एकदा अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात काम करत असून ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठीही सज्ज होत आहे. सध्या ‘टायगर…’च्या काही भागांचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘टायगर…’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान खान कतरिना कैफ यांनी ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.