श्रीलंकेच्या राजधानीत रविवारी सकाळी आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. प्रामुख्याने चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये हे बॉम्ब स्फोटो झाले असून या स्फोटांमधील मृत्यूचा आकडा १५६ वर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर ३०० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत्यूमध्ये ३५ विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगभरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“रविवारी सकाळी श्रीलंकेच्या राजधानीमध्ये झालेला साखळी बॉम्बस्फोट हल्ला हा हृदय पिळवटून टाकणारा आहे. ही घटना खरंच प्रचंड धक्कादायक आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असं ट्विट छोट्या पडद्यावरील अभिनेता विवेक दहियाने केलं आहे.

विवेकप्रमाणेच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनेही या घटनेचा निषेध केला आहे. “मन सुन्न करणारा हा हल्ला आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांचा मी जाहीरपणे निषेध करतो. हल्लातील पीडित व्यक्तींच्या दु:खात मी सहभागी आहे”.

अभिनेत्री हुमा कुरेशीनेही या घटनेविषयी तिचं मत व्यक्त केलं आहे. “ईस्टर डे च्या दिवशी जे नागरिक चर्चमध्ये जात होते. अशा निरपराध व्यक्तींवर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हा हल्ला प्रचंड वेदनादायी आहे. या जगात नक्की काय सुरु आहे?”, असं म्हणत हुमाने तिचा संताप व्यक्त केला आहे.

श्रीलंकेत झालेला साखळी बॉम्बस्फोट मन विषण्ण करणारा आहे. आम्ही सारेच पीडितांच्या दु:खात सहभागी आहोत, असं ट्विट अभिनेत्री अनुष्का शर्माने केलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही ट्विट करत पीडितांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, जॅकलीन फर्नांडिस, इलियाना डिक्रूज, इशा गुप्ता, सोनू सुद, स्वरा भास्कर  या कलाकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यासोबतच पीडितांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीलंकेच्या राजधानीमध्ये ही घटना घडली घडली. एएफपीच्या वृत्तानुसार, कोलंबोमध्ये ४५, नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये ६७ आणि बाट्टिकालोआमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे.