गेल्या वर्षी प्रचंड आर्थिक नुकसान सोसून पुन्हा उभं राहण्यासाठी धडपडत असलेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. यावर्षी हळूहळू चित्रपट पूर्ण करत एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात चित्रपटगृहातून लोकांसमोर यायचे असा चंग बॉलीवूडच्या मोठय़ा कलाकारांनीही बांधला होता. त्यानुसार चित्रपटांच्या तारखाही जाहीर झाल्या, मात्र राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने पंधरा दिवसांसाठी का होईना मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणासह चित्रपटगृहांनाही पुन्हा एकदा टाळे लागले आहे. यामुळे एकीकडे मोठे चित्रपट प्रदर्शनापासून रखडले आहेत, तर दुसरीकडे अनेक मोठय़ा चित्रपटांचे चित्रीकरण आणि अन्य तयारीही थांबली आहे.

वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अजूनही बॉलीवूडच्या ‘स्टार’ म्हणवल्या जाणाऱ्या मोठय़ा कलाकारांचे मोठे चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अलिया भट्टसारखे मोठे कलाकार अनेक महिने चित्रीकरणापासून दूर होते. नव्या वर्षांबरोबर करोनाच्या गोष्टी थोडय़ा स्थिरावत आहेत हे लक्षात आल्यानंतर जवळपास सगळ्याच कलाकारांनी आपल्या राहिलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणालाही सुरुवात के ली. पण आता पुन्हा एकदा करोनाचा जोर वाढला आहे, त्यामुळे एप्रिलपासूनच काही निर्बंधांना सुरुवात झाली होती. या निर्बंधात चित्रीकरण कसे पूर्ण करायचे?, या विचारात असलेल्या निर्मात्यांसमोर आणखी एक आव्हान होते ते म्हणजे त्यांच्या चित्रपटातील मोठमोठय़ा कलाकारांना होणारी करोनाची लागण.. कार्तिक आर्यन करोना बाधित झाल्यामुळे त्याची मुख्य भूमिका असलेल्या अनीस बाज्मी दिग्दर्शित ‘भूलभुलैया २’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबले होते. कोर्तिक बरा झाल्यानंतर आता चित्रीकरणाला सुरुवात करणार तोच नव्याने आलेल्या चित्रीकरणावरील बंदीमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा रखडला आहे. अक्षय कुमार, नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नाडिस यांनी ‘रामसेतू’चे बाहेरगावचे चित्रीकरण पूर्ण के ले. मुंबईतील चित्रीकरणाला सुरुवात झाली असतानाच अक्षयसह सेटवरील ४५ कामगार – तंत्रज्ञांना करोनाची लागण झाली आणि चित्रीकरण रखडले. तर

अलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे चित्रीकरणही असेच थांबत थांबत सुरू होते. आधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना करोनाची लागण झाली, त्यानंतर अलियाला करोनाची लागण झाली त्यामुळे चित्रपटाचे काम रखडले आहे. या चित्रपटाचे बऱ्यापैकी चित्रीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येते. मात्र राहिलेला भाग पूर्ण करण्यासाठी निर्माते आणि कलाकार दोघांनाही निर्बंध उठण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.

सध्या मुंबई आणि परिसरात या दोन मोठय़ा चित्रपटांबरोबर शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणचा ‘पठान’, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’, अक्षय कु मारचा ‘रामसेतू’, अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या मोठय़ा चित्रपटांसह काही वेबमालिकांचेही चित्रीकरण सुरू होते. आता या सगळ्याच चित्रपटांचे चित्रीकरण थांबून राहिले आहे. एकीक डे मालिकांचे चित्रीकरण थांबू नये यासाठी निर्मात्यांनी बाहेरगावी चित्रीकरण करण्यास सुरुवात के ली आहे. तोच फं डा हिंदी चित्रपट निर्मातेही राबवू शकतात, मात्र सगळ्याच चित्रपटांना बाहेरगावी जाऊन चित्रीकरण करणे शक्य नसल्याचे ‘फे डरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले. ‘पठान’, ‘आदिपुरुष’, ‘रामसेतू’, ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा जवळपास सगळ्याच चित्रपटांचे सेट मुंबईत लागलेले आहेत. हे सेट मोडून इतर ठिकाणी जाऊन चित्रीकरण करणे त्यांना सहजशक्य नाही. त्यामुळे येथे चित्रीकरण सुरू असलेल्या चित्रपटांना निर्बंध उठण्याची वाट पहावी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यातल्या त्यात अनीस बाज्मींच्या ‘भूलभुलैया २’चे चित्रीकरणच सुरू झालेले नसल्याने त्याचे बाहेरगावी चित्रीकरण करणे शक्य आहे, मात्र निर्माते जोवर निर्णय घेत नाहीत तोवर थांबून राहणार असल्याचे बाज्मी यांनी स्पष्ट के ले आहे. पंधरा दिवसांसाठी चित्रीकरणावर निर्बंध घालण्यात आले असले तरी हा काळ आणखी वाढवला जाऊ शकतो, अशीही चिंता निर्मात्यांना सतावते आहे. त्यामुळे काहींनी आत्ताच गोवा, हैदराबाद अशा ठिकाणी चित्रीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माती एकता कपूर हिने आपल्या मालिकांचे चित्रीकरण गोव्यात सुरू के ले आहे, आता तिच्या निर्मितीसंस्थेच्या ‘एक व्हिलन २’ या चित्रपटाचे चित्रीकरणही गोव्यातच के ले जाणार असल्याची माहिती एकताने समाजमाध्यमांवरून दिली आहे. मुंबईत निर्बंध वाढल्याने ‘एक व्हिलन २’चा दिग्दर्शक मोहित सुरी आणि कलाकार याआधीच गोव्यात पोहोचले आहेत, त्यांचे चित्रीकरणही याच आठवडय़ात सुरू होणार आहे. आणखीही काही चित्रपट किं वा वेबमालिकांचे चित्रीकरण गोवा-हैदराबाद अशा ठिकाणी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त के ली आहे. पण देशभरात सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात करोना संसर्गाचा धोका असल्याने मोठे चित्रपट आणि कलाकार आपल्या चित्रपटांसाठी एवढय़ात इतका मोठा धोका पत्करायला तयार नाहीत. एकाअर्थी कासवाच्या गतीने का होईना पुढे पडलेले बॉलीवूडचे पाऊल पुन्हा एकदा अडखळले आहे हे निश्चित!