१४ फेब्रुवारी.. प्रेमिकांचा, प्रेमिकांसाठी असलेला हा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’ .. प्रेम आणि बॉलीवूडचे तसे अतूट नाते. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बॉलीवूडमधील जोडय़ा, बॉलीवूडचे चित्रपट, संवाद यांचा आढावा..

आपल्याकडील वयात आलेले तरुण-तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि आता तर अगदी शालेय विद्यार्थीही बॉलीवूडचे चित्रपट पाहून प्रेम करायला लागतात आणि शिकतात असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. िहदी चित्रपटांच्या नायक-नायिकांचे पेहराव, बोलणे याची नक्कल करत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत ही मंडळी प्रेमात पडतात, आपल्या भावना व्यक्त करतात. आपल्याकडील सर्व पिढीच्या प्रेमिकांसाठी बॉलीवूडचे चित्रपट, त्यातील संवाद, गाणी आणि त्यातील नायक-नायिका त्यांचे आदर्श असतात.

पिढी बदलत गेली आणि चित्रपटांचा ढाचाही बदलत गेला. एकमेकांपासून दूर अंतरावर उभे राहून प्रेम करणारे, प्रेमाची भाषा बोलणारे नायक-नायिका एकमेकांच्या अतिनिकट कधी आले आणि किमान सभ्यतेच्या पायऱ्याही ओलांडून कधी पुढे गेले ते कळले नाही. समाजातील वास्तव चित्रपटातून मांडण्यात येते की चित्रपटातून जे दाखवितात त्याचे अनुकरण समाजाकडून केले जाते हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. पण असे असले तरी ‘बॉलीवूड स्टाइल प्रेमा’चा परिणाम आपल्या सगळ्यांवरच झाला आहे हे नाकारून चालणार नाही.

अगदी ‘हीर-रांझा’, ‘मुगल-ए-आझम’पासून ते अगदी अलीकडच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटापर्यंत ‘प्रेम’हा विषय प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाने खास त्यांच्या स्टाइलने पडद्यावर मांडला. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरील काही नायक-नायिकांची जोडी वास्तव जीवनातही जमली. रुपेरी पडद्यावरील अशा जोडय़ांना अमाप लोकप्रियताही मिळाली. राज कपूर-नíगस, गुरुदत्त-वहिदा रहेमान, अमिताभ-रेखा, धर्मेद्र-हेमामालिनी, ऋषी कपूर-नितू सिंह, राजेश खन्ना-मुमताज, दिलीपकुमार-वैजयंतीमाला ते शाहरुख खान-काजोल ही त्याची ठळक उदाहरणे. या जोडय़ा आणि त्यांची गाणीही गाजली, लोकप्रिय झाली.

िहदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून राज कपूर-नर्गीस यांचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. ‘आग’, ‘अंदाज’, ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ हे या जोडीचे गाजलेले चित्रपट. या जोडीची ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘जाने ना नझर पहेचाने’, ‘इचक दाना पिचक दाना’, ‘घर आए मेरा परदेसी’ ही आणि अन्य गाणीही लोकप्रिय झाली.

धर्मेद्र आणि हेमामालिनी या जोडीचेही ‘राजा-रानी’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘चरस’, ‘ड्रिम गर्ल’, ‘द बìनग ट्रेन’ असे अनेक चित्रपट गाजले. िहदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार राजेश खन्ना व मुमताझ जोडीचे ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘सच्चा झुठा’. ‘दुश्मन’, ‘आप की कसम’ हे चित्रपट गाजले. दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांनी ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘मधुमती’, ‘गंगा-जमुना’, ‘लिडर’ या चित्रपटातून एकत्र काम केले. िहदी चित्रपटाच्या इतिहासात फारुख शेख व दीप्ती नवल ही जोडीही गाजली. त्यांचे ‘चश्मेबद्दूर’, ‘साथ साथ’, ‘कथा, ‘रंग बिरंगी, ‘फासले, ‘टेल मी ओ खुदा’ हे चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना भावले. अमिताभ बच्चन व रेखा ही जोडी पडद्यावर आणि पडद्याबाहेरही चच्रेत राहिली. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग, ‘मि. नटवरलाल, ‘सिलसिला, ‘खून पसीना’ हे त्यांचे चित्रपट चच्रेत राहिले. शाहरुख खान व काजोल (बाजीगर, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, करण-अर्जुन, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम) तसेच ऋतिक रोशन-ऐश्वर्या राय (धूम, जोधा अकबर, गुजारिश) या जोडय़ाही गाजल्या.

इतिहासाचे विपर्यस्त चित्रण केल्याच्या मुद्दय़ावरून संजय लीला भन्साळीचा ‘बाजीराव- मस्तानी’ हा चित्रपट चच्रेत राहिला आणि वादग्रस्तही ठरला. मराठी इतिहासातील बाजीराव व मस्तानी यांची प्रेमकहाणी भन्साळी यांनी िहदीत भव्य प्रमाणात सादर केली. शाहरुख खान व काजोल यांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा गाजलेला प्रेम चित्रपट. यातील शाहरुख व काजोलची ‘राज व सिमरन’ही जोडी अमाप लोकप्रिय झाली. प्रत्येक तरुण-तरुणीने या जोडीत स्वत:ला पाहिले. अगदी आत्ताआत्तापर्यंत हा चित्रपट मुंबईत ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात सुरू होता. यातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. ऐश्वर्या राय, सलमान खान, अजय देवगण यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपटही तरुणांना भावला. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांच्या प्रेमत्रिकोणातील ‘दिल तो पागल है’सह ‘जब वुई मेट’, ‘कुछ कुछ होता है’, ‘जाने तू या जाने ना’, ‘हम आपके है कौन’, ‘लव्ह आज कल’, ‘नमस्ते लंडन’, ‘प्यार तो होनाही था’, ‘रहेना है तेरे दिल में’, ‘वीर झारा’ ‘एक दुजे के लिए’, ‘हिरो’, ‘बॉबी’ हे आणखी गाजलेले काही प्रेम चित्रपट.

प्रेमात पडलेल्या व्यक्तीला समोरच्याकडे आपले प्रेम कसे व्यक्त करायचे हा महत्त्वाचा प्रश्न असतो. काहींना ते जमते तर अनेकांना आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हा प्रश्न पडतो. सध्याच्या काळात फेसबुक, व्हॉट्स अप यासारख्या सोशल नेटवìकग साइट्सनीही प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवला आहे. असे असले तरी प्रेमिकांना आपल्या भावना शब्दांत किंवा गाण्यात व्यक्त करण्यासाठी बॉलीवूडचे चित्रपट हा मोठा आधार आहे. या चित्रपटातील संवाद आणि गाणी प्रेमिकांच्या मदतीला येत असतात.

‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटातील दिलीपकुमार यांचा ‘म तुम्हारी आँखों में अपनी मोहब्बत का इकरार देखना चाहता हँू’ हा संवाद असो किंवा ‘आराधना’ चित्रपटातील राजेश खन्ना याचा ‘एक छोटा सा जख्म बहुत गहरा दाग बन सकता और एक छोटी सी मुलाकात जीवनभर का साथ बन सकती है’ ही त्याचीच उदाहरणे म्हणता येतील.

शाहरुख खान यानेही ‘कभी खुशी कभी गम’, ओम शांती ओम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यातून प्रेमात पडलेला तरुण साकारला. ‘कभी खुशी कभी गम’मध्ये शाहरुखने म्हटलेला ‘दोस्ती के अलावा भी कुछ रिश्ते होते है, कुछ रिश्ते जो हम समझते नही, कुछ रिश्ते जो हम समझना नही चाहते, कुछ रिश्ते जिनका कोई नाम नही होता, सिर्फ एहसास होता है, कुछ रिश्ते जिनकी कोई दिवार नही होती, ऐसे रिश्ते जो दिल के प्यार के और मोहब्बत के रिश्ते होते है, हा संवाद जणू प्रत्येक प्रेमिकांच्या मनातील भावना व्यक्त करणारा प्रातिनिधिक संवाद म्हणता येईल, असा आहे.

या सगळ्या चित्रपटांतून कधी दोघांमधील प्रेमकथा तर कधी प्रेमाचा त्रिकोण हळुवारपणे सादर करण्यात आला. बॉलीवूडच्या या प्रेम चित्रपटांवर तरुणाईनेही आपल्या पसंतीची मोहोर उमटविली. बॉलीवूडच्या प्रेमकथांचे आणि चित्रपटांचे स्वरूप काळानुसार बदलत गेले असले, प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही बदलली असली तरी बॉलीवूडच्या चित्रपटांच्या इतिहासात ‘प्रेम’हा विषय आजही कायम आहे आणि यापुढेही तो असाच कायम राहील यात कोणतीही शंका नाही.