कलाकारांना बोलते करणाऱ्या ध्वनीचित्रफितीची निर्मिती
सिनेप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय ‘मामि’ चित्रपट महोत्सवाची सूत्रे गेल्याच वर्षी बॉलीवूडने आपल्या हाती घेतली होती. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या १७ व्या ‘जिओ मामि मुंबई चित्रपट महोत्सवा’साठी बॉलीवूडजनांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. या महोत्सवाची नाळ मुंबई शहराशी जोडलेली असल्याने सिनेप्रेमींना पुन्हा या महोत्सवापर्यंत आणण्यासाठी मुंबई आणि इथल्या सिनेमा इंडस्ट्रीची जडणघडण या विषयावर अमिताभ बच्चन यांच्यापासून आत्ताच्या कलाकारापर्यंत सगळ्यांना बोलते करणारा खास ध्वनीचित्रफित ‘लुटेरा’ फेम विक्रमादित्य मोटवाने यांनी दिग्दर्शित केली आहे.
‘मामि’ महोत्सवाच्या पहिल्या पर्वापासून मी इथे जागतिक सिनेमा पाहात आलो आहे. सिनेमा शिकवणारा माझा पहिला शिक्षक म्हणजे हा महोत्सव आहे. त्यामुळे या महोत्सवासाठी म्हणून मुंबईला आणि चित्रपटप्रेमींना सलामी देणारा ध्वनीचित्रफित तयार करण्यात आली असल्याची माहिती विक्रमादित्य मोटवाने यांनी दिली. यावर्षी महोत्सवाची सूत्रे निर्माता-दिग्दर्शक किरण राव आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्या हातात आहेत.
या दोघींबरोबरच महोत्सवाच्या विश्वस्त समितीत फरहान अख्तर, करण जोहर, विक्रमादित्य मोटवने, रितेश देशमुख, दीपिका पदुकोण, सिध्दार्थ रॉय कपूर, मनीष मुंद्रा, आनंद महिंद्रा अशी नामी मंडळी आहेत. खऱ्या अर्थाने, बॉलिवूडने यावर्षी या महोत्सवाची सूत्रे हातात घेतली आहेत. त्यामुळे या महोत्सवासाठी प्रेक्षकांना आमंत्रित करणाऱ्या या खास अभियानात अमिताभ यांच्यासह खुद्द महोत्सवाची अध्यक्ष किरण राव, आमिर खान, श्याम बेनेगल, कंगना राणावत, फरहान अख्तर, निम्रत कौरसारखे कलाकार पुढे आले आहेत.

अमिताभ बच्चन, कंगनासह अनेक कलाकारांच्या मुंबई शहराबद्दलच्या आठवणींना उजाळा
अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुंबईबद्दलच्या खास आठवणी या कॅम्पेनच्या निमित्ताने लोकांना सांगितल्या आहेत. एक पर्यटक म्हणून कधीकाळी मुंबईत आलेल्या अमिताभ यांनी या शहराची ओळखच मुळात स्वप्ननगरी आणि महत्त्वाकांक्षा पूर्तीची संधी देणारे शहर अशी असल्याचे म्हटले आहे. या शहरात जो कोणी येतो तो इथल्या चित्रपटांशी किंवा चित्रपटाशी संबंधित लोकांना भेटण्याचा हेतू मनात घेऊन येतो आणि म्हणूनच हे शहर चित्रपटांची राजधानी आहे असे मत अमिताभ यांनी व्यक्त केले. आजची आघाडीची अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या कंगनानेही आपली या शहराबद्दलची आठवण सांगताना दहा वर्षांपूर्वी इथे पाऊल ठेवले तेव्हा आपल्याक डे फक्त दीड हजार रुपये होते. मात्र, या शहराने काम करण्याची संधी दिली आणि इथल्या चित्रपटसृष्टीने आपल्याला स्त्री म्हणून एक ओळख मिळवून दिल्याचे सांगितले. मुंबई आणि चित्रपटांचे नाते अनोखे, अतूट आहे त्यामुळे ‘मामि’सारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इथे व्हायला हवेत, अशी अपेक्षाही या कलाकारांनी व्यक्त केली आहे.