मागील दोन दिवसांपासून गाजत असलेल्या भीमा- कोरेगाव हिंसा प्रकरणानंतर दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे राज्यभर पडसाद पहायला मिळाले.. मुंबई- ठाण्यासहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी या आंदोलनामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले. या आंदोलनाची झळ बॉलिवूडलाही पोहोचली. काही ठिकाणी कलाकार उशीरा सेटवर पोहोचले. काही मंडळी रास्ता रोकोमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत सापडले, तर पुण्याहून कामासाठी मुंबईत येणाऱ्या अनेक कलाकारांनी आपली मुंबईवारी रद्द केली. यातला मोठा फटका टीव्ही इंडस्ट्रीला बसला.
बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टी, मालिका, नाटक इत्यादींना महाराष्ट्र बंदचा मोठा फटका बसला. अनेक मालिकांचे चित्रीकरण भल्या पहाटे सुरू होत असल्यामुळे त्यांना थेट फटका बसला नसला तरी चित्रीकरणाच्या सेटवर दुपारचं जेवण पोहचू शकलं नाही. अनेक टीव्ही मालिकांच्या कलाकारांना आज उपास करावा लागला होता.
‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेचे चित्रीकरण ठाण्याला सुरु होते. चित्रीकरणात कोणताही व्यत्यय आला नसला तरी जेवणाचा डबा वेळेत पोहचू शकला नसल्यामुळे सुमारे १०० लोकांना उपाशी राहावे लागले होते. या मालिकेप्रमाणेच ‘यै रिश्ता क्या कहलाता है’, ‘पिया अलबेला’, ‘साम दाम’ या हिंदी मालिकांचे फिल्मसिटीमधली चित्रीकरण रद्द करण्यात आले होते.
हिंदी मालिकांनी चित्रीकरण बंद ठेवले तर फिल्मसिटीमध्ये ‘विठूमाऊली’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. मालिकेतील कलाकारांना आत घेण्यासाठी फिल्मसिटीमधलं ५ नंबर गेट उघडण्यात आलं होतं. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मालिकांच्या प्रॉडक्शन हाऊसने चारचाकीऐवजी दुचाकी पाठवून कलाकारांना सेटवर आणलं होतं.
बुधवारचे चित्रपटगृहांचे मॉर्निंग शो सुरु झाले पण मुंबईतील नंतरची स्थिती पाहता चित्रपटगृहांच्या मालकांनी नंतरचे शो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हे तर झाले मालिका आणि सिनेमांचे पण आज मुंबईत तीन ठिकाणी नाटकांचे प्रयोग होणार होते. हे तीनही प्रयोग करण्याचा कलाकारांचा मानस असला तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 9:30 pm