बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा काही ठराविक लोकप्रिय कलाकारांनाच नव्या पठडीतील चित्रपटासाठी साईन करण्यात येत होतं. मात्र काळानुसार बॉलिवूडमध्येदेखील बदल झाला आहे. सध्याच्या घडीला अनेक नवनवीन कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे या नवोदित कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांच्याकडे नव्या चित्रपटांसाठी विचारणा होत आहे.

बॉलिवूडमधील स्टार किड अनन्या पांडे, सारा अली खान, इशान खट्टर आणि तारा सुतारिया या नवोदित कलाकारांचे डेब्यु चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापूर्वीच या कालाकारांकडे नव्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत.

अनन्या पांडे लवकरच ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच तिने ‘पति, पत्नी और वो’ हा आगामी चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर ईशानही ‘धडक’नंतर ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटात झळकणार आहे. धडक प्रदर्शित होण्यापूर्वी ईशानने हा चित्रपट साईन केला होता.

सैफ अली खानची लेक सारा अली खानचा ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच तिच्याकडे आणखी काही चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली आहे. तर तारा सुतारियाही ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटात झळकणार असून ‘मेजावां’मध्येही दिसून येणार आहे.

दरम्यान, जेव्हा एखाद्या मोठ्या निर्मिती संस्थेतून नवोदित कलाकारांना लॉन्च करण्यात येतं तेव्हा ते या कलाकारांबद्दल खूप आश्वासक असतात. मी स्वत: तारा आणि अनन्याला भेटलो आहे. या दोघीही गुणी अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांना आगामी चित्रपटात घेण्यास काहीच हरकत नाही, असं निर्माता भूषण कुमार म्हणाले.