बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिचा कथित प्रियकर मायकल कॉर्सेल याच्यासोबत अधिक वेळ घालवताना दिसत आहे. ब्रिटन स्टार मायकल कॉर्सेल आणि कमल हासन यांची मुलगी श्रुती यांच्यामध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रुती आणि मायकल मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी श्रुतीने वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल प्रसारमाध्यमांवर नाराजी देखील व्यक्त केली होती.

श्रुती आणि मायकेल यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत असताना, श्रुती मात्र मायकलसोबतच्या नात्याला मैत्रीचे नाव देताना दिसते. तिने सोशल मीडियावर मायकलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमधील कॅप्शनमध्ये ती मायकल हा तिचा खास मित्र असल्याचे सांगते. ब्रिटनवरुन मायकेल खास तिला भेटण्यासाठी मुंबईत आला असल्याच्या चर्चा रंगत असताना मायकलच्या येण्याचे खरे कारण आता समोर येत आहे. मायकल एखाद्या चित्रपटासाठी किंवा श्रुतीसोबतच्या नात्यासंबंधात तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेला नाही, तर मायकल त्याच्यावर उपचार करण्यासाठी भारतामध्ये आल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे. मायकल श्रुतीच्या जवळच्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. मात्र नक्की त्याला कोणत्या आजाराने ग्रासले आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मायकल हा ब्रिटनचा अभिनेता आहे.

कमल हासन यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. त्या दोघींही चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. श्रुती सध्या तिच्या ब्रिटन मित्रासोबत अधिक वेळ घालविताना दिसत आहे. बहुतांश तमिळ आणि तेलुगू चित्रपटांतून श्रुतीने महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केलेली श्रुती बॉलिवूडमध्येही आपले नाव कमावू पाहत आहे.